कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांचा दौरा जिल्ह्याच्या पूर्व भागात होणार असून लोकसभा निवडणूक तयारीचा हा भाग मानला जात आहे. या निमित्ताने वस्त्रोद्योगाचे प्रलंबित प्रश्न, रखडलेली दूधगंगा सुळकुड पाणी योजना, पंचगंगा नदी प्रदूषण, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे निर्माण होणारा महापुराचा प्रश्न अशा ज्वलंत समस्या उभ्या राहिल्या असून त्यावर होणारे मुख्यमंत्र्यांचे भाष्य निवडणुकीला निर्णायक वळण देणारे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूर यांचे अलीकडे अतूट नाते ठरत आहे. जवळपास प्रत्येक महिन्याला ते कोल्हापूरला येत असल्याचे दिसत आहे. पंधरवड्यापूर्वीच शिवसेनेचे अधिवेशन कोल्हापुरात पार पडले. आता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते पुन्हा एकदा ३ तारखेला हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी नजिक असलेल्या कोरोची या गावी महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यक्रमासाठी ते येणार आहेत.

हेही वाचा… नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

पाण्याला धार राजकारणाची हा कार्यक्रम म्हणजे आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग एकंदरी तयारी पाहता दिसत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मतदार संघातून खासदार धैर्यशील माने हे शिंदे सेनेकडून निवडणूक लढवणार हे उघड आहे. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे लढत देणार हेही स्पष्ट झाले आहे. दोघांनीही प्रचाराला आपल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री येथे येत असताना या तालुक्यातील आणि मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहे. विशेषतः इचलकरंजी शहरासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड नळ पाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेला कागल तालुक्यातून विरोध केला आहे. अलीकडेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी इचलकरंजीला सुळकुड ऐवजी पर्यायी योजनेचे पाणी दिले जाईल असे विधान केले आहे. त्यामुळे ही पाणी योजना बासनात गुंडाळली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर, ही योजना व्हावी यासाठी इचलकरंजीकर आग्रही आहे. अलीकडेच इचलकरंजीत महिलांच्या बेमुदत उपोषणावेळी रास्ता रोको करण्यात आले. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने , आमदार प्रकाश आवाडे यांच्या विरोधात घोषणा देत रोष व्यक्त केला गेला. पाणी आणि वस्त्रोद्योग प्रश्नाने गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तत्कालीन लोकप्रतिनिधींना मतदारांची नाराजी भोवली होती. त्यामुळे इचलकरंजीच्या नळ पाणी योजनेचे भवितव्य नेमके काय आणि यावर मुख्यमंत्री कोणती भूमिका घेणार याला राजकीयदृष्ट्या कमालीचे महत्त्व आले आहे.

विरलेला वस्त्रोद्योग

इचलकरंजीचे अर्थकारण वस्त्रोद्योगाभोवती फिरते. येथील यंत्रमागाला अलीकडे नव्याने शासनाला सादर केलेल्या शिफारशी दिलासा मिळाला आहे. पण तूर्तास तो कागदोपत्री आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. याबाबत राज्य शासनाची भूमिका वरकरणी सकारात्मक असली तरी त्याबाबत कृतिशील पावले पडत नाहीत ,अशी टीका असे यंत्रमागधारक करीत आहेत. याहीबाबतीत मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात यावर इचलकरंजीकरांचे अर्थकारण आणि त्या अनुषंगाने निवडणुकीचे मतकारण ठरणार आहे.

हेही वाचा… जरांगे यांची दुसरी माघार, ‘सगेसोयरे’च्या अधिसूचनेची कोंडीच

संवेदनशिल प्रश्नांची तीव्रता

रत्नागिरी – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत हातकणंगले तालुक्यात भूमी संपादनाचे काम सुरू आहे. ते करीत असताना नुकसान भरपाई देण्याबाबत दुटप्पी, अन्यायकारक भूमिका घेतली जात आहे, असे राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण कृती समितीचे म्हणणे आहे. तर, माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबतचा अन्याय दूर केला नाही तर रक्ताचे पाट वाहतील असा आक्रमक पवित्रा घेत रान पेटवले आहे. याद्वारे शेतकऱ्यांची बाजू सांभाळतानाच मतपेढीचे राजकारण होत आहे. कालच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर निवारणासाठी ३२०० कोटीच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. तथापि, राष्ट्रीय महामार्गाच्या या कामामुळे बागायती शेतजमीन उध्वस्त होण्याबरोबरच रस्त्याची उंची वाढल्याने महापुराला नव्याने निमंत्रण मिळणार असल्याने धोका वाढणार असल्याची भीती या परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी कितीदा तरी केली आहे. पण पंचगंगेचे प्रदूषणाचे दशावतार काही संपत नाहीत. गेला आठवडाभर पंचगंगा नदीचे पाणी आत्यंतिक दूषित झाले आहे. मासे मरण्याचे, जलपर्णी वाढण्याचे प्रमाण वाढतच चालले असून त्यात पंचगंगा नदी प्रदूषणामुक्त करण्याची घोषणा वाहून जात आहे. नदीचे पाणी काळेकुट्ट झाले असून करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीप्रमाणे हातावर हात बांधून बसले आहे. त्यामुळे अशा या संवेदनशील प्रश्नांची सोडवणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे करतात यावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.