चंद्रपूर : राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ काँग्रेस कायम राखणार की भाजप पराभवाचे उट्टे काढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी विदर्भात सर्वत्र भाजपला विजय मिळाला असताना चंद्रपूरमध्ये भाजपचा पराभव झाल्याने यंदा सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली जाणार का, याची उत्सुकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीकडून भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या तर महाविकास आघाडीकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी व वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव आघाडीवर असले तरी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे यांचीही नावे चर्चेत आहेत.

हेही वाचा – ममता बॅनर्जींच्या ‘एकला चलो रे’नंतर काँग्रेसचे नरमाईचे धोरण; इंडिया आघाडीत काय चाललंय?

चंद्रपूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९८० ते ८४ ते १९९१ ते १९९६ या दरम्यान काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे हे सलग चारवेळा येथून विजयी झाले. १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे पहिल्यांदा भाजपचे हंसराज अहीर येथून विजयी झाले. मात्र त्यानंतर १९९८ व १९९९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी सरळ लढतीत अहीर यांचा पराभव केला. २००४ च्या निवडणुकीत अहीर यांनी पुगलिया यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली व गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा व गडचिरोली हे दोन विधानसभा मतदारसंघ वगळून यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश करून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघ तयार झाला. पुर्नरचनेनंतर २००९ व २०१४ या सलग दोन निवडणुका भाजपच्या अहीर यांनी जिंकल्या. त्रिकोणी लढतीत शेतकरी संघटनेचे ॲड. वामनराव चटप यांंच्या उमेदवारीने कुणबी समाजाच्या मतांचे विभाजन झाले. त्याचा फायदा भाजपला झाला होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र मोदी लाट असताना शेवटच्या क्षणी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी खेचून आणणारे सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांनी अहीर यांचा ४४ हजार ७६३ मतांनी पराभव केला. ते राज्यातून काँग्रेसकडून निवडून आलेले एकमेव खासदार होते.

कुणबी व ओबीसीसह मुस्लीम, एससी समाजाची गठ्ठा मते धानोरकर यांच्या बाजूने पडली. या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने घेतलेली मते काँग्रेसच्या पथ्यावर पडली. ३० मे २०२३ रोजी धानोरकर यांचे अकाली निधन झाले. एक वर्ष शिल्लक असतानाही निवडणूक आयोगाने येथे पोटनिवडणूक घेतली नाही. धानोरकर यांच्या निधनानंतर लगेच पोटनिवडणूक झाली असती तर सहानुभूतीच्या लाटेवर धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर किंवा त्यांच्या कुटुंबातील अन्य कुणालाही सहज विजय मिळवता आला असता. पण तसे झाले नाही. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांची दावेदारी मजबूत मानली जाते.

महाविकास आघाडीच्या कोट्यातून ही जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येते. येथे पक्षाकडून धानोरकर यांच्यासोबतच विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, राजुराचे आमदार सुभाष धोटे, २०१९ मध्ये काँग्रेसची उमेदवारी घोषित झालेले व नंतर निवडणूक लढण्यास नकार देणारे तेली समाजाचे विनायक बांगडे यांच्यासह आठ ते दहा दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडणेच अधिक आहेत. वडेट्टीवार, धोटे व धानोरकर अशा गटातटात हा पक्ष विखुरलेला आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांचा विदर्भ किसान मजदूर संघ हा स्वतंत्र गट अस्तित्वात आहे. प्रतिभा धानोरकर व विजय वडेट्टीवार यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तक्रारी करून चौकशीचा ससेमिरा मागे लावल्याने काँग्रेसचा एक गट धानोरकर यांच्यावर तीव्र नाराज आहे. भाजप सर्वशक्तीनिशी मैदानात आहे. मुनगंटीवार यांनी क्रीडा महोत्सव, कृषी महोत्सव, राम मंदिरात राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दीपोत्सव आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतपेरणी सुरू केली आहे. लोकसभा प्रवासच्या माध्यमातून सातत्याने केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, कार्यक्रम सुरू आहेत. तर अहिरांच्याही पायाला भिंगरी लागली आहे.

हेही वाचा – जदयू-भाजपा युतीचं सूत्र ठरलं? नितीश कुमार मुख्यमंत्री, भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री? वाचा काय घडतंय…

जनसंपर्कात भाजप आघाडीवर असला तरी २०१९ च्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य अहीर प्रत्येक जाहीर सभेत बोलून दाखवत आहेत. सर्वत्र भाजप निवडून येत असताना माझा पराभव झालाच कसा, असा सवाल ते करीत आहेत. शैक्षणिक संस्था संचालक डॉ. अशोक जीवतोडे प्रयत्नरत आहेत. सरळ लढत काँग्रेसच्या फायद्याची असली तरी लढत बहुरंगी व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील राहील. इतर पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं व इतर छोट्या पक्षांची शक्ती मर्यादित आहे. कुणबीबहुल हा मतदारसंघ आहे. सोबतच तेली, माळी, अनुसूचित जाती आणि मुस्लीम समाजाच्या मतदारांची संख्या येथे लक्षणीय आहे. त्यामुळे भाजप अल्पसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार व हंसराज अहीर या दोघांपैकी एकाला उमेदवारी देणार की ओबीसी समाजाचा नवीन चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लाेकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील चित्र :

चंद्रपूर – किशोर जोरगेवार (अपक्ष), बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार (भाजप), राजुरा – सुभाष धोटे (काँग्रेस), वरोरा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), वणी – संजीव रेड्डी बोंदकुरवार (भाजप), आर्णी – संदीप धुर्वे (भाजप)

२०१९ निवडणुकीत मिळालेली मते :

सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस) – ५ लाख ५९ हजार ५०७

हंसराज अहीर (भाजप) – ५ लाख १४ हजार ७४४

राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी) – १ लाख १२ हजार ०७९ मते (९.०५ टक्के)

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review chandrapur candidacy to sudhir mungantiwar to defeat congress print politics news ssb
First published on: 27-01-2024 at 11:25 IST