सोलापूर : तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी सोलापुरात उभारण्यात येणाऱ्या रे नगर गृहप्रकल्पाचे श्रेय सत्ताधारी भाजपने लाटण्याचा प्रयत्न केला असताना या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी १४ वर्षे संघर्ष करणारे माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी भाजपला फटकारत सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्याच वेळी प्रणिती शिंदे प्रतिनिधित्व करीत असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेवर माकपचा दावाही त्यांनी केला आहे.

आडम मास्तर हे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. १९७८ साली सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून सर्वप्रथम विधानसभेवर निवडून गेलेले आडम मास्तर यांनी नंतर १९९५ आणि २००४ साली तत्कालीन सोलापूर शहर दक्षिणमधून विधानसभेत लढाऊ बाणा दाखवत प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यानंतर २००९ ते मागील २०१९ पर्यंत सलग तीन विधानभा निवडणुकीत ते शहर मध्य जागेवर आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभूत झाले होते. या दरम्यान, आडम मास्तर आणि आमदार प्रणिती शिंदे एकमेकांस पाण्यात पाहात होते. २० वर्षांपूर्वी सोलापूरजवळ कुंभारी येथे आडम मास्तर यांनी दहा हजार महिला विडी कामगारांसाठी उभारलेल्या गोदूताई परूळेकर घरकूल प्रकल्पाचे लोकार्पण तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केले होते. परंतु या महत्वाकांक्षी गृह प्रकल्पाला सुशीलकुमार शिंदे यांनी अडथळे आणल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला होता. त्यानंतर तब्बल ३० हजार असंघटित कामगारांसाठी रे नगर योजनेंतर्गत जगातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाच्या उभारणीलाही विरोध झाला होता. दुसरीकडे भाजपचे तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही विरोध करीत, या गृहप्रकल्पाला जातीय रंग चढवत तीव्र विरोध केला होता. या गृहप्रकल्पाचे लोकार्पण गेल्या १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. परंतु या गृहप्रकल्पाचे संपूर्ण राजकीय श्रेय भाजपने घेण्याच्या प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यावर जोरदार आक्षेप घेताना आडम मास्तर यांनी या रे नगर योजनेसाठी सतत १४ वर्षे केलेल्या संघर्षाची पूर्वपीठिका सांगितली. या योजनेवर सत्ताधाऱ्यांच्या नात्याने केवळ शिक्का मारला म्हणून त्याचे श्रेय भाजपला घेता येणार नाही, अशा शब्दांत आडम मास्तर यांनी फटकारले आहे.

हेही वाचा –  ममतादीदींच्या भाच्यासमोर कोणाचं आव्हान? डायमंड हार्बर कोण जिंकणार?

हेही वाचा – ‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा

या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांनी पारंपरिक विरोधक आडम मास्तरांशी जवळीक साधत त्यांचा पाठिंबा मिळविला आहे. यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना आडम मास्तर यांनी देशातील लोकशाही आणि संविधान मोदी सरकारने धोक्यात आणून हुकूमशाही आणि धर्मांधसत्ताक राजकीय पद्धतीच्या दिशेने चुकीचे पाऊल उचलले आहे. कामगार, शेतकरी, बेरोजगार तरुण, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांच्या विरोधात मोदी सरकारची भूमिका असल्यामुळेच त्यास प्राणपणाने विरोध करून सोलापुरात काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या प्रभावाखालील मते काँग्रेसकडे वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.