
शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडाचा आज आठवा दिवस आहे. त्यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात असून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीनंतर आधी गुजरात आणि नंतर गुवाहाटीला पोहोचलेले शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहेत.

सध्या एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणार्या शिंदेंबद्दल जाणून घेऊया.

निष्ठावंत ठाणेकर शिवसैनिक अशी ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला.

घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना लहान वयातच मुंबई गाठावी लागली.

आर्थिक अडचणींमुळे एकनाथ शिंदेंनी मासे विकणाऱ्या, दारूच्या कंपनीतही काम केले आहे.

आज ७० लाखांच्या गाड्यांचे मालक असणारे शिंदे ठाण्यात एके काळी रिक्षाचालक होते.

वयाच्या अवघ्या १८व्या वर्षापासूनच त्यांनी शिवसेनेसाठी काम करायला सुरुवात केली.

ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ असलेल्या आनंद दिघे यांचे शिंदे निकटवर्तीय होते.

शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात ते सहभागी व्हायचे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीचार्जही सहन केला आहे.

शिंदेंच्या नावावर १८ गुन्हे दाखल आहेत. परंतु, यातील एकातही त्यांची गुन्हेगारी सिद्ध झालेली नाही.

वयाच्या २०व्या वर्षी ते शिवसेनेचे शाखाप्रमुख बनले. त्यानंतर ते नगरसेवकही झाले.

२००१ मध्ये मात्र शिंदेंवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पोटच्या दोन लहान मुलांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता.

शिंदेंचे राजकारणातील गुरू आनंद दिघे यांनी त्यांना सावरलं. ठाणे महापालिकेचं सभागृह नेतेपद देऊन एकनाथ शिंदेंना व्यग्र ठेवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला.

आनंद दिघेंमुळे मोठ्या प्रसंगातून सावरल्याचं शिंदेंनी अनेकदा मुलाखतीतून सांगितलं आहे. त्यानंतर मात्र त्यांनी पुर्णपणे आपलं लक्ष कामावर केंद्रित केलं.

२००४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आले आहेत.

शिवसेनेने भाजपासोबत युती केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळालं. २०१५-१९ दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिलं आहे.

२०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव चर्चेत होतं.

परंतु, त्यांना नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विकास या खात्यावरच समाधान मानावं लागलं.

घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे अर्धवट शिक्षण सोडलेल्या शिंदेंनी वयाच्या ५६व्या वर्षी कला शाखेची पदवी संपादन केली.

एकनाथ शिंदे आता तब्बल ८ कोटी संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे पिस्तुल आणि रिव्हॉल्व्हरदेखील आहे.

शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे हादेखील खासदार आहे. तो पेशाने डॉक्टर आहे.

एकनाथ शिंदे मुंबईत आल्यावर महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला कोणतं वळण लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (सर्व फोटो : एकनाथ शिंदे/ फेसबुक, इन्स्टाग्राम)