News Flash

तुझे आहे मनापाशी

माझ्या आईने लहानपणी केव्हातरी सांगितलेली एक गोष्ट आहे.

|| उत्पल व. बा.

माझ्या आईने लहानपणी केव्हातरी सांगितलेली एक गोष्ट आहे. प्रेषिताची. ती खरी-खोटी-दंतकथा जी काही असेल ती असेल, पण माझ्या चांगली लक्षात राहिली. प्रेषित आणि त्याचा एक शत्रू-अशा दोघांमध्ये युद्ध चालू आहे. दोघांच्याही तलवारी भिडल्या आहेत. एका क्षणी या प्रेषिताने आपल्या प्रतिस्पध्र्याला चीत केलं आणि तलवारीचं टोक त्याच्या छातीवर ठेवलं. तो घाबरून देवाचा धावा करू लागला. ‘‘आता मला कोण वाचवणार?’’ म्हणू लागला. तेव्हा प्रेषिताने तलवार बाजूला केली आणि त्याचा हात धरून त्याला उठवत म्हणाला, ‘‘मी आहे ना तुला वाचवायला!’’

‘एकातलं अनेक असणं’ कसं आवश्यक आहे याची जाणीव होत असण्याच्या टप्प्यावर आज ही कथा वेगळ्या महत्त्वाने आठवते. या सदराच्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘एकावर सगळा भार नाही. जे आहे ते दोघांचं आहे.’ हे समजणं माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. आणि विविध संदर्भात पाहू जाता केवळ दोनच नाही तर अनेक घटक एकाच वेळी अस्तित्वात असतात हेही लक्षात आलं. एक गमतीशीर उदाहरण द्यावंसं वाटतं. ‘नटसम्राट’ नाटकातल्या प्रसिद्ध स्वगतात गणपतराव बेलवलकर जसं ‘मी आहे हॅम्लेट, मी ऑथेल्लो, मी ज्यूलियस सीझर, मी आहे प्रतापराव आणि मी सुधाकर’ असं म्हणतात तसं आपणही स्वत:ला ‘मी विवेकी, मीच विकारी, मी गोंधळलेला, मी ठाम, मी तर्कशुद्ध, मी भावनिक’ असं म्हणू शकतो. वरील कथेत प्रेषित ‘दोन भूमिका’ निभावतात आणि त्यातून एक शिक्षण होतं. आपण आपल्या अंतरातल्या विविध प्रवाहांकडे शांतपणे बघत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवत, योग्य वेळी योग्य प्रवाहाला वाट देऊ  शकलो तर मानवी नातेसंबंधांना विधायक वळण मिळू शकेल का?

मागच्या लेखाच्या अखेरीस ‘मानवी नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत चर्चा करू’ असं आपण म्हटलं होतं, पण मला वाटतं आधी ‘मानवी नाती’ या मूळ विषयाच्या आजूबाजूने थोडं भटकून येऊ. आपण माणसं म्हणजे ‘जैव उत्पादन’ आहोत. आणि हे उत्पादन लक्षावधी वर्षांपासून ‘मॉडिफाय’ होत आलं आहे. यात ज्या मूलभूत, अस्तित्व टिकवण्याशी संबंधित मनोवृत्ती आहेत त्या टिकलेल्या असल्या तरी त्यातही अनाकलनीय बदल व्हायची शक्यता असते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याला डोक्यावर घेणारी माकडीण पाणी वर चढू लागल्यावर पिल्लाच्या डोक्यावर उभी राहते ही गोष्ट आपण वाचली आहे. पण या गोष्टीच्या उलटही घडू शकतं. विशेषत: माणसाच्या बाबतीत. माणसाने सामाजिकतेचा मोठा ‘फोर्स’ तयार केल्याने हे होतं. त्यामुळे ‘माणूस कसा आहे?’ याचं एकच एक उत्तर नाही. अठराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो याने ‘आपण निसर्गत: कसे आहोत हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही’ असं म्हटलं होतं. इथे त्याचाही रोख ‘निसर्गभावी आकांक्षा-उर्मीकडून समाजभावी आकांक्षा-उर्मीकडे’ असणाऱ्या माणसाच्या प्रवासाकडे आहे. माणसाच्या या गतिशील, अनिश्चित रचनेमुळे मानवी नातेसंबंध ‘डिफाइन’ करणारा एक नेमका धागा पकडता येत नाही. मानवी नातेसंबंधांवर अंतिम असं भाष्य करता येत नाही.

