News Flash

समाधानी आयुष्याचं गुपित

प्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो.

प्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो. प्रणीतच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही दत्तक या विषयाबद्दल दु:ख, तिरस्कार जाणवत नाही. मुलांना दत्तक प्रक्रियेबद्दल कळल्यानंतर ज्या भावनिक संघर्षांतून त्यांना जावं लागतं, अशा वेळेस त्यांना भावनिक जिव्हाळ्याची पाठराखण हवी असते, जी प्रणीत आज बऱ्याच मुलांना देतो. प्रणीतला या समाधानी आयुष्याचं गुपित उलगडलं आहे.

प्रणीतच्या बाबांना जेव्हा तिसरा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्यांनी ठरवलं, प्रणीतला त्याच्या दत्तक प्रक्रियेबद्दल सांगायचं. तेव्हा प्रणीत दहा वर्षांचा होता. बाबांनी त्याला जवळ घेऊन ‘‘आम्ही तुला दत्तक घेतलंय,’’ असं सांगून सगळी प्रक्रिया समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्याला त्याची सगळी कागदपत्रं दाखवली. काय वाटलं असेल प्रणीतला?

कळत्या वयात जेव्हा या मुलांना आपल्या अस्तित्वाची अशी जाणीव होते त्या वेळेस प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या अनुभवांतून जातं आणि आपली वाट निवडतं. आज प्रणीत सज्ञान तर आहेच, परंतु आयुष्याकडे बघण्याचा आणि दत्तक प्रक्रियेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. आपण थोडंसं प्रणीतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊ.

प्रणीतचे आईबाबा हे दोघेही शिक्षक. मूळचे पुण्याचे, पण कामानिमित्त कोल्हापूरपासून एक तास पुढे बाजार-भोगाव गावात राहायचे. प्रणीत जेव्हा घरी आला, तेव्हा अर्थातच सगळ्या गावात माहीत होतं की, तो दत्तक प्रक्रियेतून घरी आलाय. घरचं वातावरण तसं शिक्षकी.. आई शिस्तीची भोक्ती होती, त्यामुळे प्रणीत कुठेही चुकू नये, हा तिचा अट्टहास. प्रणीत आजही म्हणतो, ‘‘शाळेतून घरी आलं, की माझी दुसरी शाळा सुरू व्हायची.’’ आई त्याला नेहमी म्हणायची, ‘‘प्रणीत, गावात सगळे आपल्याला आदर्श मानतात आणि तो तू जपला पाहिजेस!’’ आईबाबा दोघेही नोकरीत असल्यानं दुपारी शाळेतून आल्यावर प्रणीत शेजारी दुसऱ्या शिक्षकांच्या घरी जायचा. त्यांना तीन मुले होती. प्रणीत आपल्या आईबाबांना ‘आई-बाबा’, तर या काकूंना ‘मम्मी’ म्हणायचा.

प्रणीतच्या बाबांना ज्या वेळेस तिसरा हृदयविकाराचा झटका आला त्या वेळी एक दिवस बाबा दत्तक प्रक्रियेची कागदपत्रे घेऊन प्रणीतसोबत बसले आणि त्याला त्यांनी सगळं समजावून सांगितलं. प्रणीतला फक्त एवढंच कळलं, ‘हे आईबाबा माझे नाहीत आणि माझे जन्मदाते दुसरेच आहेत.’ तो तसाच रडत घरातून बाहेर पडला आणि शेजारच्या मम्मीकडे गेला. त्यांना म्हणाला, ‘‘माझे आईबाबा माझे नाहीत, त्यांनी मला दत्तक घेतलंय आणि माझे आईबाबा कुणी तरी दुसरेच आहेत.’’ त्या वेळेस त्या लगेच म्हणाल्या, ‘‘अरे प्रणीत, तुला एक सांगू का? आम्हाला ना, या तीन मुलांनंतर एक चौथं बाळ झालं, आमची परिस्थिती बेताची होती. तुझ्या आईबाबांकडे एकही बाळ नव्हतं म्हणून आम्हीच त्यांना म्हणालो, प्रणीतला दत्तक घ्या.’’ प्रणीत आजही तेवढय़ाच आनंदाने तो क्षण जगतो. तो सांगतो, ‘‘मी आनंदाने उडय़ा मारत घरी आलो, किती छान! आईबाबा इकडे आणि मम्मीपण जवळच!’’ प्रणीत म्हणतो, ‘‘मोठा झाल्यावर मला पूर्ण सत्य कळलं, परंतु त्या वेळेस मम्मी जे बोलल्या त्यामुळे मला खूप मोठा भावनिक आधार मिळाला. मम्मीने भले खोटं सांगितलं असेल! फक्त तेवढे पाच मिनिटे मी माझ्या आईबाबांपासून स्वत:ला वेगळं अनुभवलं. त्यानंतर माझ्या मनात हा विचार आला नाही, की हे माझे आईबाबा नाहीत आणि असा दुरावाही जाणवला नाही.’’

