सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सनातन धर्मावरील वाद उफाळल्यानंतर भाजपाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. इंडिया आघाडीतील राजकीय पक्ष कसे हिंदू विरोधी आहेत, याचा प्रचार भाजपाकडून केला जात आहे. यामुळे इंडिया आघाडीतील आणि विशेष करून हिंदी पट्ट्यात अस्तित्व असलेल्या पक्षांसमोर अडचण निर्माण झाली आहे. सनातन धर्माचा वाद आता कुठे शमला होता, तोच आता राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) मंत्र्यांनी रामचरितमानस ग्रंथावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्यामुळे त्यांच्यासह आघाडीत असलेला जनता दल (यूनायटेड) पक्ष काहीसा अडचणीत आला आहे. यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जाहीररित्या जेडीयू पक्ष हिंदू विरोधी नाही, हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी (१८ सप्टेंबर) पाटणा येथील एका जाहीर कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याचे इमारत बांधकाम मंत्री अशोक कुमार चौधरी यांच्या मानगुटीला धरून कपाळ समोर उभ्या असलेल्या पत्रकाराच्या कपाळाला लावले. सदर पत्रकाराच्या कपालाळा असलेला टिळा अशोक कुमार चौधरी यांच्या कपाळाला लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॅमेऱ्यासमोर ही कृती केल्याचे नंतर सांगण्यात आले. या घटनेवर अनेकजण तर्कवितर्क लढवत असताना गुरुवारी (२१ सप्टेंबर) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच यावर भाष्य केले. ते म्हणाले, “मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. उलट मी सर्व धर्म आणि त्याच्या पद्धतीचा सन्मान करतो. ज्यामध्ये माथी चंदनाच्या टिळ्याचाही समावेश होतो.” या प्रतिक्रियेनंतर नितीश कुमार यांनी चौधरी यांच्या खांद्यावर डोके ठेवून त्यांना मिठी मारली.

बिहारचे शिक्षण मंत्री चंद्र शेखर यांनी मागच्या आठवड्यात रामचरितमानस या धार्मिक ग्रंथातील काही भागावर आक्षेप व्यक्त करून टीका केली होती. त्यावरून भाजपाने पुन्हा एकदा बिहारमधील सत्ताधारी महागठबंधनवर टीकास्र सोडले. महागठबंधनमधील पक्ष हिंदुत्वाच्या विरोधात असून मतांच्या राजकारणासाठी हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप भाजपाने केला. चंद्रशेखर यांनी या आठवड्यातही रामचरितमानसवर टीका केली.

मागच्या आठवड्यात मधुबनी जिल्ह्यातील झंझारपुर येथे जाहीर सभेत बोलत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जनता दल (युनायटेड) आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांवर तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तर या सभेत सांगितले की, सनातन धर्म आता धोक्यात आहे. लोकांनी सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी नितीश कुमार यांनी टिळ्यावरून कृती केली असल्याचे बोलले जाते.

जनता दल (युनाटेड) पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, भाजपाशी आमची अनेक वर्ष युती राहिली आहे. तरीही आम्ही विशिष्ट धर्माची बाजू घेतल्याचेही कुणीही सांगू शकत नाही. आमचे सरकार मुस्लीम स्मशानभूमींना कुंपण घालत आहे, तर दुसऱ्या बाजूला हिंदूंच्या मंदिराच्या मालमत्तेवर झालेली अतिक्रमण हटवून त्यांना संरक्षण देत आहे. जेडीयूचे आमदार आणि बिहार रिलिजियस ट्रस्ट कौन्सिलचे सदस्य नीरज कुमार म्हणाले की, आमच्या ट्रस्टने अनेक मंदिरे आणि मठांना अतिक्रमण मुक्त केले आहे.

शिक्षण मंत्री चंद्रशेखर हे रामचरितमानसवरील आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. “मी कोणत्याही देवतेच्या विरोधात बोललो नाही, मी फक्त रामचरितमानसमधील जातीय संदर्भावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले”, असे स्पष्ट करताना आरजेडीचे मंत्री म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी नुकतेच काही मंदिरांना भेटी दिल्या आहेत. झारखंडमधील देवघर आणि गोपालगंजमधील थावे मंदिरांना भेटी देऊन त्यांनी दर्शन घेतले असल्याचे, मंत्री चंद्रशेखर यांनी सांगितले.

भाजपाचे बिहार उपाध्यक्ष संतोष पाठक द इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना म्हणाले, “एका समुदायाचे तुष्टीकरण करण्यासाठी नितीश कुमार यांना इफ्तार पार्टींना भेट देताना आम्ही पाहिले आहे. जेडीयू पक्षाने इत्तेहाद यात्रा काढलेल्याही आम्ही पाहिल्या आहेत. जेडीयू पक्ष हा राम मंदिर निर्माण आणि काश्मीरमधील सुधारणांचा विरोधक आहे. ढोंगी धर्मनिरपेक्षता बाळगणाऱ्या राष्ट्रीय जनता दल पक्षासह त्यांनी सरकार स्थापन केले आहे. आता नितीश कुमार काहीही केले तरी ते बिहारच्या सत्तेत पुन्हा येणार नाहीत.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar politics turn due to bjp criticism nitish kumars attempt to show that he is not anti hindu kvg