माणसाला माणूस हवा असतो तसाच तो नकोही असतो. ‘हेल इज अदर पीपल’ हे सात्र्चं विधान प्रसिद्ध आहे. माणूस ‘स्व’ आणि ‘पर’ या द्वैताशी कायम झुंजत असतो. त्याच्या विचारविश्वाला अनेक पदर असल्याने त्याचे मनोव्यापार एकाच दिशेने जाणारे नसतात. माणसाचं वर्तन घडवणारं माणसाचं मन त्याला अनेक दिशांकडे खेचतं. हे असं सर्वच माणसांचं होतं आणि त्यातून ‘नात्यांचं गतिशास्त्र’ आकाराला येतं. तुटलेल्या/तुटत चाललेल्या नात्यापासून अगदी घट्ट बांधलेल्या नात्यापर्यंत नात्यांच्या विविध ‘श्रेणी’ आपण सगळेच अनुभवतो. मानवी नात्यांवर प्रभाव टाकणाऱ्या भावना नात्यासाठी विघातक किंवा विधायक असतात. यात प्रेम, द्वेष, राग, असूया अशा सगळ्याच भावना येतात. यातला ‘प्रेम’ हा एक ‘बॅलन्सिंग फोर्स’ आहे. माणसाच्या – खरं तर सर्वच सजीवांच्या मनात ‘प्रेम’ ही भावना कधी-कशी उत्पन्न झाली, विशेषत: माणसाच्या बाबतीत प्रेमाच्या विविध ‘जातकुळी’ कशा निर्माण झाल्या हा एक संशोधनाचा विषय आहे. पण माणसाला ‘स्व’पासून अंशत: तरी वेगळं करून ‘पर’पाशी (ध्यानीमनी नसताना इथे ‘परपाश’ हा श्लेष झाला आहे!) न्यायची ताकद प्रेम या भावनेत आहे. स्त्री-पुरुष संदर्भात किंवा जिथे ‘रोमँटिक लव्ह’ कार्यरत असतं तिथे ‘स्व’ आणि ‘पर’च्या एकमेकांतील तीव्र गुंतवणुकीमुळे समतोल बिघडतो, पण सामाजिक प्राणी म्हणून माणसाला प्रेम ही भावना तिच्या विविध रूपांत (अनुकंपा, मैत्री, कृतज्ञता इत्यादी) एकमेकांशी जोडून घ्यायला, एकमेकांना समजून घ्यायला मदत करते. ‘रोमँटिक लव्ह’चं उगमस्थान शोधू गेलं तर ते मानसिक जोडलेपणापाशी सापडू शकतं तसंच शारीरिक जोडलेपणापाशीदेखील सापडू शकतं. प्रेम आणि लैंगिकता हे ‘परस्परोद्भव’ असू शकतात. प्रेमाच्या इतर जातकुळींचं उगमस्थान नैतिकतेपाशी आहे. नैतिक टोचणीतून त्या निर्माण होतात. अगदी रोमँटिक प्रेमदेखील त्याची तीव्रता कमी होऊ लागली तरी नैतिक टोचणीतून जिवंत राहू शकतं.

नातेसंबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येकच विघातक/विधायक भावनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विचार करणे ही ‘भावनिक साक्षरतेची’ पहिली पायरी आहे. भावना, जाणीव या गोष्टी ‘अचल’, दरवेळी नेमकेपणाने सांगता येतीलच अशा नसतात. पण तरी ‘स्व’ने त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागतं, कारण त्या ‘स्व’वर मोठा परिणाम घडवत असतात. आपण प्रेमाचा विचार केला तसाच द्वेषाचा, असूयेचा, इतर भावनांचा करता येईल. तटस्थपणे हा विचार करणं, विविध भावना ‘डीकोड’ करता येणं आणि ‘स्व’ व या भावना यात फरक करून ‘स्व’ला शांत, स्थिर राखायचा प्रयत्न करणं ही एक हितकारक सवय आहे. आदर्शाच्या पातळीवर आणि व्यवहाराच्या पातळीवर सर्वच बाबतीत फरक पडतो हे अगदी खरं आहे, पण सुरुवात म्हणून आपण जर असं विश्लेषण करू शकलो तर खूप मदत होईल. या विश्लेषणाची पुढची पायरी ज्या संबंधित व्यक्तीबाबत विशिष्ट भावना प्रबळ आहे त्या व्यक्तीशी त्याबाबत बोलता येणं ही आहे.

‘खेळघर’ या रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या कादंबरीत ‘आपल्या बहुतेक सर्व समस्यांच्या मुळाशी किडलेले नातेसंबंध’ आहेत असा उल्लेख आहे. विचार करावा असं हे विधान आहे. नातेसंबंधांचं स्वरूप गुंतागुंतीचं आहे. माणसाच्या मनातील विघातक आणि विधायक भावना, त्यांची विविध रूपे, विभिन्न सामाजिक आणि आर्थिक चौकटी, परिस्थितीजन्य कारणं अशा बऱ्याच कारणांनी मानवी नातेसंबंध घडत किंवा बिघडत असतात. त्याचा एकूण समाजस्वास्थ्यावर परिणाम होत असतो म्हणून त्याविषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. ‘ब्लॉकेजेस’ तपासली पाहिजेत. अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधांबाबत हे होऊ शकलं तर त्यातून नवीन रचना उत्क्रांत होऊ शकेल. आपण जर नीट पाहिलं तर असं दिसेल की भावना डीकोड करणं, त्याबाबत बोलणं, नातेसंबंधांचं पुनरावलोकन करत राहणं या ‘जीवनकौशल्या’चं शिक्षण आपल्याकडे दिलं जात नाही. एकुणातच ‘जीवनकौशल्ये’- लाइफ स्किल्स – हा आपल्याकडे दुर्लक्षित विषय आहे. पौगंडावस्थेतील / तरुण वयातील मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले तरी आपल्याला संकट आल्यासारखं वाटतं. मग प्रेम, राग, आकर्षण, लैंगिक इच्छा आणि इतर भावनांचे आवर्त प्रत्येकाला आपल्या मनातच जिरवावे लागतात. त्याबाबत बोलायला आपल्याकडे व्यासपीठ नाही. कुटुंबसंस्थेने हे व्यासपीठ खरं तर द्यायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. भावना व्यक्त करायची योग्य भाषाही आपण नीटशी विकसित करू शकलेलो नाही. त्यामुळे आपल्याला सुरुवात तर मुळापासून करावी लागेल असं दिसतं.

utpalvb@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2018 12:04 am

Web Title: hell is other people
Next Stories
1 मागे, मध्यात आणि पुढे
2 ‘आँखों देखी’ची दृष्टी
3 का आणि कसं?
Just Now!
X