Rohini Acharya Loksabha Debut राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची लेक राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या कन्या रोहिणी आचार्य बिहारच्या सारण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. रोहिणी यांनी डिसेंबर २०२२ मध्ये सिंगापूरच्या रुग्णालयात त्यांचे वडील लालू प्रसाद यांना आपली एक किडनी दान केली, तेव्हा त्यांचे नाव चर्चेत आले. लालू प्रसाद यादव प्रत्येक व्यासपीठावर आपल्या मुलीची प्रशंसा करताना दिसतात.

रोहिणी यांच्या नावाचीही रंजक कहाणी आहे. त्यांचा जन्म १९७९ मध्ये हिंदू कॅलेंडरच्या रोहिणी नक्षत्रात पाटणास्थित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कमला आचार्य यांच्या देखरेखीखाली झाला. तेव्हा डॉ. आचार्य यांनी लालू प्रसाद यांच्याकडून कोणतेही शुल्क घेण्यास नकार दिला. लालूंनी आग्रह धरला तेव्हा डॉ. आचार्य यांनी त्यांना विचारले की, ते त्यांच्या मुलीला त्यांचे आडनाव देऊ शकतात का? लालूंनी लगेच होकार दिला आणि आपल्या मुलीचे नाव त्यांनी रोहिणी आचार्य, असे केले.

लालू प्रसाद यादव यांच्या दोन्ही मुली लढविणार लोकसभा

३ मार्चला पाटणाच्या गांधी मैदानावर आरजेडीच्या जनविश्वास रॅलीत त्यांनी रोहिणी आचार्य यांची ओळख करून दिली, तेव्हाच रोहिणी या आगामी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आरजेडीने आता स्पष्ट केले आहे की, रोहिणी या सारण मतदारसंघातून लढू शकतात. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी या जागेवरून प्रतिनिधित्व केले आहे. लालू आणि राबरी यांच्या नऊ मुलांमध्ये मिसा, तेज प्रताप व तेजस्वी यांच्यानंतर राजकारणात प्रवेश करणाऱ्या त्या चौथ्या आहेत.

लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मिसा दुस-यांदा राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मिसा पुन्हा पाटलीपुत्रमधून आरजेडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत त्या या जागेवर पराभूत झाल्या होत्या. त्यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत; तर माजी मंत्री तेज प्रताप सध्या आमदार आहेत.

रोहिणी यांचा वादग्रस्त विवाह सोहळा

आरजेडीच्या सूत्रांनी सांगितले की, रोहिणी यांची सारण जागेसाठी पक्षाने एकमताने निवड केली होती आणि लालू यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनाही हे मान्य होते. मिसाप्रमाणे रोहिणी यांनीही एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. २००२ मध्ये त्यांनी पाटणाजवळील इच्छाबिघा येथील सॉफ्टवेअर इंजिनीयर समरेश सिंह यांच्याशी लग्न केले. त्या सध्या त्यांच्या दोन मुलांसह सिंगापूरमध्ये राहतात. रोहिणी यांचा विवाह सोहळा वादग्रस्त ठरला होता. लालूंच्या काही नातेवाइकांनी असा आरोप केला होता की, वर समरेश सिंह, त्यांचे वडील व माजी आयकर आयुक्त राव रणविजय सिंह यांना आणण्यासाठी त्यांच्या पाटणा शोरूममधून जबरदस्तीने नवीन गाड्या शहराच्या विमानतळापर्यंत नेल्या होत्या.

२०१७ मध्ये रोहिणी यांना राज्यसभेवर पाठविण्याबाबत चर्चा सुरू होती; परंतु त्यांनी राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. पाच वर्षांपासून त्या सोशल माध्यमांवर सक्रिय झाल्या आहेत. त्या नियमितपणे वडील किंवा भाऊ तेजस्वी यांची प्रशंसा किंवा त्यांचा बचाव करताना दिसतात. बिहारचे मुख्यमंत्री व जेडी(यू) अध्यक्ष नितीश कुमार यांच्यावरही त्या टीका करताना दिसतात.

भाजपा अध्यक्षांची लालू प्रसादांवर टीका

बिहार भाजपाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी शुक्रवारी लालूंवर हल्ला चढवला आणि आरोप केला की, त्यांनी मुलीने केलेल्या किडनीदानाच्या बदल्यात रोहिणी यांना सारणचे तिकीट दिले. रोहिणी यांनी स्वतःचा आणि आरजेडीचा बचाव करीत सम्राट यांचे नाव न घेता, क्षुद्र मानसिकता, अशी टीका केली. “माझ्या वडिलांना माझी एक किडनी देणे हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांच्यावर माझं प्रेम आहे. रोहिणी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या जन्मभूमी बिहारसाठी प्राणाचंही बलिदान देण्यास तयार आहे,” असे त्यांनी ‘एक्स’वर लिहिले.

वडिलांना किडनी दान केल्यानंतर लालू कुटुंबातील रोहिणी यांचा दर्जा उंचावला आहे. ११ जून २०२३ ला लालू यांच्या किडनी प्रत्यारोपणाच्या अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांच्या ७४ व्या वाढदिवसासाठी त्या पाटणाला गेल्या होत्या. त्यांनी पत्रकारांना सांगितले, “माझ्या आई-वडिलांची सेवा करणं माझ्यासाठी चार तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यासारखं आहे”.

शनिवारी राममनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त त्या म्हणाल्या, “समता आणि मानवतेवर आधारित राजकारणाला दिशा देणारं कालातीत व्यक्तिमत्त्व डॉ. राममनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहते.” राजकारणात आपल्या कुटुंबाचा प्रचार करीत असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर झाला होता. या आरोपांना उत्तर देत, लालूंनी ३ मार्चच्या सभेत म्हटले होते, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुटुंब नाही.” या विधानानंतर भाजपाकडून ‘मोदी का परिवार’ मोहीम सुरू झाली.

बिहारमध्ये कुख्यात गुंडाच्या पत्नीलाही लोकसभेचे तिकीट

रोहिणी यांचा बचाव करताना एका आरजेडी नेत्याने सांगितले, “कौटुंबिक समीकरणं बाजूला ठेवून बघितल्यास, सध्याच्या राजकीय परिस्थितीत रोहिणी आचार्य या सारणमधून पक्षाच्या सर्वोत्तम उमेदवार आहेत.” लालूंनी आतापर्यंत बिहारमधील नऊ उमेदवारांना आरजेडीची तिकिटे दिली आहेत; ज्यात कुख्यात गुंड अशोक महातो यांच्या पत्नी कुमारी अनिता यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांना मुंगेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. २००१ च्या नवादा तुरुंगफोडी प्रकरणात दोषी ठरल्यानंतर २०२९ पर्यंत महातो स्वतः निवडणूक लढवू शकत नसल्याने त्यांनी तिकीट मिळावे म्हणून गेल्या आठवड्यात अनिता यांच्याशी लग्न केले.

हेही वाचा : सरकारकडून काँग्रेसची आर्थिक कोंडी; नेमकं काय घडलंय?

लालूंच्या एकतर्फी निर्णयाने काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कारण- अद्याप इंडिया आघाडीत ४० लोकसभा मतदारसंघांसाठी जागावाटपाचा करार झालेला नाही.