दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या अंतरिम जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले आहे. ते तुरुंगातून कशाप्रकारे सरकार चालवणार आहेत, पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आले तर काय होईल आणि भाजपाला यावेळी सत्ता का मिळणार नाही, अशा विविध प्रश्नांवर त्यांनी रोखठोक भाष्य केले आहे. त्यांच्या मुलाखतीमधील काही अंश…

प्रश्न : तुरुंगात पाठवले गेलेले तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात. सध्या तुम्ही अंतरिम जामिनावर बाहेर आहात, याबद्दल तुम्ही काय सांगाल?

सध्या देश मोठ्या कठीण काळातून जात आहे. फारच वेगाने आपण हुकूमशाहीकडे निघालो आहोत. केंद्रातील भाजपा सरकारने आधी हेमंत सोरेन (झारखंडचे माजी मुख्यमंत्री) यांना अटक केली आणि त्यानंतर मला अटक झाली. माझी अटक करून ते देशाला एकप्रकारे संदेश देऊ इच्छित आहेत. तो संदेश असा की, जर आम्ही चुकीच्या आरोपाखाली केजरीवाल यांना अटक करू शकतो तर मग आम्ही देशातील कुणालाही अटक करू शकतो. त्यामुळे आम्हाला घाबरून रहायला हवे आणि आम्हाला हवे तसेच लोकांनी वागायला हवे, असे त्यांचे म्हणणे आहे. ही सगळी हुकूमशाहीची लक्षणे आहेत. लोकशाहीमध्ये लोकांचे म्हणणे एकून घ्यायचे असते. मात्र, इथे लोकांनी फक्त त्यांचेच ऐकावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. या सगळ्या प्रकारापासून आपल्याला देश वाचवायचा आहे. ही देखील स्वातंत्र्याची लढाईच आहे. मला प्रेरणा दिलेल्या अनेक लोकांनाही दीर्घकाळ तुरुंगवास झालेला होता. मी भ्रष्टाचारी आहे म्हणून नव्हे तर मला देश वाचवायचा असल्याने तुरुंगात जावे लागते आहे. ज्या प्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांना तुरुंगात जावे लागले, त्याचप्रमाणे देशाची राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्हालाही तुरुंगात जावे लागते आहे. मी नेहमीच असे म्हणत आलो आहे की, या देशासाठी मी माझे आयुष्य द्यायला तयार आहे. या सगळ्या त्यागाचाच हा भाग आहे.

हेही वाचा : Loksabha Election 2024 : देशातल्या ‘इतक्या’ उमेदवारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप

प्रश्न : मद्यधोरण घोटाळा झाला नसल्याचा दावा तुमचा पक्ष करतो आहे; मात्र अद्याप न्यायालयाला ते मान्य झालेले नाही, याकडे तुम्ही कसे पाहता?

PMLA कायद्याने आपल्या न्यायव्यवस्थेलाच डोक्यावर घेतले आहे. सामान्यत: एखादा गुन्हा घडला तर आधी एफआयआर दाखल केला जातो, मग तपास होतो, त्यानंतर न्यायालयात खटला दाखल होऊन एखादा व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे ते सिद्ध केले जाते. मग दोषी व्यक्तीला शिक्षा दिली जाते. मात्र, आता सगळा कायदा उलटा झाला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्याला पहिल्याच दिवशी अटक केली जाते. त्यानंतर मग तपास सुरू असेपर्यंत त्या व्यक्तीला तुरुंगात राहण्याची शिक्षा दिली जाते. जेव्हा त्या व्यक्तीचे निर्दोषत्व न्यायालयाकडून मान्य केले जाते, तेव्हा त्याला तुरुंगातून मुक्त केले जाते. PMLA कायदा हेच करतो, त्यामुळे कुणालाही जामीन मिळत नाही. विशेष म्हणजे, या कायद्यानुसार दोषी आढळण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. सगळे खटले खोटे असतात. फक्त विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठीच हा कायदा आणला गेला आहे. एकतर विरोधकांनी तुरुंगात जावे किंवा भाजपामध्ये यावे, अशी त्यांची इच्छा आहे.

प्रश्न : भाजपा आम आदमी पार्टीला लक्ष्य करतो आहे, असे तुम्हाला का म्हणावेसे वाटते?

