“आम्ही निवडणुकीत पाठ मोडून प्रचार केला म्हणून आम्हाला हे यश मिळाले”, अशा स्वरूपाचे विधान नेतेमंडळी सर्रास करतात. मात्र, बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी हेच वाक्य शब्दश: खरे ठरू शकते. कारण, तेजस्वी यादव गेल्या महिनाभरापासून पाठीच्या त्रासाशी झुंज देत प्रचार करताना दिसत आहेत. बिहारमध्ये इंडिया आघाडीची मोट हाकण्याची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आहे. वेदनाशामक औषधे, व्हिलचेअरचा वापर आणि लंबो सेक्रल बेल्टचा वापर करून ते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.

तेजस्वी यादव – बिहारमध्ये इंडिया आघाडीचा चेहरा

लालू प्रसाद यादव यांच्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. कारण, त्यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करून भाजपाला जेरीस आणले होते. जेडीयूसोबत सत्ता स्थापन करून उपमुख्यमंत्रिपदही मिळवले. त्यामुळे राजकारणातील आपली क्षमता सिद्ध केलेल्या तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर आता लोकसभा निवडणुकीतही चांगली कामगिरी करून दाखवण्याची जबाबदारी आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत एनडीएमध्ये प्रवेश केल्यामुळे बिहारमधील इंडिया आघाडीच्या नेतृत्वाची जबाबदारी तेजस्वी यांच्या खांद्यावर येऊन पडली. पाठीचे दुखणे असतानाही ३४ वर्षीय तेजस्वी यादव बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तब्बल ३९ मतदारसंघांमध्ये विजय मिळवला होता.

हेही वाचा : काँग्रेस, आप नि भाजपा! एकावेळी तिघांशी कसा लढतोय शिरोमणी अकाली दल?

बिहारमध्ये सातही टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर तेजस्वी यांच्या पाठीचे दुखणे सुरू झाले. ३ मे रोजी ते लंगडत आणि सहाय्यकांच्या मदतीने चालताना दिसले. डॉक्टरांनी त्यांना अधिकाधिक विश्रांतीचा आणि वेदना कमी करण्यासाठी पट्टा वापरण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही तेव्हापासून तेजस्वी यांनी तब्बल १८३ प्रचारसभांना संबोधित केले आहे. इंडिया आघाडीच्या प्रचारासाठी अगदी मुंबई आणि दिल्लीमध्येही प्रचारसभा घेतल्या. बिहारमधील काशीगंज आणि भागलपूरमध्ये प्रचासभा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी येऊन गेले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही दोन सभा घेतल्या आहेत.

दुसरीकडे बिहारमध्ये एनडीए आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ तर गृहमंत्री अमित शाह यांनी सहा सभा घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी प्रत्येकी चार सभा घेतल्या आहेत. जेडीयूचे प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही संपूर्ण बिहारमध्ये प्रचार करत जवळपास ५० सभा घेतल्या आहेत.

तेजस्वींच्या पाठदुखीवरून राजकीय वाकयुद्ध

राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये तेजस्वी यादव यांच्या पाठदुखीवरूनही वाकयुद्द पहायला मिळाले. तेजस्वी यादव यांनी एका प्रचारसभेत असे म्हटले की, जोवर पंतप्रधान मोदी ‘बेड रेस्ट’ घेत नाहीत, तोवर ते शांत बसणार नाहीत. यावरून गोंधळ झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी स्पष्ट केले की, त्यांना ‘राजकारणातून निवृत्ती’ असे म्हणायचे होते. त्यानंतर मोतिहारीमध्ये प्रचारसभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा आधार घेत राजदवर टीका केली. ते म्हणाले की, “‘जंगल राज’च्या उत्तराधिकाऱ्यांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?” तेजस्वी यादव यांच्यासाठी अशाप्रकारची टीका नवी नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे राहुल गांधींना ‘काँग्रेसचा शहजादा’ म्हणून संबोधित करतात, अगदी त्याचप्रमाणे तेजस्वी यादव यांनाही ‘बिहारचा शहजादा’ म्हणून संबोधित करताना दिसतात.

