काँग्रेस नेतृत्वाने शहनाज तबस्सुम यांना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींचा सामना करण्यासाठी हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे भाजपानंतर काँग्रेसही हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्याशी लढण्यासाठी प्रथमच महिला उमेदवाराला तिकीट दिले आहे. २००४ पासून ओवैसी या मतदारसंघातून जिंकत आहेत. ओवैसींसमोर या महिला उमेदवार आव्हान उभे करतील, असा दोन्ही राजकीय पक्षांना विश्वास आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस पक्षाने तेलंगणा वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद खाजा मोईनुद्दीन यांची पत्नी आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील शहनाज तबस्सुम यांचे या जागेवरून नाव निश्चित केले आहे. भाजपाने यापूर्वी शहरातील विरिंची हॉस्पिटल्सच्या अध्यक्षा के माधवी लता यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते. परंतु ओवैसींचा या भागातील प्रभाव पाहता ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होणे कठीण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या भगवंतराव पवार यांचा २.८२ लाख मतांनी पराभव केला होता.

तबस्सुम या हैदराबाद मतदारसंघातून परिवर्तन शोधत असलेल्या मतदारांपर्यंत पोहोचू शकते, असंही तेलंगणा काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. खरं तर त्या अखिल भारतीय आझाद काँग्रेस पक्षाच्या संस्थापिका आणि राष्ट्रीय अध्यक्षादेखील आहेत. विशेष म्हणजे हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, त्याने आतापर्यंत निवडणूक लढवलेली नाही.दुसरीकडे भाजपाला लता यांना समर्थन मिळण्याची आशा आहे. कारण हैदराबादच्या याकूतपुरा भागात बालपण गेलं आणि तिकडेच त्या मोठ्या झालेल्या असून, मुस्लिम समुदायासह तिथल्या लोकांसाठी त्यांनी भरपूर काम केले आहे. काही काळासाठी आरएसएसशी संबंधित असलेल्या लताने तिहेरी तलाकसाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. मदरशांमध्ये मुलांशी गैरवर्तन आणि मंदिरांचे अतिक्रमण या कथित मुलाखतींसह या विषयावरील त्यांची भाषणे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत.

एक कट्टर हिंदू महिला म्हणून त्यांची प्रतिमा मुस्लिमबहुल मतदारसंघातील हिंदूंना भाजपाकडे आकर्षित करण्यास मदत करू शकते. हैदराबाद मतदारसंघातील मतदार हे एमआयएमला पर्याय शोधत आहेत, त्यामुळेच भाजपा आणि काँग्रेसनं या मतदारसंघातून महिलांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय. २०१९ आणि २०१४ मध्ये मतदारसंघातून रिंगणात उतरलेल्या पक्षाचे दिग्गज भगवंत राव यांच्या ऐवजी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लता संघाच्या मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांच्या जवळच्या असल्याचे मानले जाते. तसेच इंद्रेश कुमार यांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लता म्हणाल्या की, “हिंदू-मुस्लिम हा माझा मतदानाचा मुद्दा असता तर भाजपाने मला अजिबात तिकीट दिले नसते. मी अनेक मुस्लिमांबरोबर काम करते आणि मला त्यांच्याबद्दल कळवळा आहे हे पक्षाला माहीत आहे, असंही त्या म्हणाल्यात.

हेही वाचाः Elections 2024 : “मोदींना घरी पाठविणार, मगच झोप घेणार” – उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

खरं तर अंदाजे ६० टक्के लोकसंख्या असलेल्या हैदराबाद लोकसभा जागेचे प्रतिनिधित्व १९८४ ते २००४ पर्यंत AIMIM संस्थापक आणि ओवैसीचे वडील सलाहुद्दीन यांनी केले होते, त्यानंतर असदुद्दीन ओवैसी खासदार झाले. ओवैसी यांनी या जागेवरून आपला मोठा विजय संपादन केला आहे. २००४ मध्ये या जागेवरून त्यांच्या पहिल्चया निवडणुकीत २.०२ लाख मतांसह त्यांनी विजय मिळवला. २००९ मध्ये १.१३ लाख मतांसह त्यांचे प्रतिस्पर्धी आणि लोकप्रिय उर्दू दैनिक सियासतचे संपादक जाहिद अली खान यांच्या विरोधात त्यांनी विजय मिळवला. तेलुगु देसम पक्षाकडून (टीडीपी) ते उभे राहिले होते. २०१४ मध्ये ओवैसींनी भाजपाच्या पवारांचा २.०२ लाख मतांनी पराभव केला आणि २०१९ मध्ये अधिक मताधिक्क्याने ते विजयी झाले.

हेही वाचाः Loksabha Election 2024 : काँग्रेसचा रावत कुटुंबीयांवर विश्वास कायम; दोन पराभवांनंतरही हरिद्वारमधून उमेदवारी

हैदराबाद लोकसभेची जागा असलेल्या आठपैकी सात विधानसभा मतदारसंघ गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ने जिंकले होते, फक्त गोशामहल ही एकमेव जागा भाजपाने जिंकली होती. त्यांनी जिंकलेल्या सात विधानसभा क्षेत्रांपैकी AIMIM चा सर्वाधिक विजय ८१,६६० मतांसह चंद्रयांगुट्टा येथून झाला होता. या जागेवरून १९९९ पासून ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन प्रतिनिधित्व करीत होते. हैदराबादच्या जुन्या शहरातील चारमिनार आणि इतर जागांवर पक्षाची पकड मजबूत आहे. १९९४ मध्ये ओवैसी यांनी चारमिनार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून पदार्पण केले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge of two women candidates before asaduddin owaisi this year how to maintain hyderabad constituency vrd
First published on: 26-03-2024 at 17:57 IST