भाजपच्या दबावाने यवतमाळ-वाशीम, हिंगोली आणि रामटेकमधील विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ हा भाजपने बळकावला आहे. भाजपच्या एकूणच दबावाच्या राजकारणाने ठाणे, दक्षिण मुंबई, नाशिक, पालघर हे मतदारसंघ शिंदे यांच्याकडे कायम राहतात का, याची आता उत्सुकता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वी राणे यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. ही जागा सोडण्यास शिंदे गटाचा तीव्र विरोध होता. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भावाच्या उमेदवारीकरिता सारी ताकद पणाला लावली होती. रत्नागिरीमध्ये शिवसेनेचेचाच उमेदवार निवडून येऊ शकतो, असे सामंत यांचे म्हणणे होते. पण भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केली होती. शेवटी महायुतीत ही जागा भाजपने बळकावली आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जागा गमवावी लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसला आहे. रामटेकमधील तुमाले, यवतमाळ-वाशीममधील भावना गवळी आणि हिंगोलीतील हेमंत पाटील या विद्यमान तीन खासदारांना भाजपच्या दबावामुळे शिंदे यांना उमेदवारी देता आलेली नाही. हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर आली. आता रत्नागिरी- सिंधुदुर्गची जागाही भाजपने बळकावली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी बंडानंतर आपल्याबरोबर आलेले सर्व खासदार आणि आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याबरोबरच निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती. पण लोकसभा निवडणुकीत बंडात साथ देणाऱ्या सर्व १३ खासदारांना पुन्हा उमेदवारी देणेही शिंदे यांना शक्य झालेले नाही. हा शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व खासदारांना शिंदे पुन्हा उमेदवारी देऊ शकलेले नाहीत मग विधानसभेच्या वेळी भाजप शिंदे गटाच्या ताब्यातील मतदारसंघ बळकावू शकते , अशीच शक्यता वर्तविली जाते.

हेही वाचा… तमिळनाडूत यंदा तिरंगी लढतीची शक्यता; द्रमुक, अण्णाद्रमुक अन् भाजपामध्ये सामना होणार

ठाणे, नाशिकचे आव्हान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपने बळकावल्यावर ठाणे, दक्षिण मुंबई, नाशिक, पालघर हे चार मतदारसंघ शिंदे यांच्याकडे कायम राहतात का, याची उत्सुकता आहे. ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे. ठाण्यावर भाजपने दावा केला आहे. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघावर भाजपचा डोळा असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. पालघरमध्ये शिंगे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार असले तरी त्यांना स्वत:लाचा भाजपच्या वतीने लढायचे आहे. या साऱ्या गोंधळात चारपैकी आणखी किती मतदारसंघ भाजप किंवा राष्ट्रवादी शिंदे यांच्याकडून बळकावणार याची उत्सुकता आहे.