कोल्हापूर : सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी उपक्रमे, आयुधांचा वापर केला जात आहे. एकाने एका उपक्रमाचे आयोजन केले की विरोधकांना जाग येऊन त्यांच्याकडूनही तशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे अनुकरण केले जात आहे. याद्वारे उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद अधिक, सर्वव्यापी असल्याचा दाखवण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. सामान्य लोकांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्व थरातील लोकांना, मतदारांना जखडून ठेवण्याची रणनीती कोल्हापूर जिल्ह्यात अवलंबली जात आहे. खेरीज, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रमुखांच्या बैठका घेऊन त्यांच्या क्षेत्राचे अधिकाधिक मतदान व्हावे यादृष्टीने पावले पडत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात प्रचाराचे नवनवे फंडे वापरले जात आहेत. त्या कल्पनेनुसार संबंधित घटकांचे मेळावे आयोजित करून त्यांना प्रचाराच्या साखळीत बद्ध केले जात आहे. या माध्यमातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न जोरकसपणे सुरू आहे. एकाने अशा प्रकारचे अनुकरण केले की दुसऱ्या पक्षाकडून लगोलग त्याची री ओढण्याचा फंडा वापरात आणला जातो आहे. या आठवड्यात घडलेल्या काही घटना ठळकपणे लक्षात येण्यासारख्या आहेत.

हेही वाचा – केरळमध्ये तिरंगी लढतीचा फायदा भाजपलाच ५ पेक्षा जास्त जागा मिळतील! पक्षाचे प्रभारी प्रकाश जावडेकर यांचा विश्वास

उद्योजकांवर जाळे

मतदारसंघाच्या अर्थकारणावर प्रभाव असणाऱ्या बलाढ्य, सधन उद्यमींना जाळ्यात गोवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून पद्धतशीरपणे सुरु झाला आहे. ही संधी साधत उद्योजकांनीही आपले प्रश्न सोडवून घेण्याची नामी संधी साधली आहे. श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्यावतीने उद्योजक मीट आयोजित करण्यात आली होती. आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत उद्योजकांनी कोल्हापुरातल्या उद्योगाची वाढ होण्यास मर्यादा आल्याची अडचण प्रामुख्याने मांडली. स्थानिक प्रलंबित प्रश्नांमुळे कोल्हापुरातील उद्योग वाढ ठप्प झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाहू महाराजांना खासदार म्हणून दिल्लीत पाठवूया, असे आवाहन करण्यात आले.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व्यापार, उद्योग अडचणीत आले आहेत. ती दूर करायची असेल तर भाजप सरकार पुन्हा सत्तेत येता कामा नाही. यासाठी महायुतीला सत्तेपासून रोखा, अशी टोलेबाजी केली. या माध्यमातून महाविकास आघाडीकडून उद्योजकांना प्रचाराच्या साखळीत सामावण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात घेऊन लगेचच महायुतीच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सामंत यांनी कोल्हापुरात उद्योग वाढ होण्यास जागेची अडचण लक्षात घेऊन ६५० हेक्टर जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नवीन औद्योगिक वसाहती स्थापन करणे, आयटी पार्क उभारणी याकडेही लक्ष वेधणार असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. याही बैठकीस उद्योजकांची मोठी उपस्थिती होती. या बैठकीवेळी थेट प्रचाराची भाषा करण्यात आली नाही. मात्र त्यातून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना मतदान करण्याचा संदेश पेरला गेला. हातकणंगले मतदारसंघातील इचलकरंजीतील वस्त्र उद्योजक, हुपरीतील चांदी उद्योजक यांच्याही बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन जाळ्यात ओढले जात आहे.

हेही वाचा – “नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती

नगरसेवकांची बांधाबांध

प्रचाराची यंत्रणा भक्कम करायची तर दुसरी फळी मजबूत असली पाहिजे. स्थानिक नेत्यांच्या सभा, मेळाव्यातून भाषणे झाली तरी प्रत्यक्षात पक्ष, उमेदवाराची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवणे, प्रचार साहित्य पोहोचवणे ही कामे दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांकडून केली जातात. स्वाभाविकच लोकसभा – विधानसभा निवडणुकीमध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत सदस्यांचा भाव वधारलेला असतो. ही बाब लक्षात घेऊन माजी नगरसेवकांना रसद पुरवून प्रचारात सक्रिय केले जात आहे. कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जयंत पाटील, सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवकांची बैठक घेऊन १०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिक यांना पाठबळ असल्याचे दर्शवण्यात आले. पाठोपाठ नवा राजवाडा येथे सतेज पाटील यांनी अशीच एक बैठक होऊन त्यामध्ये २२० माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा असल्याचे दाखवून दिले. इचलकरंजी महापालिकेसह जिल्ह्यातील डझनभर पालिकांमध्ये माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सोबत असल्याच्या बैठका महायुती तसेच महाविकास आघाडीकडून घेण्याचे सत्र सुरु झाले. अशाप्रकारे व्यापारी, फेरी विक्रेते, विविध समाज आदी घटकांच्या बैठका घेऊन त्यांचा आपल्याला किती मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे हे दाखवण्याचा खटाटोप सुरू झाला आहे.