बुधवारी (३ एप्रिल) राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शो केला. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) केरळमधील इंडिया आघाडीचा एक भाग आहे. अशात राहुल गांधींच्या रोड शोमध्ये मित्रपक्ष IUML चा एकही झेंडा दिसला नाही. या रोड शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने तिरंगा हाती घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून भाजपा आणि इतर डावे पक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. भाजपा आणि सीपीआय (एम) या दोन्ही पक्षांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पाच वर्षांपूर्वीही झेंड्यावरून वाद

२०१९ च्या निवडणुकीतही वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी रोड शो केला होता. त्या रोड शोमध्येही IUML च्या झेंड्यावरून वाद निर्माण झाला होता. परंतु, यावेळी निर्माण झालेला वाद झेंड्यावरून असला तरी कारण वेगळे आहे. २०१९ मध्ये आयोजित रोड शोमध्ये IUML चे झेंडे पाहायला मिळाले होते. तेव्हा भाजपाने या झेंड्यांना पाकिस्तानी झेंडे म्हणून संबोधले होते. २०१९ च्या अनुभवातूनच काँग्रेसने सावधगिरी बाळगल्याचे सांगण्यात येत आहे. IUML चा झेंडा हिरव्या रंगाचा असून, त्यावर एक चंद्रकोरदेखील आहे. त्यावर अमित शहा म्हणाले होते, “हा रोड शो पाकिस्तानात होता की भारतात हे ओळखणे कठीण होते.”

Akola Lok Sabha
अकोल्यात तिरंगी लढतीचा फायदा कोणाला ?
spokesperson, Congress
काँग्रेसमध्ये जीव घुसमटणाऱ्या प्रवक्त्यांची भाजपमध्ये पोपटपंची !
K C Venugopal came to have a seat at the Congress high table
कसे झाले वेणुगोपाल काँग्रेसमधील सत्ताकेंद्र? काँग्रेस नेत्यांच्या आऊटगोइंगला का ठरताहेत कारणीभूत?
Hatkanangale Lok Sabha
धैर्यशील माने – राजू शेट्टी दोघांचाही बदलता राजकीय प्रवास

हेही वाचा : “भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप

यंदाच्या रोड शोमध्ये IUML आणि काँग्रेस कार्यकर्ते उमेदवाराचे फोटो आणि तिरंग्याचे फुगे घेऊन दिसले. गुरुवारी (४ एप्रिल) सीपीआय (एम) आणि भाजपाने काँग्रेससंदर्भाने पक्षाच्या झेंड्याचा सन्मान आणि त्याचे महत्त्व याबाबतची मते व्यक्त केली. सीपीआय (एम)ने म्हटले आहे की, झेंडे नसल्यामुळे हे सिद्ध झाले की, काँग्रेस जातीयवादी शक्तींना घाबरत आहे. डावे नेते आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, “काँग्रेसची इतकी घसरण झाली आहे की, ती आता भाजपाला घाबरू लागली आहे. काँग्रेसमध्ये मुस्लिम लीगचा झेंडा फडकवण्याची हिंमत नाही.” ते पुढे म्हणाले, “केरळमधील नागरिकांनी भाजपाच्या भीतीने पक्षाचे झेंडे न लपविणाऱ्या मजबूत राजकीय पक्षाला मतदान केले पाहिजे.“

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी ‘एक्स’वर पक्षाला स्वतःच्या झेंड्याचा किती अभिमान आहे, यावरील पोस्टमधून म्हटले, “ ‘भारतमाता की जय’ म्हणत आम्ही आमच्या कमळाचा झेंडा निःसंकोचपणे फडकवत आहोत. आम्हाला आमचा झेंडा फडकवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि कोणीही तो नाकारू शकत नाही.” या पोस्टमध्ये त्यांनी वायनाडमधील भाजपाच्या रोड शोमध्ये पक्षाचे शेकडो झेंडे असलेला एक व्हिडिओही शेअर केला.

गुरुवारी मतदारसंघात भाजपाचा प्रचार करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, जर राहुल गांधी यांना त्यांचा मित्रपक्ष IUML ची लाज वाटत असेल, तर IUML ने त्यांचा पाठिंबा नाकारायला हवा.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

काँग्रेसने राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये IUML चे झेंडे न लावण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. डी. साठेसन म्हणाले, “काँग्रेसने प्रचार कसा करावा याबद्दल सीपीआय (एम)ने सांगण्याची गरज नाही. गेल्या निवडणुकीत भाजपाने वाद निर्माण केला होता. आता सीपीआय (एम) भाजपाला साथ देत आहे. भाजपाच्या इशाऱ्यावरच विजयन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांचा रोड शो कसा करायचा हे आम्हाला माहीत आहे.”

राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये IUML मधील पी. के. कुन्हालीकुट्टी यांसारखे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. IUML ने सीपीआय (एम)वर टीका केली आणि काँग्रेसच्या निर्णयाचे समर्थन केले. IUML चे राष्ट्रीय सरचिटणीस कुन्हालीकुट्टी म्हणाले, “केरळबाहेर, सीपीआय (एम)ला काँग्रेसच्या झेंड्याची गरज आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये सीपीआय (एम)च्या लाल झेंड्याला काँग्रेसच्या झेंड्याची गरज आहे. वायनाडच्या पलीकडे सीपीआय (एम)चे कार्यकर्ते हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन राहुल गांधींसाठी घोषणा देताना दिसतात. राहुल हे इंडिया आघाडीचे नेते आहेत. ते भाजपाच्या विरोधात लढत आहेत आणि असे मुद्दे उचलण्याऐवजी त्यांना पाठिंबा द्यायला हवा.”

हेही वाचा : बारामतीची लढाई कौटुंबिक नाही; भावनावश होऊ नका, भविष्याचा विचार करा- सुनेत्रा पवार

मुस्लिमांची मोठी लोकसंख्या असलेल्या वायनाडमध्ये IUML चा प्रभाव जास्त आहे. २०१९ मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीच्या कौटुंबिक बालेकिल्ल्यात राहुल यांचा पराभव झाला, तेव्हा IUML च्या पाठिंब्याने वायनाडमधून ते निवडून आले होते. गुरुवारी काँग्रेसनेही सोशलिस्ट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), पॉप्युलर फ्रंट ऑफ़ इंडिया (PFI) या उजव्या विचारसरणीच्या इस्लामी संघटनांचा पाठिंबा नाकारला. भाजपाने या मुद्द्यावरून टीका केल्याने काँग्रेसनेही हा मुद्दा टाळण्याचा प्रयत्न केला. वायनाडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इराणी यांनी SDPI च्या पाठिंब्यावरूनही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती.