नीरज राऊत, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर: पालघर जिल्हा भाजपा अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणाऱ्या नंदकुमार पाटील यांचा तीन वर्षाच्या कार्यकाळ संपल्यानंतर डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नवीन अध्यक्ष विराजमान होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील अंतर्गत हेवेदावे तसेच नेमणुकीसाठी समतोल राखण्यास यश न लाभल्याने जिल्हा कार्यकारिणीची घोषणा अजूनही प्रतीक्षेत राहिली आहे.

पक्षाचे जिल्हा अध्यक्षपद मिळावे म्हणून संतोष जनाठे, प्रशांत पाटील यांच्यासह इतर काही मंडळी इच्छुक होती. मात्र आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने डहाणूची जागा सुरक्षित व्हावी या दृष्टिकोनातून डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. नेमणूक करताना पक्षातील सर्व घटकांना सामावून घेऊ असे आश्वासन त्यांनी पक्षातील वरिष्ठ मंडळींना दिले होते. मात्र नेमणुकीनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. दिल्ली येथील एका वजनदार मंत्री महोदयांच्या शिफारसीने आपली अध्यक्ष पदावर निवड झाल्याचे सांगत राज्यातील वरिष्ठांचा सल्ला दुर्लक्षित केला.

आणखी वाचा-अकोल्यात कावड आणि पालखी महोत्सवातून मतांची पेरणी

जिल्हा सरचिटणीस, युवा मोर्चा अध्यक्ष तसेच पालघर व वाडा शहर अध्यक्ष पदासाठी पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये चुरस असून ज्यांनी गेल्या चार-पाच वर्षात ज्या मंडळींनी पक्ष बांधण्यासाठी मेहनत केली त्यांची या पदावर नेमणूक व्हावी अशा जुन्या कार्यकारिणीचे म्हणणे आहे. जिल्हा कार्यकारणीतील ४५ ते५० पदांपैकी या चार-पाच पदांवर एकवाच्यता होत नसल्याने हा प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दरबारी गेला होता. मात्र त्यांनी कार्यकारणी स्थापनेत हस्तक्षेप न केल्याने, भाजपा प्रदेशाध्यक्ष व नंतर पालघर जिल्ह्यातील मूळ अधिवास असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांकडे या प्रकरणी साकडे घातले गेल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच लोकसभा प्रभारी यांच्या सह काही वरिष्ठ पदाधिकाऱ्याने प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेऊन जिल्हाध्यक्ष यांनी कार्यकारिणी करताना आपल्याला विचारात व विश्वासात घेतली नसल्याची तक्रार केली होती. मावळते जिल्हाध्यक्ष यांची नव्या कार्यकारिणीच्या सूचीवर स्वाक्षरी असल्याशिवाय पालघर जिल्हा भाजप कार्यकारिणीची घोषणा होणार नाही अशी ठाम भूमिका प्रदेशाने घेतल्याचे सांगण्यात येते. तर जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या वेळी प्रतिस्पर्धी असलेल्या व आपल्याला विरोध केलेल्या मंडळींची मुख्य पदांवर समावेश करून घेणार नाही अशी भूमिका विद्यमान अध्यक्ष भरत राजपूत यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे क्षमता असलेल्या पक्षातील मंडळींना डावलले गेल्याने आगामी काळातील निवडणूकांमध्ये पक्षाला त्रासदायक ठरेल अशी पक्षातील जुनी मंडळी सांगत आहेत.

आणखी वाचा- राज्यात गेल्या सहा महिन्यांत नऊ शहरांना जातीय तणावांची झळ

राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांच्या कार्यकारिणी घोषित झाल्या असल्या तरी पालघरची कार्यकारणी प्रलंबित राहिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालघर जिल्हा प्रभारी तसेच जिल्हाध्यक्ष या दोघांनी तालुकाध्यक्ष यांचा मुलाखती घेतल्याने जिल्हा कोअर कमिटीने प्रदेशाला नाराजी कळविली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या दबावाखली कार्यकारणी नेमणूका झाल्या तर आगामी काळात निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल याची माहिती असल्याने या कार्यकारणी नेमणुकीचे प्रकरण अजूनही भिजत राहिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disputes in palghar bjp are not resolved print politics news mrj
First published on: 13-09-2023 at 11:48 IST