उरण : निवडणुका जवळ आल्याने अनेक जण पक्षांतर करू लागले असून राजकारणात निष्ठेला महत्त्व राहिले नसल्याचे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. उरणमधील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ काँग्रेस व राष्ट्रवादीसह, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी मंगळवारी उरणमध्ये स्वतंत्र बैठका घेतल्या.

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर ही तिसरी निवडणूक होत आहे. या पूर्वीच्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालेले आहे. त्यामुळे या वेळी राष्ट्रवादीने थेट पवार घराण्यातील नव्या वारसालाच मैदानात उतरविले आहे. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात येण्यापूर्वी याची चाचपणी घेण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार यांनी स्वत: आपल्या मुलासाठी कंबर कसली आहे.  या वेळी अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून राष्ट्रीय पुरुषांच्या स्मारकांचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. या बैठकांसाठी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष माणिक जगताप, राष्ट्रवादीचे वसंत ओसवाल, इंटकचे नेते महेंद्र घरत आदी नेते उपस्थित होते.