वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ सप्टेंबरपूर्वी घेण्याचे आदेश

पनवेल : करोनामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांच्या गेल्या दोन वर्षांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे आर्थिक ताळेबंद आणि नवीन कार्यकारणी निवड अशा प्रक्रिया ठप्प आहेत. गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना सहकार विभागाने वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ सप्टेंबरपूर्वी घेण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये गणेशोत्सवाबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी धावपळ सुरू झाली आहे. एवढय़ा कमी वेळात हे शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी करण्यात येत आहे.

२०१९ – २०२०सालाच्या आर्थिक उलाढालीचा अहवाल मार्च २०२० मध्ये आलेल्या करोना साथरोग संसर्गामुळे अनेक गृहनिर्माण संस्था सर्वसाधारण वार्षिक सभेत सादर करू शकल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी त्यांचे वार्षिक ताळेबंद सहकार विभागाकडे दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे सहकार विभागाने करोनाचा प्रकोप पाहून २३ मार्च २०२० ला आदेश काढून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वसाधारण सभेचा अहवाल देण्याची मुभा दिली होती. त्यानंतर ३ सप्टेंबरला सहकार विभागाने नवीन आदेश काढून २३ मार्चचे आदेश रद्द होत असल्याचे शुद्धिपत्रक काढल्याने नियमाप्रमाणे गृहनिर्माण संस्थांना सप्टेंबरअखेपर्यंत सभा घेणे बंधनकारक झाले आहे. यामुळे सध्या शेकडो गृहनिर्माण संस्थांमधील पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सानंतर सभा घेण्याचे आयोजन करण्याचे आव्हान आहे.

सहकार विभागाच्या ३ सप्टेंबरच्या आदेशात गेल्या वर्षांची सर्वसाधारण सभा घेतल्यानंतर सुरू असलेल्या २०२० – २०२१ वर्षांची सर्वसाधारण सभा घेण्याविषयी कोणतीही स्पष्टता नसल्याने गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संभ्रमात आहेत. सहकार विभागाच्या आदेशात ५० सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्थांना ऑनलाइन बैठका घेण्याचे सुचविले असल्याने १० दिवसांची सूचना सभासदांना सभेपूर्वी देणे गृहनिर्माण संस्थांना बंधनकारक आहे. दरम्यान आलेला १० दिवसांचा गणेशोत्सव आणि त्यानंतर पितृपक्षामध्ये अनेक सभासद सभेला येणे टाळतात तसेच दोनच रविवार सार्वजनिक सुट्टीचे असल्याने नोकरदारवर्गाला कामावरून घरी आल्यावर रात्रीच्या बैठकांमध्ये रस नसल्याने नेमकी सभा कधी घ्यावी, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर आहे. अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार विभागाचे कार्यसन अधिकारी राहुल शिंदे यांनी ३ सप्टेंबरला काढलेल्या आदेशास मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे.

अचानक आलेल्या आणि तातडीच्या आदेशामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे सोपे नाही. कारण दोन दिवसांवर गणपतीचा सण आणि पुढे पितृपक्ष पंधरवडा यामुळे सदस्यांचा सहयोग सभेला मिळणे दुरापास्तच. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा फक्त २०१९ -२० वर्षांसाठी की बरोबर २०२० -२१ वर्षांसाठीही घ्यायची याचाही खुलासा या आदेशात नाही. त्यामुळे सहकारी संस्थाचे संचालक मंडळ संभ्रमात आहे.

-सुरेश सडोलीकर, सचिव, वृंदावन पार्क को ऑप. हा. सोसायटी, कामोठे.