अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू हे मंत्रिपद न मिळाल्‍याने नाराज असल्‍याची चर्चा असतानाच आता त्‍यांनी विधान परिषदेच्‍या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत त्‍यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षातर्फे पाच उमेदवार रिंगणात उतरविण्याचे जाहीर केल्याने भाजपा-शिंदे गटासमोरील अडचणी वाढल्‍या आहेत. मंत्रिपद मिळत नसल्याने हे दबावाचे राजकारण आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Karnataka : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपासमोर येडियुरप्पांच्या मनधरणीचे आव्हान?

पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक आम्‍ही भाजपा – शिंदे गटासोबत लढणार होतो, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याचा आरोप करत बच्चू कडूंनी दंड थोपटले. प्रहार आणि महाराष्‍ट्र इंगजी शाळा संस्‍थाचालक (मेस्टा) संघटनेकडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या दोन वर्षांत प्रचंड मेहनत घेतली. आमचे २ लाख मतदार आहेत. राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील. नंतर काय होते ते पुढचे पुढे पाहून घेऊ, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. उमेदवारांच्‍या माघारीनंतरच लढतींचे चित्र स्‍पष्‍ट होणार असले, तरी भाजप-शिंदे गटासाठी ही एक डोकेदुखीच ठरली आहे.

हेही वाचा- काश्मीरमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या पक्षाचे अस्तित्व धोक्यात? अनेक नेत्यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक व अमरावती विभाग पदवीधर, तर औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे. काही संघटना आणि राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर झाले आहेत, तर काहींना आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. पण बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार वळणावर पोहचली आहे.

बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार पक्षाचे दोन आमदार आहेत. त्‍यांना आपल्‍या पक्षाच्‍या विस्‍ताराचे वेध लागले आहेत. गेल्‍या काही वर्षांत त्‍यांच्‍या नेतृत्‍वातील प्रहार शिक्षक संघटनेने अमरावती जिल्‍ह्याबाहेर आपले जाळे विस्‍तारून शिक्षकांच्‍या अनेक प्रलंबित विषयांना हात घातला. शिक्षकांच्‍या आंतरजिल्‍हा बदलीचा प्रश्‍न देखील गेल्‍या अनेक वर्षांपासून रेंगाळला होता. त्‍यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने सातत्‍याने पाठपुरावा केला आणि हा विषय मार्गी लागला.
मेस्‍टा ही संघटना राज्‍यातील इंग्रजी शाळा संस्‍थाचालकांची संघटना आहे. इंग्रजी शाळा संस्‍थाचालक आणि शिक्षकांचे प्रश्‍न वेगळे आहेत. आपली कुणीही दखल घेत नाही, अशी या शाळांमधील शिक्षकांची भावना आहे. या निवडणुकीच्‍या माध्‍यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचेल, या भावनेतून मेस्‍टाने प्रथमच या निवडणुकीत उडी घेतली आहे.

हेही वाचा- “तुम्ही राजकीय नेते आहात, पुजारी नाही”; राम मंदिराच्या उद्घाटनावरून खरगेंचं अमित शाहांवर टीकास्र; म्हणाले, “मोदी सरकारने…”

अमरावती पदवीधर मतदार संघातील गेल्‍या निवडणुकीत प्रहारतर्फे डॉ. दीपक धोटे यांनी लढत दिली होती. त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला, पण प्रहारने प्रथमच आपली उपस्थिती दर्शवली. या निवडणुकीचा अनुभव असल्‍याने प्रहारने मतदारांच्‍या नोंदणीकडे लक्ष दिले. उमेदवारांची चाचपणी केली. बच्‍चू कडू हे महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात राज्‍यमंत्री होते. त्‍यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता सत्‍ताबदलानंतर बच्‍चू कडू यांच्‍याकडे मंत्रिपद नाही. दुसरीकडे, भाजप-शिंदे गटासोबत निवडणूक लढण्‍याच्‍या प्रहारच्‍या प्रस्‍तावावर विचारही न झाल्‍याने त्‍यांनी उमेदवारांच्‍या नावांची घोषणा करून टाकली. कडूंच्‍या मागणीनंतर मुख्‍यमंत्र्यांनी राज्‍यात स्‍वतंत्र दिव्‍यांग मंत्रालय स्‍थापन करण्‍याची घोषणा केली असली, तरी कडूंची नाराजी दूर होऊ शकलेली नाही, हे दिसून आले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five candidates announced by bachu kadus prahar jan shakti party in vidhan parishad graduate and teacher constituency elections print politics news dpj
Show comments