सुनीत पोतनीस

अरबी भाषेत ‘सुडान’ म्हणजे काळ्या लोकांचा प्रदेश. या प्रदेशाचे मूळचे नाव ‘सुडान’च आहे. अनेक दशकांच्या रक्तरंजित यादवी युद्धानंतर ९ जुलै २०११ रोजी स्वतंत्र, सार्वभौम दक्षिण सुदानचा उदय झाला; पण त्यासाठी साधारणत: २० लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सतत खदखदत असणाऱ्या दक्षिण सुदानला स्वातंत्र्य मिळाले, तरीही तिथे सततच अंतर्गत सशस्त्र संघर्ष चालूच आहेत.

दक्षिण सुदानची संस्कृती शेजारी इथिओपिया, केनिया, युगांडा, इजिप्त यांच्यामुळे प्रभावित झालेली आहे. बऱ्याच प्रमाणात अरबी संस्कृतीचाही प्रभाव दिसतो. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्मीय आहेत. येथील लोक इंग्रजी भाषेचा वापर अधिक करत असले, तरी येथील पूर्वापार सुमारे ६० स्वदेशी भाषा वापरात आहेत! दक्षिण सुदानची राजधानी जुबा येथील परिसरात ‘अरबी पिजीन’ ही भाषा प्रचलित आहे. सुमारे सहा लाख २० हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या दक्षिण सुदानची लोकसंख्या सव्वा कोटीच्या घरात आहे.

सुदानवर ब्रिटिश अंमल असतानाच्या काळात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तिथे अरबी संस्कृतीला महत्त्व देऊन सुदानच्या उत्तर प्रदेशातील अरब लोकांना अधिक सुखसोयी पुरवल्या, त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. याउलट दक्षिण सुदानमधील समाज १० ते १२ भटक्या जमातींचा बनलेला आणि उत्तरेच्या तुलनेत ब्रिटिश व इतर राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेला होता. त्याचप्रमाणे १८ व्या आणि १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत दक्षिण सुदानमध्ये मुलांना गुलाम म्हणून विकण्याचा व्यवसाय जोरात चालू होता. दरवर्षी हजारो दक्षिण सुदानी धडधाकट तरुण गुलाम बनल्याने दक्षिणेतल्या समाजाचे मोठे नुकसान झाले, अर्थव्यवस्था ढासळली.

जगातल्या अत्यंत मागासलेली अर्थव्यवस्था असलेल्या गरीब देशांपैकी दक्षिण सुदान आहे. दक्षिण सुदानची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. खरे तर दक्षिण सुदानमध्ये मुबलक तेलसाठे, खनिजांमध्ये लोखंड, तांबे, सोने, हिरे भरपूर आहेत. दक्षिण सुदान आणि सुदान यांमधील काही तेलविहिरींवरील मालकी हक्क विवादात अडकले आहेत. दक्षिण सुदानमधील तेल उद्योगात ४० टक्के गुंतवणूक चीनची आहे. येथील तेल उत्पादनापैकी ४० टक्के निर्यात चीनला होते.

sunitpotnis94@gmail.com