दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद

कासा : पालघर जिल्ह्यात जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी डोंगराळ भागातील रुईघर, बोपदरी या सीमालगत भागातील जिल्हा परिषद शाळांना चक्क कुलूप लावल्याचे दिसून आले. शिक्षकच दांडी मारत असल्याने शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. 

railway police arrested youth for molested of girl student in gitanjali express
गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग….
Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
ravindra shisve
माझी स्पर्धा परीक्षा: अपयश म्हणजे अंत नाही
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

जव्हार तालुक्यातील दाभेरी रुईघर, बोपदरी हे महाराष्ट्रातील सिल्वासा आणि गुजरात या दोन राज्यांना सीमालगत असलेली गावे आहेत. मात्र या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पालघर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य मनीषा बुधर आणि पंचायत समिती सदस्य ज्योती बुधर यांनी चंदोशी आणि बचकेचीमाळी या दोन जिल्हा परिषद शाळांना दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अचानक भेटी दिल्यानंतर या दोन्ही शाळांना कुलूप लावल्याचे दिसून आले.

 चंदोशी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १ली ते ४ थीपर्यंत एकूण १५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर बचकेचीमाळी जिल्हा परिषद शाळेत एकूण १६ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समजले. शाळेत शिक्षक तर नव्हतेच, मात्र एकही विद्यार्थी शाळेच्या आजूबाजूला दिसला नाही. जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, शाळा नेहमीच बंद राहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील रुईघर- बोपदरी जिल्हा परिषद शाळेचीही अशीच अवस्था आहे. येथील काही शिक्षक मुलांचे आधार कार्ड गोळा करण्यासाठी घरी गेले होते, तर काही ठिकाणी चक्क शाळांना कुलूप लावले होते.  काही शाळांवरील शिक्षक दुपारी ३ वाजेपूर्वीच निघाले होते. मात्र जिल्हा शिक्षण समिती  आणि पंचायत समिती सदस्य यांचा दौरा असल्याचे लक्षात आल्यानंतर घरी निघालेले  काही शिक्षक अध्र्या रस्त्यातून परतले. शाळा बंद ठेवणे, उशिरा येणे, लवकर निघून जाणे, असे गंभीर प्रकार येथे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रुईघर, बोपदरी, चंदोशी, बचकेचीमाळी, गोडंपाडा या सीमालगत शाळा जव्हार तालुक्यापासून ४० कि. मी. अंतर असल्याने, या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्याचे आहे. करोनामुळे मागील दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातच अशा प्रकारामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यामधील सर्व शिक्षकांनी वेळेवर शाळेत जाऊन पूर्णवेळ विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, अशी वारंवार सूचना पत्रके काढण्यात आली आहेत. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे वारंवार शाळांना भेटी देऊन शाळाच्या कामकाजाबाबतचा अहवाल कार्यालयास देत असतात. तरीसुद्धा असा काही प्रकार घडला असल्यास गटशिक्षण अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून शिक्षक दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल – लता सानप, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद.