मियावाकी ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते. या तंत्रज्ञानात निसर्गाबरोबरच विज्ञानही आढळते म्हणूनच प्रा. मियावाकी म्हणतात ‘ही निसर्ग आणि विज्ञानाची शुद्ध मैत्री आहे’. सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत २५० मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या ४० पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते, ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. ही पद्धत शक्यतो मोठमोठय़ा शहरांतील अस्वच्छ, अतिक्रमणग्रस्त, पडीक भूखंडांवर शास्त्रीय पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जाते. वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. येथे विदेशी वृक्षांना स्थान नसते. सर्व तंत्रज्ञान जमिनीखालील उपयोगी जिवाणू, खेळती हवा, शेणखत आणि भाताच्या तुसावर अवलंबून असते. मियावाकी जंगल हे घरांच्या मागे, मंदिर परिसर, शाळा, महाविद्यालये, उदयोगसमूहांच्या जागा तसेच रस्त्यांच्या दुतर्फासुद्धा करता येते. ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होतेच, पण त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात. वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होणे हा सध्याच्या वातावरणबदलावरचा प्रभावी उपाय आहे. शाळा महाविद्यालयांमधून अशा प्रकारची उद्याननिर्मिती विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाचे योग्य धडे देऊ शकते. मियावाकी पद्धतीसाठी क्षेत्र किती असावे याचे बंधन नाही मात्र ठरावीक क्षेत्रात योग्य संख्येनेच वृक्ष हवेत, हे मात्र नियमात आहे. या तंत्रज्ञानात स्थानिक जागेवरील मूळ माती तीन फूट खोल खड्डा करून काढली जाते आणि पुन्हा तेथील चाळलेली माती, खत आणि भाताचे तूस यांचे मिश्रण करून भरली जाते. ही संपूर्ण जैविक पद्धती असून येथे सेंद्रिय घटकांचाच वापर होतो. रासायनिक खते, कीटकनाशकापासून हे तंत्रज्ञान मुक्त असते. मियावाकीचा पृष्ठभाग स्पंजप्रमाणे असतो म्हणून मुसळधार पावसात तो वाहून जाऊ शकतो त्यामुळे या जंगलांची निर्मिती उतारावर किंवा पावसाळय़ात करणे टाळावे. मियावाकीस योग्य कुंपण घालून पहिली दोन वर्षे सांभाळल्यास तिसऱ्या वर्षी ही उद्याने स्वतंत्र आणि स्थिर होतात.

– नागेश टेकाळे

mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार
white onion alibag marathi news
विश्लेषण: अलिबागचा पांढरा कांदा आजही भाव का खातो? उत्पादन किती? बाजारपेठ किती? वैशिष्ट्य काय?
Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Loksatta chaturanga Discovery of Women Vote Bank
महिला व्होट बँकेचा शोध!

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org