बोस्निया १४६३ मध्ये ऑटोमन तुर्काच्या आधिपत्याखाली आला. तुर्काचा अंमल इ.स. १८७८ पर्यंत टिकला. तुर्कानी बोस्नियात अनेक नवीन प्रशासकीय पद्धती चालू केल्या, त्यामध्ये जमीनदारीबाबत नवीन कायदे आणि त्यांनी प्रदेशाचे केलेले प्रशासकीय विभाग हे उल्लेखनीय होते. या काळात या प्रदेशात स्लाविक भाषा बोलणारा बोस्नियन मुस्लीम समाज नव्याने उदय पावला. त्याचे बोस्नियातल्या इतर धार्मिक आणि वांशिक गटांवर वर्चस्व राहिले. ऑटोमन काळात सारायेव्होसारखी नवीन शहरे निर्माण होऊन तिथे मोठी व्यापार केंद्रे उभी राहिली. ऑटोमन सुलतानांनी वाचनालये, मशिदी, मदरसे, पूल आणि भव्य इमारती बांधून बोस्नियाचे स्वरूपच बदलून टाकले. अनेक बोस्नियन मुस्लिमांनी ऑटोमन साम्राज्याच्या सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात आपला प्रभाव पाडला. अनेक बोस्नियन लोकांनी ऑटोमन लष्करात उच्च पदी पोहोचून युद्धात कर्तृत्व गाजविले. काही बोस्नियन कवींनी टर्किश, अरबी भाषांमध्ये रचना केल्या आहेत.

परंतु अठराव्या शतकात ऑटोमन तुर्काना अनेक युद्धांमध्ये अपयश येऊन त्यांच्या अनेक देशांवरच्या वर्चस्वाला उतरती कळा लागली, त्यांची प्रशासकीय पकड ढिली झाली. या काळात बोस्नियात प्लेगचा उद्रेक आणि शासनाविरुद्ध असंतोष, उठाव यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर सर्बिया ऑटोमन साम्राज्यातून मुक्त होऊन सर्बिया आणि शेजारच्या क्रोएशियाचा राष्ट्रवादी गट बोस्नियाच्या प्रदेशांवर आपला अधिकार सांगू लागले. परिणामी बोस्नियात राष्ट्रवादाचा उदय झाला. स्वातंत्र्याची मागणी सुरू झाली. याच काळात, १८७५ मध्ये दक्षिणेकडील हर्जेगोव्हिना प्रांतात शेतकऱ्यांचा उठाव झाला. या प्रखर उठावाने संपूर्ण बोस्निया तर व्यापलाच, पण बाल्कन परिसरातल्या अनेक देशांतही त्यांचे लोण पोहोचले. याच काळात १८७७-७८ मध्ये रशिया-टर्किश ऑटोमन युद्ध होऊन ऑटोमन साम्राज्याने सपाटून मार खाल्ला. या युद्धानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेऊन बोस्निया आणि इतर बाल्कन देशांचे भवितव्य ठरविण्यासाठी रशिया, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रिया-हंगेरी वगैरे तत्कालीन प्रबळ सत्ता आणि ऑटोमन साम्राज्य, तसेच बाल्कन राष्ट्रांचे प्रतिनिधी यांची १८७८ साली बर्लिन येथे परिषद झाली. महिनाभर चाललेल्या या बर्लिन काँग्रेसच्या अखेरीस रशिया आणि ऑटोमन साम्राज्यात करार करण्यात आला.

– सुनीत पोतनीस sunitpotnis94@gmail.com