प्रणीत पाचवीत असताना त्याचे बाबा गेले. प्रणीत नववीत असताना आईनं ठरवलं की, शिक्षणासाठी त्याला आपल्या आईकडे पुण्याला ठेवायचं. प्रणीतची आजी त्या वेळेस नुकतीच मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली होती. प्रणीत पुण्याला आजीकडे आला, पण थोडय़ाच दिवसांत प्रणीतची आईपण गेली. प्रणीतच्या आजीनं आईच्या मायेनं त्याला वाढवलं, घडवलं. जवळचे सगळे नातेवाईक आणि आजीची माया यामुळे प्रणीतनं स्वत:ला सावरलं. प्रणीत म्हणतो, ‘‘भिसे आणि विजय कुवळेकर कुटुंबाने नेहमीच सोबत केली. आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या पालकांचे संस्कार आणि या सगळ्यांच्या प्रेमामुळे.’’ प्रणीतने हॉटेल व्यवस्थापन या विषयामध्ये पदवी घेतली असून त्याच क्षेत्रात तो आज काम करतोय.

लहानपणापासून त्याला आत कुठे तरी सारखं वाटायचं, ‘‘मी कुणासारखा दिसतो?’’ या एकाच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्याने आपल्या जन्मदात्रीला भेटायचं ठरवलं. तो ‘श्रीवत्स’ या बालसंगोपन केंद्रातून घरी आला होता तिथं गेला आणि तिथल्या प्रमुखांना सांगितलं, ‘‘मला माझ्या जन्मदात्रीला भेटायची इच्छा आहे.’’ तिथल्या अधिकारी मावशीनं सगळी प्रक्रिया समजावून सांगितली व म्हणाल्या, ‘‘तू सज्ञान आहेस, त्यामुळे तू जन्मदात्रीला भेटण्यासाठीचा अर्ज करू शकतोस. त्यानंतर ती कुठे आहे हे आम्ही शोधायचा प्रयत्न करू. ती कुठे आहे हे कळल्यावर तिलाही विचारलं जाईल की, तिलासुद्धा तुला भेटायची इच्छा आहे का? तिने होकार दिला तरच आपण ही भेट घडवून आणू शकतो.’’ प्रणीतने सगळी प्रक्रिया पूर्ण केली आणि त्याच्याही जन्मदात्रीने भेटायला होकार दिला. भेटीचा दिवस ठरला त्या वेळेस प्रणीतनं आजीला सगळं सांगितलं. तिनेही प्रणीतला विरोध केला नाही.

