पनवेल ः पनवेलमध्ये पावसाळ्यात आपत्ती आल्यास सरकारी विभागांचे आपसातामधील समन्वय असावे तसेच मागील वर्षी आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी यावेळी उद्भवल्यास त्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल यासाठी नूकतीच पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत अवैध व धोकादायक फलकांवरील कारवाईकडे अनेकांनी लक्ष वेधले. या बैठकीमध्ये पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिक्षक प्रवीण बोडखे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, महापालिका विविध विभागाचे विभाग प्रमुख, पोलिस स्थानकांचे पोलिस निरीक्षक, विज महावितरण कंपनी,  सिडको महामंडळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अशा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करताना पोलिस विभागाने सहकार्य करावे असा मुद्दा मांडण्यात आला. महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या अतिधोकादायक शाळा निष्कासित करणे व दुरूस्तीयोग्य शाळांची दुरूस्ती करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. पनवेल येथील बसआगारामधील उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून महापालिकेस सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच आगारातील खड्डे बुजवणे, बस आगाराशेजारील बेकायदा फलकांवर संयुक्त कारवाईस सहकार्य करण्याची सूचना एसटी महामंडळ विभागास करण्यात आली. अतिवृष्टीत खारघर येथील पांडवकडा परिसर पर्यटकांसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे पांडवकड्यापर्यंतच्या प्रवेशव्दार नागरिकांसाठी बंद ठेऊन तेथे जनजागृतीसाठी फलक लावण्याची सूचना यावेळी बांधकाम विभागाला करण्यात आली. आपत्तीवेळी पोलिस विभागानेही महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्त डॉ. रसाळ यांनी केली. कळंबोली वसाहत सिडको मंडळाने खोल बांधल्याने तेथे भरती आणि अतिवृष्टी एकाच वेळी होत असताना पूरस्थिती वसाहतीमध्ये निर्माण होते. अशावेळी वसाहतीमधील साचलेले पाणी उपसा करण्यासाठी लावलेले मोटारपंप सूरु असणे, उद्दचंन प्रकल्पातील मोटार सूरु असणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले.

हेही वाचा >>>नवी मुंबई : सेक्टर २६ मधील ट्रक टर्मिनल रद्द करा, माजी नगरसेवक विलास भोईर यांची सिडकोकडे मागणी

अद्याप शहरातील उद्दचंन प्रकल्प सिडकोने हस्तांतरीत न केल्याने हा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. त्यामुळे बंद पंपाची दुरूस्ती करून ते वेळीच वापरता यावे अशी तरतूद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर वेळीच वापरता येतील असे ठेवावेत, अखंडीत विज व्यवस्था महावितरण कंपनीने पुरवठा करावा असेही सांगण्यात आले. सिडको वसाहती हद्दीतील नाले, गटारांची साफसफाई वेळीत पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी अधिका-यांना दिल्या. पनवेल शहराचा पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र बसआगाराशेजारी आहे. तेथील विजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कऱण्यात आल्या. अतिधोकादायक इमारतींमधील विज पुरवठा खंडित करणे,  धोकदायक विजेचे खांब व विज वाहिन्या हटविणे, नाल्यामधून टाकण्यात आलेल्या केबल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे विज पुरवठ्याला त्रास होत असल्याने झाडांची छाटणी करावी अशी अनेक कामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे सूरु ठेवणे, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले. पालिका हद्दीतील धोकादायक वृक्ष, फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास देण्यात आली. रस्त्यांची कामे , पाईप लाईन, विज वाहिन्यांची कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर वाहतूक विभागाला देण्याबाबत महापालिकेच्या संबधित विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुर फवारणी व जंतुनाशके फवारणी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या. थोड्या पावसातही महामार्ग ते काळुंद्रे गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे त्याठिकाणी पाईप टाकून पाण्याचा निचरा कऱण्याची सूचना आयुक्तांनी पालिकेच्या मलनिस्सारण विभागास केली.

हेही वाचा >>>नवी मुंबई: एकाच आठवडयात दुसर्‍यांदा पाणी पुरवठा बंद, एमआयडीसीकडून शुक्रवारी शटडाऊन

पालिकेचे वार्ड अधिकारी सज्ज

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीतील माईक, बॅटरी ,सायरन व इतर आपत्कालीन परिस्थितीत लागणारे साहित्य, यंत्रे, वाहने हे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

पूरस्थितीसाठी पालिका सज्ज

गाढी नदी, काळुंद्रे नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील नागरीकांना इतर ठिकाणी निवा-याची सोय करण्यासाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याबाबत बांधकाम विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या.