१८७८ साली बर्लिन येथे रशिया आणि ऑटोमन साम्राज्य यामध्ये झालेल्या करारानुसार बोस्नियाचा ताबा ऑटोमनकडून ऑस्ट्रिया हंगेरी साम्राज्याकडे देण्यात आला. ऑस्ट्रिया-हंगेरीकडे बोस्नियाचा ताबा पहिले महायुद्ध संपेपर्यंत १९१८ पर्यंत राहिला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मधल्या काळात हा प्रदेश युगोस्लाव्हिया राजवटीचा एक भाग बनून राहिला. पुढे १९४५ साली बोस्निया, क्रोएशिया, मॅसेडोनिया, मॉटेनिग्रो, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या सहा राज्यांनी एकत्र येऊन मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली युगोस्लाव्हियाचा साम्यवादी प्रजासत्ताक राष्ट्रसंघ बनविला. या सहा घटक राज्यांना प्रजासत्ताक देशांचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रसंघाने बोस्नियात शस्त्र सामुग्री, लष्करी वाहने अशा संरक्षण विषयक सामुग्री उत्पादनाचे कारखाने काढले तसेच या प्रदेशात औद्योगिक भरभराट होऊन एसकेएफ (स्विडन), फोक्सवॅगन, कोकाकोला, मार्लबरो अशा मोठमोठय़ा उद्योगगृहांचे कारखानेही सुरू झाले. यामुळे रोजगार वाढून बोस्नियाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. १९७० ते १९८० च्या दशकात बोस्नियन समाजात राष्ट्रसंघातून बाहेर पडून स्वायत्त देश बोस्निया स्थापन करावा असे जनमत तयार झाले आणि त्यासाठी चळवळ उभी राहिली. बोस्नियन लोकांशिवाय सर्ब आणि क्रोएट वंशीय लोकही मोठय़ा संख्येने होते. या तीन वंशाचे वेगवेगळे तीन राजकीय पक्ष निर्माण झाले होते. क्रोएशिया आणि स्लोव्हेनिया हे देश युगोस्लाव्हिया राष्ट्रसंघातून प्रथम बाहेर पडल्यानंतर बोस्नियातही तशी हालचाल सुरू झाली. राष्ट्रसंघातील प्रजासत्ताक बोस्नियात तीन वांशिक पक्षांचे एकत्रित सरकार होते. बोस्निया राष्ट्रसंघातच राहू द्यायचा की स्वतंत्र देश म्हणून वेगळा काढायचा यावर या तीन पक्षांचे एकमत नसल्यामुळे त्यांत संघर्ष होता, या संघर्षांत बोस्नियन सर्बानी त्यांचे वेगळे असेंब्ली ऑफ सर्बस् ऑफ बोस्निया हे सरकार १९९२ मध्ये स्थापन केले. त्याचे नाव बदलून त्यांनी रिपब्लिका सर्पस्का केले. बोस्नियाच्या काही प्रदेशात बोस्नियात राहणाऱ्या क्रोएट लोकांनीही वेगळे सरकार स्थापन केले. अखेरीस बोस्नियाच्या प्रजासत्ताक सरकारने या प्रश्नावर जनमत चाचणी घेतली. त्यात राष्ट्रसंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने मतदान झाल्यामुळे ३ मार्च १९९२ रोजी बोस्निया हे स्वायत्त, सार्वभौम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. बोस्नियातल्या सर्ब लोकांनी या चाचणीवर बहिष्कार टाकला होता.

– सुनीत पोतनीस sunitpotnis@rediffmail.com