News Flash

हवं समाजभान

मुलं मोठी होताना यावरील काही अनुभवांतून गेली तर काहींना याचा बराच त्रास होतो.

मुलं मोठी होताना यावरील काही अनुभवांतून गेली तर काहींना याचा बराच त्रास होतो.

‘तू दत्तक आहेस’, ‘तू दत्तक आहेस म्हणून असा वागतोस’, ‘कशाला मूल दत्तक घ्यायला हवं?’, ‘शेवटी आपल्या रक्ताचं नाही ना हे मूल’. अशासारखे उद्गार दत्तक प्रक्रियेतून घरी आलेल्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना सातत्याने समाजाकडून ऐकून घ्यावे लागतात. याचा कळत नकळत नकारार्थी परिणाम मुलांवर होतो. पालकांवरही होतो. समाजाने आपल्या विचारांची दिशा थोडी बदलली तर? स्वत:मध्ये समाजभान आणलं तर? खूप काही बदलू शकेल.

बऱ्याचदा दत्तक प्रक्रियेतून घरी आलेल्या मुलांना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवरून जाताना काही ठरावीक अनुभव येत असतात. त्यातील काही अनुभव म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी केलेल्या टिप्पण्या. उदाहरणार्थ : ‘तुझ्या आई-बाबांनी तुला अनाथाश्रमातून आणलंय’, ‘तू दत्तक आहेस’, ‘कोणाचं रक्त आहे देव जाणे!’, ‘तुझे आई-बाबा हे तुझे खरे आई-बाबा नाहीत’, ‘तुला दोन आया आहेत’, ‘दत्तक आहे ना, म्हणून लग्न ठरायला त्रास होतोय’ आणि आणखी असे बरेच बरेच काही..

बरं, समाज म्हणून आपण इथेच थांबत नाही, या मुलांच्या आई-बाबांना पण थोडय़ाफार फरकाने असेच अनुभव येतात, ‘कशाला दुसऱ्याचं मूल वाढवायचं?’, ‘थोडं थांबा, होईल तुम्हाला मूल, कशाला दत्तक घ्यावं लागतं?’, ‘तुमचं मूल तुमच्यासारखं दिसत नाही’, ‘कोण लग्न करील तुमच्या दत्तक मुलाशी/मुलीशी?’, ‘नात्यातून तरी घ्यायचं’, ‘दत्तक आहे म्हणून अभ्यासात असा आहे’, ‘मोठा/मोठी झाल्यावर तुमची सगळी संपत्ती हडप करील आणि जाईल निघून’, खरंतर ही यादीही न संपणारी आहे.

शाळेत आणखीन वेगळेच अनुभव.. काही शाळेच्या अर्जात विचारतात, ‘मूल दत्तक आहे का?’. एकदा एका मुलीला तिच्या नर्सरीच्या शिक्षिकेनंसुद्धा म्हटलं, ‘‘तुला दोन आया आहेत.’’ एका वर्गात कुठल्याशा धडय़ात अनाथाश्रम असा शब्द आला, एका विद्यार्थ्यांनं कुतूहलानं विचारलं, ‘‘अनाथाश्रम म्हणजे काय?’’ यावर त्या शिक्षिकेनं सांगितलं, ‘‘ज्या आई-बाबांना आपलं मूल नको असतं, अशा मुलांना तिथे ते नेऊन देतात अशी संस्था म्हणजे अनाथाश्रम.’’ नेमकं त्याच वर्गातला एक विद्यार्थी हा दत्तक प्रक्रियेतून आलेला होता. या एका वाक्यानं त्या मुलाची अस्तित्वाची लढाई सुरू झाली. त्या मुलाच्या आई-बाबांना आणि मुलाला सहा महिने लागले या सगळ्यातून बाहेर यायला.

काही वेळा तर पालकही यात सहभागी होतात, ‘‘आम्ही आमच्या मुलाला/ मुलीला अजून सांगितलं नाही, तू दत्तक आहेस’’, ‘‘दत्तक आहे असं सांगायची काही गरज आहे असं आम्हाला वाटत नाही’’, ‘‘दत्तक आहे ना, म्हणून असं वागतोय, आमचं रक्त असतं तर असा निघाला नसता/ अशी निघाली नसती.’’

