लोकसत्ता टीम

पनवेल : शुक्रवारी जागतिक जल दिवस सर्वत्र साजरा केला जात असताना पनवेलच्या काही भागात मागील दोन दिवसांपासून पिण्यासाठी घरात पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसेच शुक्रवारी सिडको मंडळाच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कामोठे येथे जलबचतीचा संदेश सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जागतिक जलदिनानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. मात्र दोन दिवसांपासून पनवेल शहरासह नवीन पनवेल आणि कळंबोली या वसाहतींमध्ये पिण्यासाठी पाणी पुरवठा नसताना पाणी बचतीपूर्वी पिण्यासाठी पाणी तरी द्या अशी मागणी पोटतिडकीने गृहिणींकडून होत आहे. 

आंतरराष्ट्रीय विमानतळासहीत सर्वाधिक दळणवळण आणि विकासाचे प्रकल्प पनवेल शहरात होत असलेले तरी सध्या पनवेलकर तहानेने व्याकुळ होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बुधवारी सकाळी आठ वाजता पाणी पुरवठा सुरु झाला तरी गुरुवारी दुपारपर्यंत मोठ्या पाणी टंचाईचा सामना पनवेलकरांना करावा लागला आहे. उन्हाळ्याचा पारा चढा होत असताना नवीन पनवेलच्या काही भागातील शहरी नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी वसाहतीमधील पंचशील नगरच्या झोपडपट्टी शेजारी जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी एमजेपीच्या फुटलेल्या जलवाहिनीवरुन २० लीटर बाटला पाण्याने घरी घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अद्याप पाणी पुरवठा सूरळीत झाला नसताना सिडको मंडळाने अपुरा पाणी पुरवठ्यासाठी माफक दरात पाण्याचे टँकर योजना सूरु न केल्यामुळे अधिकचे पैसे देऊन नागरिकांना खासगी टॅंकरने पाणी मागवावे लागत आहे.

आणखी वाचा-महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका

पाणी पुरवठा सूरळीत होत नसताना सिडको मंडळाने नागरिकांना जपून पाणी वापरा हा संदेश देण्यासाठी शुक्रवारी कामोठे वसाहतीमधील सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयापासून ते वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. या फेरीत विद्यार्थी व सिडकोचे कर्मचारी, नागरिक सामिल होणार आहेत. मात्र इतर वसाहतींमध्ये सिडको मंडळ पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.