कर्नाटकमध्ये गेल्या वर्षी जुलै महिन्यात भाजपाचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची नियुक्ती करून राज्यात नेतृत्व बदल केला. या नेतृत्व बदलानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. २०२३ मध्ये होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपाच्या विकास अजेंड्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आयोजित केल्याचे मानले जात आहे. या दौऱ्यात नरेंद्र मोदी हे अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत.सर्व राज्यात होणाऱ्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तेथील विकास प्रकल्प ठळकपणे मांडायचे हा भाजपाच्या रणनितीचा भाग असल्याचे भाजपामधील सूत्रांनी संगितले.

भाजपाच्या या पॅटर्नला पायाभूत सुविधा आणि हिंदुत्वाचा पुरस्कार पॅटर्न म्हटले जात आहे. कर्नाटकमधील याचे उत्तम उदाहरण म्हणजे १५,७६७ कोटी रुपयांचा बंगळुरू उपनगरीय रेल्वे प्रकल्प. हा प्रकल्प गेली ३० वर्षे फक्त कागदावरच होता. या प्रकल्पाची पायाभरणी नरेंद्र मोदी करणार आहेत. हा उपनगरीय रेल्वे प्रकल्प मार्गी लागल्यास बंगळुरूमधील शहरे एकमनेकांशी जोडली जातील आणि लोकांची खुप मोठी समस्या दूर होईल. या दौऱ्यात पंतप्रधान दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. मोदी या दौऱ्यात हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत. भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा त्यांच्या रणनितीचा भाग आहे. 

बोम्मई पुढे म्हणाले की “उत्तर प्रदेशमध्ये भाजपाची रणनितीसुद्धा अशीच होती. जिथे विकासाचा अजेंडा आणि हिंदुत्वाचा जोर हा फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीच्या वेळी वापरला गेला होता. या सुत्राचा फायदा पक्षाला नक्कीच झाला. आमच्याकडे मोदीजींच्या रूपाने संघटनेची ताकत मोठी आहे. या सर्व गोष्टी एकत्र करून जर आम्ही आमचा अजेंडा ठरवला तर २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही एकहाती सत्ता स्थापन करू.

कर्नाटक सरकार निवडणुकांच्या आधी अनेक विकास प्रकल्पांचे उदघाटन करत असले तरी अनेक यापूर्वी उदघाटन झालेले अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. राजकीय इच्छा शक्तीचा अभाव आणि प्रशाकीय त्रुटी यामुळे हे प्रकल्प प्रलंबित आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना प्रलंबित प्रकल्पांबाबत उत्तर लोकांना द्यावे लागणार आहे.