आम आदमी पार्टीने अत्यंत कमी वेळात मोठे यश संपादन केले आहे. पंतप्रधान मोदींना भेटणारे अनेक लोक आमचेही मित्र आहेत. ते आम्हाला सांगतात की, मोदी आम आदमी पक्षाबाबत नेहमी चर्चा करतात. ते म्हणतात की, भविष्यात आम आदमी पार्टी अनेक राज्यांमध्ये तसेच देश पातळीवर भाजपाला आव्हान देईल. त्यांना आम्ही कळीच्या स्वरूपात असतानाच आमचे अस्तित्व खुडायचे आहे. आम्हाला मोठे होऊ द्यायचे नाही. सध्या ते ‘ऑपरेशन झाडू’ चालवत असून त्याअंतर्गतच ते आपच्या नेत्यांना अटक करत आहेत. महाधिवक्ता राजू यांनी असे वक्तव्य केले आहे की, निवडणुका झाल्यानंतर आमची खाती गोठवण्यात येतील. आमची कार्यालये निकामी करण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आम आदमी पक्ष हा काही चार जणांचा पक्ष नाही, हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. हा एक देशव्यापी विचार आहे. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आम्ही जे काम करून दाखवले आहे, ते यापूर्वी कुणीही करून दाखवलेले नव्हते. आम्हाला पंजाबमध्ये मोठा विजय का मिळाला? कारण आम्ही दिल्लीमध्ये केलेले काम पंजाबला आवडले. गुजरातमधील लोक आम्हाला मते का देतात? आम्ही दिल्ली-पंजाबमध्ये करत असलेल्या कामाचा प्रभाव तिथे पडतो आहे.

प्रश्न : अंतरिम जामीन मिळाल्यानंतर एका प्रचारसभेत तुम्ही म्हणालात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५ व्या वर्षी निवृत्त होतील आणि गृहमंत्री अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल. तुम्ही असे का म्हणालात? त्यावर अमित शाह यांनीही प्रत्युत्तर देत खुलासा केला आहे.

अमित शाह आणि इतर अनेकांनी त्यावर खुलासा करत पंतप्रधान मोदींना एकप्रकारे विनंती केली आहे की, तुम्ही निवृत्त होऊ नका. मात्र, पंतप्रधान मोदींनी याबाबत कुठे खात्री दिली आहे? जर त्यांनीच तयार केलेले नियम तेच पाळणार नसतील तर देशातील लोक म्हणतील की, फक्त आडवाणींची राजकीय कारकीर्द समाप्त करण्यासाठीच हा नियम तयार करण्यात आला होता. मी निवृत्त होणार नाही आणि हा नियम मला लागू नाही, असे पंतप्रधान मोदी स्वत: म्हणाले तर मी त्यावर विश्वास ठेवेन. कारण इतर नेते अर्थातच असे म्हणतील की, मोदी निवृत्त होणार नाहीत. भाजपामध्ये नेतृत्व कुणाच्या हातात जाणार यावरून तीव्र स्पर्धा सुरू आहे. अमित शाह यांनी पंतप्रधान व्हावे, अशी मोदींची इच्छा आहे. मात्र, उर्वरित भाजपाला हे मान्य नाही.

प्रश्न : तुम्ही तुरुंगातूनच सरकार चालवाल असे म्हटले आहे, हे तुम्ही कसे करणार आहात? याची परवानगी मिळाली नाही तर काय कराल?

मी राजीनामा का देत नाही ते आधी मी स्पष्ट करतो. मी खुर्चीला चिकटून बसलो असल्याचा आरोप काही जण माझ्यावर करत आहेत. खुर्चीची अथवा पदाची मला लालसा नाही. जेव्हा मी आयकर आयुक्त होतो, तेव्हा दिल्लीतील झोपडपट्टीमध्ये १० वर्षे काम करण्यासाठी राजीनामा दिला होता. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा मी फक्त ४९ दिवसांत राजीनामा दिला. मी हे माझ्या तत्त्वांसाठी केले. यावेळी मी राजीनामा देत नाही, कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. भाजपाला हे कळले आहे की, ते आपला दिल्लीमध्ये पराभूत करू शकत नाहीत, म्हणूनच त्यांनी आता खोट्या आरोपाखाली मला अटक केली आहे. जर मी राजीनामा दिला तर सरकार पाडण्यात ते यशस्वी ठरतील. हे लोकशाहीसाठी मारक आहे. जर आज मी राजीनामा दिला तर उद्या ते ममता बॅनर्जी आणि पिनाराई विजयन यांच्या सरकारच्या मागे लागतील. जिथे जिथे भाजपा सत्तेत येऊ शकत नाही, तिथे मुख्यमंत्र्याना अटक केली जाते आणि सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जातात. म्हणूनच ही लढाई लढायला हवी. जर त्यांनी लोकशाहीला तुरुंगात कैद केले, तर लोकशाही तुरुंगातूनच चालवली जाईल; आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.

प्रश्न : ‘मला तुरुंगातून बाहेर ठेवण्यासाठी मत द्या’, असे आवाहन तुम्ही करत आहात. इंडिया आघाडीच्या मोठ्या उद्दिष्टासाठी हे मारक नाही का?

