सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सातत्याने होऊ लागताच आपण कोणत्याही स्थितीत पक्ष सोडून अन्य पक्षात जाणार नसल्याचे सांगून या वावड्या थोपविण्याचे प्रयत्न केले असले तरी त्यांच्याबाबत असलेले संशयाचे धुके मात्र विरळ होतांना दिसत नाही. त्यांना स्वत:च्या राजकीय कारकिर्दीपेक्षा मुलगा प्रतिक पाटील यांच्या भवितव्याची चिंता अधिक दिसत असून मुलाच्या राजकीय भवितव्याने सध्या त्यांना ग्रासले असल्याचे दिसत आहे. मुलांचा राजकारणातील प्रवेश विनाअडथळा व्हावा यासाठी अधूनमधून त्यांचीच वेगवेगळ्या पातळीवर चाचपणी चालू असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतिक पाटील यांना साखर कारखान्याचे अध्यक्ष पद देऊन त्यांनी सहकार चळवळीत आणले आहे. सध्या राजारामबापू कारखान्याचा विस्तार जिल्हाभर चार युनिट सुरू असून व्यापही वाढला आहे. मात्र, त्यांचा राजकीय प्रवेश सुकर करणे सद्यस्थितीत जिकीरीचे बनले आहे. मुलाच्या खासदारपदासाठी हातकणंगले हा सुरक्षित मतदारसंघ त्यांना वाटत होता. मात्र, त्या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी मैदानात उतरणार आहेत. इंडिया आघाडीत त्यांना सहभागी करायचे म्हटले तर आमदार पुत्रांना संधी मिळणार नाही. सध्या तरी शेट्टींनी आता एकला चलोचा नारा कायम ठेवला. याचबरोबर महायुतीतून शिवसेनेचे धैर्यशील माने हेही मैदानात असणार आहेत. इंडिया आघाडीकडून राष्ट्रवादी पवार गटाकडून संधी मिळू शकते. मात्र, तिरंगी लढतीत त्यांना लढावे लागणार आहे. ही जोखीम अधिक आहे.

हेही वाचा – मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा होणार का ?

याशिवाय सांगली लोकसभा मतदारसंघाचा पर्यायही आहे. या ठिकाणची जागा सध्या तरी इंडिया आघाडीतून काँग्रेसने हक्क सांगितला तर आहेच, उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी गत वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारीवर ऐनवेळी मैदानात उतरलेले स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी तयारीही चालू केली आहे. गावभेटीच्या निमित्ताने त्यांनी खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ या तालुक्यांचा एक दौराही आटोपला आहे. मात्र, दौर्‍यात त्यांनीही प्रचारात भाजपवर टीका टाळत केवळ खासदार संजयकाका पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांच्याबाबतही संशयाचे धुके अलिकडे निर्माण झाले असून राजकीय मोर्चेबांधणीत कदाचित त्यांच्याही गळ्यात भाजपचे उपरणे दिसले तर आश्‍चर्य वाटायला नको अशी स्थिती दिसत आहे.

अशा स्थितीत आमदार पुत्र प्रतिक पाटील यांचा भाजप प्रवेशाचा पर्यायाचीही चाचपणी केली जात आहे. ते जर भाजपकडून मैदानात आले तर दादा-बापू वादाला नव्याने फोडणी मिळून पुन्हा दोन्ही नेत्यांचे नातू संघर्षाच्या तयारीत असतील. राष्ट्रवादी एकसंघ असताना प्रतिक पाटील यांच्या उमेदवारीची उघड मागणी मेळाव्यात करण्यात आली होती. त्यावेळी पाण्यात खडा टाकून तरंग कितपत उमटतात याची पडताळणी केली असली तरी यामागे सूत्रबद्ध कानोसा घेण्याचा प्रयत्न होता.

हेही वाचा – रायगडमध्ये निधीच्या विनियोगात मंत्री आदिती तटकरे पिछाडीवर

इस्लामपूरच्या तरुण नेतृत्वाला राजकीय संधी आता मिळाली नाही तर भविष्यात आणखी स्थिती कठीणच होणार असल्याची जाणीव आमदार पाटील यांना आहे. त्याच्या वयाचे आरआर आबांचे पुत्र रोहित पाटील विधानसभेच्या निवडणुकीत राज्य पातळीवरील राजकारणात सक्रिय होणार आहेत. याचबरोबर विट्याचे आमदार पुत्र सुहास बाबरही उंबरठ्यावर आहेत. यामुळे जर आता संधी सोडली तर राज्याच्या राजकीय व्यासपीठावर प्रतिक पाटील मागे राहण्याचा धोका आहे. यामुळे प्रतिक पाटील यांच्यासाठी इस्लामपूर विधानसभा सोडायची म्हटले तर मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाचे काय होणार याचीही चिंता त्यांना सतावणार आहेच. म्हणजेच एकंदरित आमदार पाटील यांची दुहेरी कोंडी सध्या झाल्याचे दिसत आहे. एकीकडे पुत्राच्या राजकीय भवितव्याचे काय आणि पक्षांतर करून गणित सुटले तर सुटले, अन्यथा आगीतून फुफाट्यात अशी अवस्था झाली तर काय?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil worried about his son political future print politics news ssb
First published on: 21-02-2024 at 14:53 IST