सुविधांनीयुक्त भव्य संकुल. सुसज्ज प्रवेशद्वार. दुतर्फा सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे. पोलीस, अग्निशमन दल, पालिका रुग्णालयांची लावलेली यादी अशा सुविधांचे दर्शन येथे होते.

मंगलदर्शन को-ऑ.सो. ऐरोली

ऐरोलीतील सेक्टर-१० येथील मंगलदर्शन सहकारी संस्था सर्वाच्या गरजेनुसार सोयी पुरविणारी गृहनिर्माण संस्था प्रसिद्ध आहे. १९९५ साली सिडकोने वसवलेली ही वसाहत. प्रत्येकी चार मजले असलेल्या सहा इमारती अशी एकूण ९६ कुटुंबांचे हे सर्व सुविधांनीयुक्त भरभराटीला आलेले भव्य संकुल. सुसज्ज प्रवेशद्वार. दुतर्फा सुरक्षिततेच्या दृष्टीने कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे. सुरक्षा रक्षकांच्या कक्षाला लागून असलेल्या भिंतीवर पोलीस, अग्निशमन दल, महापालिका रुग्णालयांची ठळक अक्षरात लावलेली यादी. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात ओला व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी चार डबे आणि मध्यवर्ती भागातील मोकळ्या जागेत नारळांची झाडे ही या संस्थेची प्रथमदर्शनी ओळख आहे. त्यामुळे सर्वासाठी सुविधा ही उक्ती इथे प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे.

समितीवरील सदस्यांची संपूर्ण माहिती असलेली तालिका आणि नोटीस बोर्ड, तक्रार पेटी आणि संस्थेच्या समितीचे प्रशस्त कार्यालय. सण सामाजिक उपक्रम राबवून साजरे केले जातात. संस्थेच्या गणपतीला महापालिकेचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. आरोग्य शिबीर, हळदी कुंकू, रांगोळी, स्त्री-भ्रूणहत्येवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात येतात. इमारतीच्या आवारात सुशोभीकरण करण्यात आले आहे. तंटामुक्त सोसायटी परिसरात मंगलदर्शनचा नावलौकिक आहे. आर्थिक व्यवहारांतील पारदर्शकता ठेवण्यासाठी व्यवहार धनादेशामार्फत केले जातात. मंगलदर्शनमध्ये पर्जन्यजल संधारण प्रकल्प राबविण्यासाठी निधी संकलन सुरू असल्याचे राजीव घारपुरे यांनी सांगितले.

इमारतीच्या समोरील व मागील मोकळ्या आवारातील जागेचा वापर पार्किंगसाठी केला जातो. दुचाकी,चारचाकी आणि सायकल अशी विभागणी करण्यात आली आहे. यासाठी विशेष पट्टे आखण्यात आले आहेत. संकुलात पाइपद्वारे गॅसपुरवठा होतो. विजेच्या बचतीसाठी इमारतींच्या आवारात चारही बाजूंनी एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. यासाठी बैठकांमधून रहिवाशांना सूचना देण्यात येतात. आतील गटारे ही भूमिगत करण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यावर जाळ्या टाकण्यात आलेल्या आहेत. इमारतीच्या पाण्याच्या टाक्यांना पाणी आपोआप बंद होण्यासाठीची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे टाकी पूर्ण भरून पाणी वाया जात नाही. गेली सहा वर्षे माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून इमारतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येते. वृक्षारोपणाबरोबरच रोपे जगविण्यासाठी प्रयत्न केले जातात. इमारतीच्या मागील बाजूस झाडांना पाण्यांची सोय म्हणून बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. तुळस वाटप करण्यात येते.

ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था

अपंग आणि ज्येष्ठांसाठी प्रत्येक इमारतीत लोखंडी ‘रेलिंग’ची सोय करण्यात आलेली आहे. इमारतींच्या आवारात खास ज्येष्ठांसाठी दगडी बाके बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार वेळोवेळी होणाऱ्या कार्यक्रमांत केला जातो. सेवानिवृत्तांच्या हस्ते राष्ट्रीय सण साजरे होतात.

रक्तदान शिबीर

मंगलदर्शनच्या वतीने माघी गणेशोत्सवात रक्तदान शिबीर होते. दर वर्षी किमान ६० बॅग रक्त या माध्यमातून जमा केले जाते. संकलित रक्त महापालिकेतील रक्तपेढीत जमा केले जाते. महापालिकेच्या वतीने मंगलदर्शनला प्रमाणपत्र मिळालेले आहे.

योगवर्ग

सकाळी ६ ते ७ या वेळात येथील इमारतीच्या टेरेसवर मोफत योगवर्ग घेतले जातात. इमारतीतील ५८ वर्षांचे गृहस्थ योग प्रशिक्षण देतात. याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या रविवारी इमारतीच्या आवारात रहिवासी स्वच्छता मोहीम राबवतात. ओला आणि सुका कचरा वैयक्तिक पातळीवर वेगळा करण्यात येतो. त्यासाठी सर्व सभासदांना नोटीस देण्यात आल्या आहेत. एका खासगी बँकेच्या सर्वेक्षणात मंगलदर्शन सोसायटीला पारितोषिक प्राप्त झाले आहे.