पालघर: महावितरण देयकांच्या भरण्याबाबत भलतेच आक्रमक झालेले दिसत आहे. देयक भरणा तारखेपूर्वीच महावितरणकडून टेलीकॉलिंगद्वारे सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच लाइनमन्सकडून धमक्या देण्याचे प्रकारही घडत आहेत. महावितरणच्या या तगाद्यामुळे आपला छळ होत असल्याची तक्रार ग्राहक करत आहेत.

देयके भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर ग्राहकाला १४ दिवसांची नोटीस बजावणे आवश्यक आहे. परंतु महावितरण मात्र देयके भरण्याच्या अंतिम दिवसांच्या सहा ते आठ दिवसांआधीपासूनच टेलीकॉलिंग पद्धतीने ग्राहकांना देयके भरण्याची आठवण करून देताना दिसत आहे. ज्या ग्राहकांच्या मासिक बिलाची रक्कम अधिक असते त्यासाठी लाइनमन पाठवून, अगदी सुट्टीच्या दिवशीसुद्धा देयक भरणा करण्याविषयीची आठवण करून देणे, काही वेळा तर चक्क धमकावणे आदी प्रकार पालघर, बोईसर येथे सुरू आहेत. या मानसिक छळाला अनेक ग्राहक कंटाळले आहेत खरे पण महावितरणकडे याबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्याचे धाडस कोणाचे होत नसल्याचे सांगण्यात येते.

या संदर्भात महावितरणच्या पालघर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता महावितरणकडे असलेली थकबाकी रक्कम कमी करण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाइल, केबल, सॅटेलाइट टीव्हीची देयके भरण्यासाठी ज्या प्रकारे आगाऊ सूचना देण्याची पद्धत आहे तशीच महावितरणने सुरू केल्याचे सांगण्यात आले. दर महिन्याला मोठय़ा रकमेचे देयक येणाऱ्या ग्राहकाला प्रत्यक्षात लाइनमनद्वारे सूचित केले जात आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. परंतु कोणत्याही ग्राहकाचे नियमबाह्य विद्युत जोडणी तोंडात आली नसल्याचे, अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बोर्डी (डहाणू) येथे एका ८४ वर्षीय शेतकऱ्याने चुकीच्या मीटर रीडिंगमुळे किमान ४० हजार रुपयांचा अतिरिक्त भरणा केला असताना ही रक्कम देयकाध्ये नमूद न करता दरमहा दोन ते चार हजार रुपयांचे देयक येणे, सुरूच राहिले आहे. विद्यमान देयक रकमेचा भरणा न केल्यास विद्युतप्रवाह खंडित करू अशी धमकी लाइनमन देतात. अतिरिक्त जमा असलेल्या रकमेचा देयकावर उल्लेख व्हावा यासाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. यासंबंधी डहाणू येथील कार्यालयात या गृहस्थांनी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्या ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी करून हाकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अवास्तव देयकांमुळे ग्राहक वैतागले
पालघर विभागात अनेक ठिकाणी ग्राहकांना भरमसाट वीजदेयके पाठवण्यात आली. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी महावितरणकडे व्यवस्था पुरेशी नाही. त्यामुळे देयक दुरुस्तीकरिता मोठी रांग लागत असते. देयकाच्या रकमेत दुरुस्ती होईपर्यंत त्या रकमेचा अंशत: भरणा करून विद्युतप्रवाह खंडित होण्यापासून रोखण्यासाठी सल्ला देण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. देयक दुरुस्त न होता अंशत: भरणा केल्यास आगामी देयकामध्ये विलंब आकार तसेच थकीत रकमेवरील व्याज जोडण्यात येते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे.

देयके भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर १४ दिवसांची नोटीस दिल्याखेरीज विद्युत जोडणी कापणे गैर आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई मागण्याची कायद्यात तरतूद आहे. – नरेंद्र पाटील, अध्यक्ष, सोसायटी फॉर फास्ट जस्टिस, डहाणू