Lok Sabha Election 2024 हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून भाजपाने सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसने या मतदारसंघातून राजघराण्यातील वंशज विक्रमादित्य सिंह यांना स्पर्धेत उतरवले आहे. दोन्ही उमेदवारांनी नाव जाहीर होताच जोरदार प्रचाराला सुरुवात केली. या प्रचारादरम्यान कंगना रणौत आणि विक्रमादित्य सिंह दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

मंडी हा हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. त्यामध्ये लाहौल आणि स्पितीसह मंडी, कुल्लू आणि चंबा जिल्ह्यांचाही समावेश आहे. अभिनेत्री कंगना पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. या प्रदेशातील भाजपा कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, रणौत यांनी आतापर्यंत एकदा तरी सर्व १७ विधानसभा क्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. मंडीमध्ये १ जूनला मतदान होणार आहे. हिमाचली टोपी परिधान करून आणि जय श्रीरामचा नारा देत, कंगना संपूर्ण प्रदेशात जोमाने प्रचार करत आहे. “मला माहीत आहे की, तुम्ही आजपर्यंत इतरांचे ऐकत आला आहात. आता तुम्ही माझे ऐका”, असे वक्तव्य करून कंगनाने प्रचाराची सुरुवात केली.

हेही वाचा : भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार

आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरूच

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर मासे खाण्याच्या वादावरून हल्ला केला होता. बेंगळुरू दक्षिण भाजपा खासदार तेजस्वी सूर्या आणि तेजस्वी यादव यांच्या नावामध्ये गफलत झाली. त्यानंतर कंगनासह भाजपालाही विरोधकांच्या टीकांचा सामना करावा लागला होता.

आपल्या प्रचारात कंगना प्रतिस्पर्धी आणि राजघराण्यातील वंशज विक्रमादित्य यांचा उल्लेख शाहजादा म्हणून करत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

विक्रमादित्य सिंह यांचा ‘छोटा पप्पू’ म्हणून उल्लेख

काही दिवसांनंतर भाजपा उमेदवार कंगना रणौतने देशाच्या पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. पंडित मोतीलाल नेहरूंना ब्रिटिशांचे अंश आहेत असे ती म्हणाली. अतिशय रोखठोक भूमिका मांडणार्‍या कंगनाने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘इटालियन पत्नी’ आणि प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंह यांना ‘छोटा पप्पू’असेही संबोधले आहे. काँग्रेसने तिच्या विरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रचारसभांमध्ये ती कलम ३७० आणि राम मंदिराच्या उभारणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना दिसत आहे आणि अनेक प्रचारसभांमध्ये तिने राहुल गांधींची नक्कलही केली आहे. महिलांचा मुद्दा ती करत असलेल्या प्रचारात केंद्रस्थानी आहे.

कंगनावर अपवित्र असल्याची टीका

आपल्या प्रचारात कंगना प्रतिस्पर्धी आणि राजघराण्यातील वंशज विक्रमादित्य यांचा उल्लेख शाहजादा म्हणून करत आहे. भाजपाही राहुल गांधींना शाहजादाच म्हणतात. विक्रमादित्य यांनी कंगनावर टीका करत, तिला अपवित्र म्हणून संबोधले होते. यावर तिने आपल्या एका प्रचारसभेत म्हटले होते, “ते (विक्रमादित्य) मला अपवित्र म्हणतात. एक स्त्री अपवित्र असू शकते का? होय, मी चित्रपटात काम करते, मग काय? तिथे काम करणारे पुरुषही आहेतच.” ती पुढे म्हणाली, “भाजपा नेते विकासाविषयी आणि हिमाचल प्रदेशची मुलगी असल्याबद्दल बोलतात. माझं मनालीमध्ये घर आहे. मतदारसंघाला, संपूर्ण हिमाचलला विकासाची गरज आहे. रस्ते, हवाई संपर्क, शिक्षण सर्वांची गरज आहे,”असे ती आपल्या भाषणात म्हणाली.

बाशिंगमधील भाजपा कार्यकर्ते मोहनलाल ठाकूर म्हणतात की, रणौतची आक्रमकता पक्षाला आवश्यक आहे. “तिला कोणीही घाबरवू शकत नाही,” असे ठाकूर म्हणतात.

काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंहदेखील हिंदुत्व समर्थक, राम मंदिर समर्थक अशी आपली प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

काँग्रेस उमेदवाराचा हिंदुत्व समर्थक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न

काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंहदेखील हिंदुत्व समर्थक, राम मंदिर समर्थक अशी आपली प्रतिमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. ते म्हणाले, मी पवित्रतेचा मुद्दा उपस्थित केला, कारण रणौत यांनी स्वतः एकदा गोमांस खाण्याची वकिली केली होती. मी त्यांना केवळ आठवण करून दिली. काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य यांनी आरोप केला आहे की, त्यांचा प्रचार स्त्री-केंद्रित आणि मोदी-केंद्रित आहे. ते म्हणाले, लक्षात ठेवा, मी प्रभू रामाचा कट्टर भक्त आणि अभिमानी हिंदू आहे. मी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित होतो.”

स्थानिकांच्या भावना काय?

भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षश्रेष्ठींनी तिच्या प्रचारात बारकाईने लक्ष दिले आहे. प्रत्येक ठिकाणी रणौतला पाहण्यासाठी आणि सेल्फीसाठी लोकांची गर्दी होत आहे. मात्र, याचे मतांमध्ये रूपांतर होईल की नाही हे अनिश्चित आहे. बाशिंगमध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले जवळच्या गावातील माजी सरपंच सुरेश ठाकूर ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगतात, “हिमाचलच्या या वरच्या पट्ट्यात पारंपरिकपणे काँग्रेस पक्ष विजयी होत आला आहे.” पण, मंडीतील बालकृपी बाजारातील महेश कुमार म्हणतात, “विधानसभेच्या निकालांचा विचार केल्यास रणौत यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे.” भूतनाथ मार्केटमध्ये दुकान चालवणारे ६२ वर्षीय दिलीप कुमार म्हणतात, “काहीही होऊ शकते. रणौत हा स्थानिक चेहरा नाही, विक्रमादित्य मात्र स्थानिक चेहरा आहेत.” ८५ किमी दूर असलेल्या सेराजहून आलेले हीम सिंहदेखील म्हणाले, “परिणामांचा अंदाज लावणे कठीण आहे, मात्र कल विक्रमादित्यच्या बाजूने आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रातील दलित समुदाय घेतोय संविधान रक्षणाचा संकल्प; राजकारणातील संविधानाच्या दाव्या-प्रतिदाव्यांवर त्यांचे मत काय?

प्रदीर्घ कालावधीसाठी हा मतदारसंघ विक्रमादित्य यांच्या कुटुंबाकडे असताना, २०१४ आणि २०१९ मध्ये मंडी ही जागा भाजपाच्या राम स्वरूप शर्मा यांनी जिंकली होती. परंतु, शर्मा यांच्या निधनानंतर झालेल्या २०२१ च्या पोटनिवडणुकीत विक्रमादित्यच्या आई प्रतिभा सिंह यांनी ही जागा परत जिंकली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या मंडीतील १७ विधानसभा जागांपैकी १२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या.