जेव्हा मी जमशेदपूरमध्ये जातो, तिथे मी हेमंत सोरेन यांच्यासाठी मते मागतो; जेव्हा मी पंजाबमध्ये गेलो तेव्हा तिथे मी वेगळे आवाहन केले. ही निवडणूक फारच स्थानिक मुद्द्यावर होते आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त मोदींच्या भोवती ही निवडणूक होताना दिसत नाही. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, झारखंड या सगळ्या ठिकाणची निवडणूक वेगवेगळ्या मुद्द्यांवर होते आहे. प्रत्येक ठिकाणी लोक वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी मते देत आहेत. या निवडणुकीमध्ये मोदी हा प्रभावी मुद्दा आहे, असे मला अजिबात वाटत नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये काही कारणास्तव ती परिस्थिती होती, मात्र यावेळी नाही.

प्रश्न : पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा सत्ता मिळाली तर काय होईल, असे तुम्हाला वाटते?

ते या देशाची राज्यघटना बदलतील आणि हा देश हुकूमशाहीकडे जाईल. एकतर देशात निवडणूक होणार नाही अथवा रशियामध्ये जशा निवडणुका होतात, तशा इथेही होतील. कारण तिथे पुतिन एकतर विरोधकांना तुरुंगात टाकतात किंवा त्यांची हत्या करतात. बांगलादेशमध्येही शेख हसीना विरोधकांना तुरुंगात टाकतात आणि प्रचंड मताधिक्याने विजयी होतात. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांना तुरुंगात टाकले गेले आणि त्यांचा पक्ष ताब्यात घेण्यात आला. अशा प्रकारच्या निवडणुका आपल्याही देशात होतील. संपूर्ण विरोधी पक्ष तुरुंगात जाईल आणि भाजपा आम्हालाच मते मिळत असल्याचा दावा करत सत्तेवर राहील. यावेळीही त्यांनी मला तुरुंगात टाकले, मनीष सिसोदीयांना टाकले. आमच्या पाच प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. ते आमची बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया करत आहेत. त्यांनी काँग्रेसबाबत हेच केले. हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे केले. त्यांचे चिन्ह चोरले. शिवसेनेचीही हीच अवस्था केली. ममता बॅनर्जींच्या सरकारमधीलही अनेक मंत्र्यांना अटक केली आहे. स्टॅलिन सरकारबरोबर घडताना दिसते आहे. आम्ही कोणत्या परिस्थितीत लढत आहोत, याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.

हेही वाचा : तेजस्वींच्या पाठदुखीवरून राजकीय वाकयुद्ध; पंतप्रधान मोदी म्हणतात, “बिहारचा शहजादा…”

प्रश्न : या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय असेल असे तुम्हाला वाटते?

भाजपाची मोठी पडझड होईल, याची तीन कारणे मला वाटतात. एक म्हणजे, देशातील बेरोजगारी आणि महागाई हा एक मोठा विषय झालेला आहे. लोकांना आपले घर चालवणेही कठीण होऊन बसले आहे. नोकऱ्यांचे प्रमाण प्रचंड घटले आहे. होतकरू तरुण रोजगाराअभावी घरी बसले आहेत. पंतप्रधान मोदी यावर काहीच बोलत नाहीत, हे लोकांना दिसते आहे. त्यामुळे मोदींकडून त्यांना काहीही अपेक्षा नाहीत. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदी अत्यंत निरर्थक वक्तव्ये करत असल्याचेही लोक पाहत आहेत. ते म्हणतात की, इंडिया आघाडी तुमचा पाण्याचा नळ आणि वीज काढून घेईल. दुसरा मुद्दा म्हणजे, या निवडणुकीमध्ये भाजपा एकसंध होऊन लढत नाही. नड्डा साहेबांनी अलीकडेच असे वक्तव्य केले आहे की, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. याचा अर्थ यावेळी संघ भाजपासाठी मैदानात उतरलेला नाही. भाजपाअंतर्गत पुढील नेतृत्व कुणाला मिळेल, याची रस्सीखेच सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमित शाह यांच्या हातात देश द्यायचा आहे; मात्र भाजपातील इतर नेत्यांना ते मान्य नाही. वसुंधरा राजे, शिवराज सिंह चौहान, रमन सिंह या सगळ्यांना बाजूला सारले गेल्यामुळे ते संतापलेले आहेत. योगीजींनाही बाजूला सारल्यामुळे तेही क्रोधित आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे हुकूमशाहीची चर्चा होत आहे. लोकांकडूनच हुकूमशाही हा शब्द मला खूपदा ऐकायला मिळाला. त्यामुळे लोकांना याची जाणीव झाली आहे, ही चांगली गोष्ट आहे. या तीन कारणांमुळे भाजपाला २२० पेक्षाही कमी जागा मिळतील. इंडिया आघाडीला ३०० हून अधिक जागा मिळतील.