काही मुलेही बोलताना दिसतात, ‘‘मी दत्तक आहे ना, म्हणून तुम्ही असं वागता’’, ‘‘असं वागलात तर, जाईन मी परत संस्थेत निघून.’’ असे उद्गार या मुलांच्या तोंडून का निघतात बरं?

खरंच आपण सगळ्यांनी यावर थोडंसं काम केलं, विचार केला, कृती केली तर या सगळ्या वरील घटना कधी घडणारच नाहीत. गरज आहे ती फक्त सगळ्यांनी आपल्या विचारात फरक करायची आणि मग समाजात दत्तक प्रक्रियेविषयी खरा बदल होताना दिसेल. खरी अडचण आहे ती हा बदल कसा करता येईल याची. चला तर थोडंसं याविषयी बोलू या.

विचारात बदल आणण्यासाठी जाणीवपूर्वक आधी भाषा थोडी बदलून बघू या. मी नेहमीच बोलत आणि लिहीत आले, ‘‘दत्तक ही एक प्रक्रिया आहे त्यामुळे मुलाला ‘दत्तक’ असं लेबल लावू नका. आपण आपल्या औरस मुलांना कधी ‘हा माझा औरस मुलगा’ असं म्हणतो का? लग्न झाल्यावर नवरा बायको कधी एकमेकांची अशी ओळख करून देतात का, ‘ही माझी लग्नाची बायको.’ समजा नेहमी असं लेबल वापरून तुमचा उल्लेख झाला तर कसं वाटेल बरं तुम्हाला? तसंच दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांना पण लोकांचं असं बोलणं अंगावर येत असतं. चला तर आजपासून इथे तरी सुरुवात करू या, ‘मूल हे मूल आहे. दत्तक, औरस या सगळ्या प्रक्रिया.’’

‘‘तुला दत्तक घेतलं’’, मूल हे काय कुठली वस्तू आहे का, ‘घेतलं, आणलं’ असं म्हणायला?

‘अनाथाश्रम’ हा शब्द ऐकल्यावर आपल्याला काय वाटतं हे प्रत्येकानं एकदा चाचपून बघावं. आज सगळीकडं कागदोपत्री हा शब्द काढून टाकला जात आहे, पण समाजात अजूनही आपण तो सर्रास वापरतो, ऐकतो. या ऐवजी, ‘बालसंगोपन केंद्र’ असं जर म्हटलं तर नक्कीच भावना बदलतील. प्रत्येकाने थोडा विचार करावा आणि खरंच हे असे शब्द आपल्या बोलण्यात येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी.

बालसंगोपन केंद्रात येणारं मूल हे त्याच्या आई-बाबांनी ‘टाकून’ दिलेलंच असतं असा शिक्का का? बऱ्याच वेळा परिस्थिती आणि आपण सगळे या समाजाचे घटक, या निर्णयात सहभागी असतो. आपल्या आजूबाजूला एखादी कुमारी माता असेल तर आपले विचार आणि वागणूक काय असते? ‘कुठे शेण खाऊन आली कोण जाणे?’ या शब्दांऐवजी ‘ठीक आहे, चल मी तुला मदत करते या परिस्थितीतून मार्ग काढायला.’ अशी आपली भूमिका बदलली तर, बालसंगोपन केंद्रांची गरजच राहणार नाही. पूर्ण समाज हे एक कुटुंब म्हणून एकत्र आलेला तो दिवस असेल.

‘तुझे आई-बाबा हे तुझे खरे आई-बाबा नाहीत.’ लग्नाच्या नात्यात कुठे अनुवांशिक संबंध असतो का? परंतु हे नातं किती सुंदर आणि जन्म-जन्मांतराचं समजलं जातं. मुलांच्या बाबतीत पण हे असंच असतं ना! निसर्गानं फक्त वेगळ्या मार्गानं त्या आई-बाबा आणि मुलं अशा भेटी घडवल्या एवढंच. मग प्रत्येक मुलाचे आई-बाबा हे आई-बाबाच असतात, त्यात ‘खरे खोटे’ असा भेद काही नसतो तर तो आपण का करायचा?

लग्न ठरवताना जात, गोत्र, शिक्षण, दोन्हीकडील वागण्याच्या पद्धती हे सगळं बघूनसुद्धा फसलेलं लग्न, मोडलेलं लग्न आपण आजूबाजूला बघतोच. मग लग्न ठरताना खरंच ‘दत्तक प्रक्रियेतून आलेलं मूल’ हे वेगळं असण्याचं काही कारणचं उरत नाही!

