पश्चिम बंगालमधील आसनसोल या हिंदी भाषिक प्रदेशातील प्रमुख भाजपा नेते जितेंद्र कुमार तिवारी पुन्हा चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर एनआयएच्या अधिकार्‍यांची भेट घेतल्याचा आरोप त्यांचा पूर्वीचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी)ने केला आहे. न्यू टाऊन येथील निवासस्थानी एनआयएचे अधिकारी पोलीस अधीक्षक धन राम सिंह यांची भेट घेऊन, पोलिस अधिक्षकाला पैसे देत, टीएमसी नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप जितेंद्र कुमार तिवारी यांच्यावर करण्यात आला आहे.

७ एप्रिल रोजी कोलकाता येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत टीएमसीचे सरचिटणीस कुणाल घोष व अर्थ राज्यमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी आरोप केला की, तिवारी यांनी एनआयए पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या हातात पांढरे पाकीट होते. त्या पाकिटात पैसे असल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. पूर्वा मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपतीनगरमधील टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तिवारी यांनी पोलीस अधीक्षक धन राम सिंह यांची ६ एप्रिलला भेट घेतल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. बुधवारी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने वृत्त दिले की, पोलीस अधीक्षकाला समन्स बजावण्यात आला असून दिल्लीतील एनआयए मुख्यालयात बोलावण्यात आले. परंतु तिवारी आणि भाजपाने टीएमसीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कोण आहेत जितेंद्र कुमार तिवारी?

जितेंद्र कुमार तिवारी मूळचे आसनसोलचे आहेत. त्यांनी वकील म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. ४५ वर्षीय जितेंद्र कुमार तिवारी यांनी २००६ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी राणीगंजमधून टीएमसीच्या तिकिटावर पहिली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत तिवारी यांचा पराभव झाला होता. २०११ मध्ये टीएमसी सत्तेवर आली आणि बंगालमध्ये पक्षाची ताकद वाढत गेली; ज्याचा फायदा तिवारी यांनाही झाला. ऑक्टोबर २०१५ मध्ये ते आसनसोल महानगरपालिकेचे (एएमसी) महापौर म्हणून निवडून आले. २०२० पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी आसनसोल महानगरपालिकेचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला.

हेही वाचा : NDA मध्ये पंतप्रधान मोदीच नेते, बाकी त्यांचे अनुयायी; तेजस्वी यादवांची टीका

२०१६ व २०२१ दरम्यान, ते टीएमसीचे पश्चिम वर्धमान जिल्हा अध्यक्ष होते. त्यासह ते आसनसोलमधील पांडबेश्वर येथील टीएमसीचे आमदारदेखील होते. त्यांचा हिंदी भाषकांकडे असणारा कल बघता, त्यांना पक्षाने बाजूला केले. बंगालची आणि झारखंडची सीमा लागून असल्याने, आसनसोलमध्ये मोठ्या संख्येने हिंदी भाषक स्थलांतर करतात; ज्यामुळे आसनसोलमधील ५० टक्के लोकसंख्या हिंदी भाषकांची आहे. डिसेंबर २०२० मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी आसनसोल महानगरपालिका प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदाचा आणि टीएमसी जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता.

जितेंद्र कुमार तिवारी यांचा यू-टर्न

सुरुवातीला स्थानिक भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनी आक्षेप घेतल्याने भाजपामध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता. या नेत्यांमध्ये आता टीएमसीमध्ये असणारे आसनसोलचे तत्कालीन खासदार बाबुल सुप्रियो, आमदार अग्निमित्रा पॉल यांच्यासह इतर भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला होता. तिवारी यांनी टीएमसी नेतृत्वाची माफी मागत त्वरित यू-टर्न घेतला आणि ते पक्षात परतले. टीएमसीने त्यांना पक्षात परत घेतले; मात्र महत्त्वाची पदे दिली नाहीत. अखेरीस २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी २ मार्च २०२१ रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने तिवारी यांना पांडबेश्वरच्या तिकिटावर उभे केले; परंतु ते टीएमसीच्या नरेंद्रनाथ चक्रवर्ती यांच्याकडून ३,८०३ मतांनी पराभूत झाले.

१४ डिसेंबर २०२२ ला आसनसोल येथे तिवारी यांच्या स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित ब्लँकेटवाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाला; ज्यानंतर पश्चिम बंगाल पोलिसांनी तिवारी यांना अटक केली. एप्रिल २०२३ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.

अलीकडेच त्यांनी केलेल्या एका चुकीच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत आली आहे. टीएमसीने अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांना आसनसोल येथून उमेदवारी दिली आहे. भाजपाने सुरुवातीला या जागेवरून भोजपुरी गायक पवन सिंह यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टीएमसीने सिंह यांची किती गाणी महिलांचा अपमान करणारी होती यावर टीका केली. त्यानंतर ते निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेत आहेत, असे पक्षाने जाहीर केले. अद्याप भाजपाने या जागेवर कोणाच्याही नावाची घोषणा केलेली नाही. परंतु, अशी चर्चा आहे की, तिवारी यांना आसनसोलचे तिकीट मिळू शकते. मूळचे बिहारचे असलेले सिन्हा हे मूळ आसनसोलचे असून, ते योग्य उमेदवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : “भारतात या, बघा आम्ही कसे जिंकतो?”; परदेशातील तब्बल २५ पक्षांच्या प्रतिनिधींना भाजपाने दिले निमंत्रण! दाखविणार ‘लोकशाहीचा सोहळा’

तिवारी यांनी एनआयए अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ते म्हणाले की, आसनसोल जागेसाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे आरोप करण्यात आले आहेत. “माझ्या पक्षाने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. उमेदवाराने काहीही फरक पडत नाही. आसनसोलचे लोक मोदीजींवर प्रेम करतात आणि ते भाजपाला मतदान करतील. उमेदवार कोणीही असो; माझी भूमिका महत्त्वाची असेल. कदाचित त्यामुळेच टीएमसी नेते घाबरून माझ्यावर चुकीचे आरोप करीत आहेत.”