आता तर ठेकेदार २० टक्के घेतात, असे ऐकले आहे. पूर्वी १० टक्के घेत होते, अशाने ठेकेदार रस्त्यावर येतील, असाही उल्लेख शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगर दौऱ्यावर केला. सध्या महायुतीच्या काळात २० टक्के घेतले जात असल्याचा आरोप करताना प्रदेशाध्यक्षांनी पूर्वी १० टक्के घेतले जात होते, असे स्पष्टीकरण दिले, ते पूर्वीच्या सरकारबद्दल होते का, असा प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण झाला. शिवाय पूर्वीच्या सरकारमध्ये प्रदेशाध्यक्ष मंत्रीही होते. त्यामुळे तर उपस्थितांच्या मनात आणखी इतरही प्रश्न निर्माण झाले. उपस्थितांत सर्वच राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. ते याचे स्पष्टीकरण मागण्याचे धाडस प्रदेशाध्यक्षांकडे कसे दाखवणार? त्यामुळे अनेकांच्या मनातील पूर्वीचे म्हणजे कोणत्या सरकारच्या काळातील, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> आरोग्य, बँकिंग सुविधांमुळे सिंधुदुर्गची आश्वासक वाटचाल

पक्षनिष्ठा, अफवा अन् निर्वाळा

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४०० चा आकडा पार करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या चाणक्यनीतीने आखून इंडिया आघाडीला सुरुंग लावत दररोज ‘इंडिया’तील एकेक पक्ष फोडत असताना इकडे राज्यातही काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. आणखी काही काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरूच आहे. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा, आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभेची तयारी हाती घेतली असताना त्यांच्या भाजप प्रवेशाची कुजबुज काही थांबत नाही. अगदी त्यावर सुस्पष्ट निर्वाळा दिला तरी प्रणिती शिंदे काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा का थांबत नाही, असा सवाल आता खुद्द प्रणिती शिंदे यांनाच पडला आहे. त्यांनी वेळोवेळी काँग्रेसनिष्ठा जाहीर केली आहे. काँग्रेसी म्हणून जन्मले, काँग्रेसी म्हणून घडले आणि वाढले. शेवटी काँग्रेसी म्हणूनच मरेन, असा स्वच्छ निर्वाळा त्यांनी आता आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस राजीनाम्यानंतरही दिला आहे.

हेही वाचा >>> अजित पवारांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या पाहून रोहित पवारांचा चिमटा, Moye Moye गाण्यासह VIDEO शेअर

मुख्यमंत्री की संसदेत?

कार्यकर्त्यांच्या भावना उचंबळू लागल्या की मागण्या वाढतात. कोणी कोणती मागणी करावी याला धरबंद राहत नाही. इच्छा-आकांक्षाला आपल्या परीने धुमारे फुटत राहतात. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना भेटण्यासाठी रविवारी नाशिकहून काही कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी संभाजीराजे हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी मागणी लावून धरली. त्यांच्या मोटारीवर तसे फलक लावलेले होते. माध्यमांशी बोलतानाही त्यांनी हीच अपेक्षा व्यक्त केली. बरे ही अपेक्षा व्यक्त करतानाच लागोलाग संभाजीराजे यांनी संसदेत जावे ही मागणीही केली. आधीच ते कोठून लढणार याचा काहीच पत्ता नाही. इकडे मात्र त्यांना एकाच वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि विरुद्ध टोक असणारे संसद अशा दोन्ही पदांवर राजेंना पाहायचे होते. कार्यकर्त्यांच्या आशा अशा तेवत असताना याच वेळी महाविकास आघाडीकडून मात्र श्रीमंत शाहू महाराज यांना संसदेत पाठवण्याची तयारी सुरू आहे.

More Stories onचावडीChavadi
मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis maharashtra political situation maharashtra political conflict zws
First published on: 13-02-2024 at 05:07 IST