साईनिकेतन सोसायटी, नेरुळ सेक्टर-५०

एकमेकांना मदत, सण-समारंभ एकत्रित साजरे करणे आणि हे सारे करताना सामाजिक भान राखून गरिबांना दान करणे आदी कर्तव्ये साईनिकेतनमधील रहिवाशी पार पाडतात. तंटामुक्त सोसायटी म्हणून साईनिकेतनचा लौकिक आहे.

साईनिकेतन सोसायटीचे एकमेव वैशिष्टय़ म्हणजे इमारतीच्या गच्चीवर (टेरेस) तरणतलाव आणि व्यायामशाळा आहे. आता या व्यायामशाळेत जायचे असेल तर जिना चढत जाताना तुमचे स्वागत इथली हिरवाई करेल. इमारतीत जिथे म्हणून मोकळी जागा दिसेल तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या वेली, छोटे वृक्ष आणि फुलझाडांच्या कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या तापत्या दिवसांतही वातावरणात गारव्याचा काही प्रमाणातील अनुभव येथे प्रत्येक अभ्यागताला मिळतोच.

साईनिकेतनमधील रहिवाशांची हिरवाईची ओढ फक्त इथेच संपत नाही. भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की, इमारतीच्या आवारात सभोवताली विविध वृक्ष बहरलेले दिसतील. २००५ साली ‘शांतिनिकेतन’ अस्तित्वात आली. केवळ ‘ब्लॉक संस्कृती’ स्वत:ला कोंडून घेण्यात धन्य मानणाऱ्या आजच्या ‘आधुनिक’ जगात शेजारधर्म पाळणारी परंपरा या सोसायटीने तयार केली. आपुलकी हा इथला आणखी एक गुण. नावाप्रमाणेच सोसायटीत श्रद्धा आणि शांती नांदेल, अशी खबरदारी येथील प्रत्येक रहिवाशी घेतो. एकूण १४ मजली इमारत. यातील १३ मजले रहिवाशांसाठी आणि चौदावा मजला व्यायामशाळा आणि तरणतलावासाठी दिलेला. भिन्नधर्मीय कुटुंबे तरीही त्यांच्या बोलण्या चालण्यात एक सहजपणा दिसून येतो.

रहिवाशांच्या मते, सोसायटीत कधी तंटा झडला नाही. यासाठीच आमचा नावलौकिक आहे. एकी हीच आमची ओळख आहे. इमारतीच्या दर्शनी भागात विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेते. इमारतीच्या मध्यवर्ती भागात लहान मुलांना खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्टची सोय करण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र उद्यानाची सोय आहे. इमारतीत एकत्रितरीत्या सण साजरे केले जातात.

इमारतीत प्रत्येक जण गणपती प्रतिष्ठापना करीत नाही. ‘एक इमारत एक गणपती’ या तत्त्वावर एकच गणेशमूर्ती आणली जाते. दिवाळी, ख्रिसमस या सणांना सर्व जण एकत्र येतात. स्नेहभोजनासाठी इमारतीतील रहिवाशी बाहेर जातात. या वेळी रहिवाशांकडून सामाजिक बांधिलकी जपली जाते. नेरुळ येथील अनाथालयात जुन्या कपडय़ांचे वाटप करण्यात येते. स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी लहानग्यांसाठी चित्रकला, गायन आणि क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. सणसमारंभात पर्यावरणविषयक जागृती करण्यात येते. जलबचतीचे धडे दिले जातात. याशिवाय वृक्षारोपणाची मोहीम हाती घेण्यात येते. केवळ सोसायटीच्या आवारातच हिरवाईचा वसा न जपता आवाराबाहेरही राडारोडा टाकलेल्या जागेत स्वच्छता हाती घेऊन निर्माण झालेल्या मोकळ्या जागेवर रहिवाशांनी बाग फुलवली आहे.

प्रत्येकासाठी स्वतंत्र पार्किंगची सोय आहे. वीज बचतीसाठी एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. महिन्यातून एकदा सोसायटीची सभा घेण्यात येते. त्यातील तक्रारी आणि सूचनांचा गांभीर्याने विचार केला जातो आणि त्यावर अंमलबजावणी हाती घेतली जाते.

ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण हे रहिवाशी कसोशीने पाळतात. येत्या काळात इमारतीत पर्जन्यजल संधारण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हाती घेण्याचा समितीचा मानस असल्याचे सचिव प्रवीण गाडे सांगितले.

महिलांसाठी स्वसंरक्षण आणि योग

महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणे आवश्यक असल्याने महिला प्रशिक्षकांमार्फत यासाठी वर्ग चालविले जातात. साईनिकेतनमध्ये दर शनिवारी इमारतीतील महिला व मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येते. उत्साही महिला वर्गासाठी रोज सकाळी इमारतीच्या उद्यानात योग वर्ग चालतात.