अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ते मोठमोठय़ा गणितज्ञांना भुरळ घालणारा एक गणिती खेळ म्हणजे रुबिकचा घन (रुबिक्स क्यूब)! एर्नो रुबिक या हंगेरियन वास्तुविशारदाच्या बुद्धिमत्तेतून १९७४ साली या घनाचा जन्म झाला. वास्तविक त्यांच्या विद्यार्थ्यांना त्रिमितीमधील वस्तूंचे नीट आकलन व्हावे म्हणून त्यांनी तो घन निर्माण केला होता. तो इतका लोकप्रिय होईल याची त्यांना कल्पना नव्हती. सहा पृष्ठभाग व त्या प्रत्येक पृष्ठभागावरील ३x३ घनाकार अशा एकूण २७ घनाकारांनी मिळून तयार झालेल्या, सहा रंगांनी युक्त असलेल्या रुबिक घनाच्या बाजू फिरवून छोटय़ा घनांच्या जागा बदलता येतात. सहा पृष्ठभाग व सहा वेगवेगळे रंग यांमुळे ते पृष्ठभाग फिरवत राहिल्यास ४३२,५२,००,३२,७४,४८,९८,५६,००० (जवळपास ४.३  x १०१९) इतक्या रचना शक्य आहेत. मात्र एका पृष्ठभागावर एकच रंग दिसेल अशा प्रकारे सहाही पृष्ठभागांची रचना करणे, याला रुबिक घन सोडवणे असे म्हणतात.

गणिताचा आधार घेत कमीत कमी वेळा बाजूंच्या हालचाली करून रुबिक घन सोडविण्यासाठी शोधलेल्या नियमावलीला ‘गॉड्स अल्गोरिदम’ या नावाने ओळखले जाते; तसेच रुबिक घनाच्या बाजूंच्या कमीत कमी ज्या हालचालींमुळे रुबिक घन सोडवता येतो त्या हालचालींच्या संख्येला ‘गॉड्स नंबर’ म्हटले जाते. ३x३x३ रचना असणाऱ्या रुबिक घनासाठी २० ही संख्या ‘गॉड्स नंबर’ म्हणून ओळखली जाते. जागतिक पातळीवर विविध प्रकारचे रुबिक घन सोडवण्याच्या स्पर्धाही ‘वर्ल्ड क्यूब असोसिएशन’मार्फत भरविल्या जातात. ३x३x३ रुबिक घन आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे ३.४७ सेकंदांत सोडविण्याचा विश्वविक्रम युशेंग डू या चीनमधील व्यक्तीने २४ नोव्हेंबर २०१८ रोजी स्थापन केल्याची नोंद या संघटनेने केली आहे.

homosexual Women
समलिंगी स्त्रियांना असतो अकाली मृत्यूचा धोका, पण नेमकं कारण काय? संशोधनातून धक्कादायक माहिती उघड!
article about upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी :विज्ञान आणि तंत्रज्ञान
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!

गणित विषयातील गट अभ्यास (ग्रूप थिअरी) या महत्त्वाच्या उपविषयाशी रुबिक घनाचा जवळचा संबंध दिसून येतो. गट अभ्यासामधील काही व्याख्या आणि लाग्रांजचे प्रमेय यांचा उपयोग करून रुबिक घन सोडविण्यासाठीचे अनेक यशस्वी प्रयत्न गणितज्ञांनी केले आहेत. रुबिक घनाच्या ३x३x३ रचनेच्या अभ्यासावरून ४x४x४ ते अगदी ३३x३३x३३ अशा रचना असलेल्या खेळांचा शोध लावला गेला. संगणकीय आज्ञावलींमार्फत रुबिक घन सोडवणे यंत्रमानवांनाही शक्य झाले आहे; त्यांच्याही स्पर्धा घेतल्या जातात. अधिक मितींमधील आभासी रुबिक घनसुद्धा उपलब्ध आहेत. लहान मुलांमधील स्मरणशक्ती, हात व डोळे यांतील समन्वय आणि मनाची एकाग्रता यांच्या विकासासाठी रुबिक घन हा गणिती खेळ साहायक मानला जातो.

–  मुक्ताई मिलिंद देसाई

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org