‘श्रीवत्स’च्या मुख्य मावशीनं ही भेट कशी असेल, त्यात काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही, याच्या सूचना दिल्या. या भेटीत फक्त पहिलं नाव एकमेकांना सांगायची परवानगी असते; पूर्ण नाव, पत्ता आणि फोन नंबर सांगायची परवानगी नसते. ‘श्रीवत्स’च्या मावशी आणि प्रणीत वाट बघत होते. थोडय़ाच वेळात त्याची जन्मदात्री आली. भेटीचा पहिला क्षण, दोघांनी एकमेकांना बघितलं, पण काय बोलावं, कसं बोलावं काहीच कळत नव्हतं. हळूहळू गप्पा सुरू झाल्या. ज्या वेळेस या आईनं बाळाला संगोपन केंद्रात सुपूर्द केलं त्या वेळेस आपल्या बाळाचं नाव प्रणीत असावं अशी इच्छा तिनं व्यक्त केली होती. प्रणीतच्या आईबाबांनी तेच दिलं हे बघून या आईला गहिवरून आलं. प्रणीतला जाणवलं, ‘आपण आईसारखे दिसतो.’ आज ती लग्न करून दोन मुलांची आई आहे. तिनं सांगितलं, तिचा मोठा मुलगा आणि प्रणीत याच्या काही सवयी आणि आवडीनिवडी सारख्या आहेत. प्रणीतला हे ऐकून छान वाटलं. दोन तास गप्पा चालू होत्या. निघायच्या वेळेस मावशी प्रणीतच्या कानात म्हणाल्या, ‘‘एकदा तिला ‘आई’ म्हणून हाक मार.’’ प्रणितला दोन क्षण खरंच कळलं नाही, आपण म्हणावं की नाही? आजही तो सांगतो, ‘‘मला त्या भावना नाही जाणवल्या; पण तिला छान वाटावं म्हणून मी तिला ‘आई’ म्हणालो.’’ या एका भेटीनंतर मात्र त्यानं आपल्या आयुष्यात अथवा या आईच्या आयुष्यात काहीही गुंतागुंत होणार नाही याची काळजी घेतली आणि ठरवलं, ही पहिली आणि शेवटची भेट!

पुढे दोन वर्षांनी आजीपण गेली. त्या वेळेस मात्र प्रणीत म्हणतो, ‘‘मला एकदम पोरकं झाल्यासारखं वाटलं. घरात यायलाही नको वाटायचं. मी ठरवलं, थोडे दिवस वातावरण बदल म्हणून देशाबाहेर नोकरी करावी. तीन र्वष अमेरिकेत जहाजावर नोकरी केली. या वर्षी वाटलं, आपण परत येऊन आपल्या लोकांमध्ये जास्त आनंदी राहू शकतो, म्हणून इथला मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या ओढीने मी परत आलोय.’’

प्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो. प्रणीत खूप अभिमानाने सांगतो, ‘‘माझ्या आईबाबांनी माझ्यावर खूप छान संस्कार केलेत आणि मी खूप नशीबवान आहे, मला असे आईबाबा लाभले.’’ प्रणीतच्या बोलण्यात, वागण्यात कुठेही दत्तक या विषयाबद्दल दु:ख, निराशा जाणवत नाही. खरं तर त्याच्या बोलण्यात नेहमी असंच येतं, ‘‘माझ्या जन्मदात्रीने त्याही काळी धाडस दाखवून मला जन्म दिला. जेव्हा तिला जाणवलं की, सामाजिक बंधन आणि परिस्थिती यामुळं आपण बाळाचं संगोपन नाही करू शकणार! त्या वेळेस मला एक हक्काचं घर मिळावं, प्रेम करणारे आईबाबा मिळावेत आणि समाजानं मला प्रेमानं स्वीकारावं म्हणून मला तिने बालसंगोपन केंद्राकडे सुपूर्द केलं.’’ त्याला याचा आनंद आहे की, त्याच्या जन्मदात्रीचा हा उद्देश आईबाबांनी सार्थ केला.

मुलांना दत्तक प्रक्रियेबद्दल कळल्यानंतर ज्या भावनिक संघर्षांतून त्यांना जावं लागतं, अशा वेळेस त्यांना भावनिक जिव्हाळ्याची पाठराखण हवी असते, जी प्रणीत आज बऱ्याच मुलांना देतो. ज्या संस्थेसोबत प्रणीत जोडलेला आहे तिथं पालकांच्या मेळाव्यात आपले अनुभव सांगायलाही तो आवर्जून जातो.

खरंच प्रणीतला या समाधानी आयुष्याचं गुपित किती सहजपणे उलगडलं आहे, हो ना?

 

संगीता बनगीनवार

sangeeta@sroat.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:35 am

Web Title: article by sangeeta banginwar
Next Stories
1 संवेदनशील
2 समृद्ध प्रवास
3 दत्तक घेण्यापूर्वी..
Just Now!
X