स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि आवश्यक मानली गेलेली वैशिष्ट्ये यांची तोंडओळख करून घेतल्यानंतर या स्वरूपाच्या बुद्धिमत्तेच्या पात्रता कसोट्या पाहूया… ही एक मोठी गंमतच आहे. एकीकडे आपण म्हणतो की स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्ता अजून फार दूर आहे पण दुसरीकडे मात्र एखादी यंत्रणा स्वजाणीव असणारी आहे की नाही, हे ठरवण्यासाठीच्या पात्रता कसोट्या मात्र हजर झाल्या आहेत.

प्रथम कसोटी म्हणजे ट्युरिंग कसोटी. सर्वसामान्य कृत्रिम बुद्धिमत्तेसाठीची ही कसोटी काय असते ते आपण पूर्वी कुतूहलच्या एका लेखात पाहिले आहे. आता खास स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ज्या कसोट्या आहेत त्यातील काही पाहू या.

पहिली म्हणजे आरसा कसोटी (मिरर टेस्ट). आपण किंवा एखादा बुद्धिमान प्राणी आरशात पाहतो तेव्हा त्याला आरशात दिसणारे आपण आहोत आणि कुणी एखादा भलतासलता प्राणी किंवा आपला शत्रू नाही, हे कळते. माणसाप्रमाणेच काही वानरे, हत्ती आणि डॉल्फिन यांच्यात ही प्रगल्भता दिसली आहे. जर एखादी कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रणा आरशासमोर उभी राहून स्वत:ला ओळखू शकली तर ती स्वजाणीव कृत्रिम बुद्धिमत्ता आहे असे ही कसोटी सुचवते. ही कसोटी उत्तीर्ण केल्याचे काही यंत्रणांचे दावे आहेत पण त्यांना अजून मान्यता मिळालेली नाही.

दुसऱ्या कसोटीला ‘शहाण्या माणसाचे कोडे’ (वाइज मॅन पझल) म्हणतात. राजा त्याच्या राज्यातील तीन हुशार माणसांना बोलावतो, त्यातील प्रत्येकाच्या डोक्यावर निळी किंवा पांढरी टोपी घालतो. त्यातील किमान एक टोपी निळी आहे असेही सांगतो. त्यातील पहिल्या माणसाने कोणाशीही न बोलता फक्त पाहून, स्वत:च्या डोक्यावर कोणत्या रंगाची टोपी आहे हे ओळखायचे असते. हीच कसोटी वेगळ्या स्वरूपात म्हणजे टोपीच्या ऐवजी रोबॉटच्या डोक्यावर एक टपली किंवा दोन टपल्या मारून केली जाते. दोन रोबॉटच्या डोक्यावर दोन टपल्या दिल्या जातात. दोन टपल्या म्हणजे मूक राहण्याचा संदेश. मग तीनही रोबॉटना विचारले जाते की तुमच्यापैकी कोणाला मूक करण्याची टपली देण्यात आलेली नाही? साहजिकच दोन गप्प राहतात आणि तिसरा म्हणतो ‘‘मला माहीत नाही’’ त्याच क्षणी त्याला कळले पाहिजे की तो बोलू शकला म्हणजे त्याला एकच टपली देण्यात आली आहे. ही कसोटी अमेरिकेतील ‘रेन्सलर पॉलिटेक्निक’ या प्रसिद्ध संस्थेने तयार केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शशिकांत धारणे,मराठी विज्ञान परिषद