रोजगार-महागाईच्या मुद्द्यावर प्रचार

२०२० च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना तेजस्वी यादव यांनी १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. हे आश्वासन आपण पूर्ण केल्याचा दावा ते करत आहेत. अगदी त्याचप्रमाणे या लोकसभा निवडणुकीतही ते रोजगार आणि महागाईच्या मुद्द्यांवर बोलत आहेत. निवडणुकीचा चौथा टप्पा सुरू झाल्यापासून तेजस्वी यादव यांनी आपल्या प्रचारामध्ये कल्याणकारी योजनांच्या आश्वासनावर अधिक भर दिला आहे. ते आपल्या प्रचारसभांमध्ये सांगत आहेत की, “जर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर आम्ही दहा किलो धान्य मोफत देऊ, तसेच प्रत्येक कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये मिळतील. गॅस सिलिंडरचे भाव कमी केले जातील आणि वर्षाला एक कोटी नोकऱ्यांची निर्मिती केली जाईल.”

पुढे एनडीए आघाडीवर टीका करताना तेजस्वी यादव राज्यघटनेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. सारणमधील एका प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की, “एनडीए आघाडी पुन्हा सत्तेत आल्यास राज्यघटना बदलली जाईल. आताची राज्यघटना असेल तोवरच तुम्हाला आरक्षण आणि समानतेचा हक्क मिळू शकतो.” तेजस्वी यादव यांच्या जवळच्या सहकाऱ्याने त्यांच्या पाठदुखीबद्दल माहिती देताना सांगितले की, वेदनाशामक औषधे घेऊन पाठदुखीची समस्या कमी होईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, त्यांच्या वेदना कमी झाल्या नाहीत. त्यांनी ६ मे रोजी पाटणामधील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार घेतले. त्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये समस्या असल्याचे निदान झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना अधिकाधिक विश्रांती घेण्याचा तसेच लंबो सेक्रल बेल्ट वापरण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : ‘लक्ष्मी भंडार योजने’वरुन तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये का जुंपली आहे?

८ मे रोजी उज्जरपूर लोकसभा मतदारसंघामधील प्रचारसभेत बोलताना तेजस्वी यादव यांनी आपल्या पाठीला बांधलेला पट्टा काढून समोरच्या जनसमुदायाला दाखवला. ते म्हणाले की, “माझ्या पाठीमध्ये असह्य वेदना असूनही मी फिरतोय. इंजेक्शन आणि औषधे घेतोय, पण निवडणुका पाच वर्षातून एकदा येतात. मला माहीत आहे की, जर मी आता लढलो नाही तर तुम्हाला आणखी पाच वर्षे गरिबी, महागाई आणि बेरोजगारीमध्ये घालवावे लागतील.” त्यांच्या या वक्तव्यानंतर समोरील लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. यानंतर ते म्हणाले की, “तरुणांना रोजगार मिळाल्याशिवाय मी विश्रांती घेणार नाही.”

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “माझ्या पाठीत वेदना आहेत. मात्र, लोकांमध्ये जाऊन प्रचार करणे यालाच माझे प्राधान्य आहे. मी एक खेळाडू असल्याने माझे शरीर आणि मन किती सहन करू शकते, याची मला जाणीव आहे. अधिक चांगला खेळाडू होण्यासाठी तुम्हाला अधिक सहन करावे लागते. काहीही झाले तरी संघासाठी तुम्हाला मैदानात उतरावेच लागते.” भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरु प्रकाश पासवान म्हणाले की, “तेजस्वी यांना स्वत:चा विचार करायचा असेल तर ते करू शकतात, मात्र बिहारच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मत द्यायचा विचार पक्का केला आहे.” राजदच्या एका नेत्याने म्हटले की, “तेजस्वी यादव यांच्यासमोर दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही. लालू प्रसाद यादव आपल्या तब्येतीच्या कारणास्तव प्रचारात उतरू शकत नाहीत. राहुल गांधी यांनी काही सभांना संबोधित केले आहे, मात्र सर्वांनाच माहित आहे की, बिहारमध्ये इंडिया आघाडीचा चेहरा तेजस्वी यादवच आहेत.”