‘तुमचं मूल तुमच्यासारखं दिसत नाही’ हे ऐकलं की मला खरंच हसू येत. दिसण्याच्या बाबतीत नवरा-बायको अगदी दोन टोकं असतील तरी चालतं पण मुलं मात्र गोरीगोमटी, गुटगुटीतच हवीत.. का? गुणापेक्षा वाण महत्त्वाचा असं का? एकदा फक्त मुलाकडे मूल म्हणून बघा, त्याच्यातले गुण बघा आणि त्याला तसंच स्वीकारा, एक सुंदर नातं घडताना तुम्ही स्वत: अनुभवाल.

थोडंसं शाळेतील अनुभवाबद्दल बोलू या. इथं कधी अर्जामध्ये आपण असं वाचलं का? ‘‘मुलाचा जन्म नॉर्मल, सिझेरिन, आयव्हीएफ, सरोगसीमधून आहे का?’’ मग ‘मूलं दत्तक आहे का’ हे विचारण्याचा अधिकार कुणी दिला या शाळांना? काय साध्य करायचा प्रयत्न करतात या शाळा या माहितीमधून? शाळांचं खरं तर प्रबोधन होण्याची गरज आहे. शाळांनी आणि समाजातील काही जाणकारांनी याची जबाबदारी घ्यायला नको का?

पालकांसाठीसुद्धा थोडंसं बोलायला हवंच. आपलं मूल हे दत्तक प्रक्रियेतून घरी आलं असेल तर, त्यात कमीपणा किंवा लपवण्यासारखं काही नसतंच, तसंच मिरवण्यासारखं पण काही नसतंच. आपलं कुटुंब दत्तक या प्रक्रियेमुळे कसं पूर्ण झालं हे सांगण्यासाठी आपल्या मनात किंतु का? प्रत्येकानं थोडंसं चाचपून बघावं, ‘मला हा विषय माझ्या मुलांशी बोलायची भीती वाटते का?’, ‘मला दत्तक प्रक्रियेबद्दल, ‘समाजाचं देणं’, ‘त्याचा अभिमान’ असं वाटतं का?’, ‘दत्तक प्रक्रियेला मी स्वत: किती स्वीकारलं आहे?’ या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदा मिळाली की पुढील प्रवास हा फक्त आनंद देणारा असाच असतो. कुठलंही मूल जन्माला येतं किंवा दत्तक प्रक्रियेतून घरी येतं, ते फक्त चैतन्य घेऊनच. खरं तर दत्तक प्रक्रियेतून पालक झालेल्यांनी स्वत:च्या मनात डोकावून बघावं, ‘हे चैतन्य आपल्या घरात ज्या अनामिक जन्मदात्रीमुळे आले तिच्याबद्दल आपल्या मनात खरंच आदर आहे का?’

मुलं मोठी होताना यावरील काही अनुभवांतून गेली तर काहींना याचा बराच त्रास होतो. त्यांची स्वत्वाची लढाई सुरू होते, त्याही वेळेस आपण या सगळ्यांची जबाबदारी घेत नाही. जी मुलं या भावनेतून जात असतात त्यांच्या मनोवस्थेबद्दल खरंच आपण काहीच समजू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की करू शकतो, ‘‘मी तुझ्यासोबत आहे आणि तू आम्हाला हवा आहेस.’’असं म्हणू शकतो. मी कुणाला तरी हवा आहे, ही भावनाच खरं तर प्रत्येकाला जगण्याची ऊर्मी देत असते.

प्रत्येक मूल, पालक आणि समाजातील सगळ्यांनी दत्तक या प्रक्रियेकडे फक्त ‘एक कुटुंब पूर्ण होण्यासाठी असलेली प्रक्रिया’ या दृष्टीनं बघितलं तर सगळे बदल आपोआप होताना दिसतील. चला तर हा बदल आपण सगळे मिळून करू  या.. आहात ना तुम्ही आमच्यासोबत?

संगीता बनगीनवार sangeeta@sroat.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2017 2:44 am

Web Title: negative impact of community thoughts on adopted children
Next Stories
1 दत्तक एकल पालकत्व
2 समाधानी आयुष्याचं गुपित
3 संवेदनशील
Just Now!
X