ठाणे : अखंड शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात यंदा शिंदे आणि ठाकरे सेनेत कडवी झुंज पहायला मिळत आहे. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण असले तरी यंदा ठाणे कोणत्या शिवसेनेला साथ देते हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांना मानणारा कडवा, निष्ठावंत शिवसैनिक ही अनेक वर्ष ठाण्यातील शिवसेनेची ओळख ठरत आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा गड. त्यामुळे शिवसेनेतील दुभंगानंतर माजी नगरसेवक, पदाधिकारी, प्रमुख नेतेही त्यांच्यासोबत गेले. असे असले तरी ठाण्यातील शिवसेनेचा परंपरागत मतदार नेमका कुणामागे आहे हे हे या निवडणुकीच्या निमीत्ताने स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण मतदारसंघात ताकद वाढूनही लहान भावाच्या भूमीकेत राहीलेल्या भाजपची नाराजी दूर करण्यात शिंदेसेनेला कितपत यश मिळाले आहे यावरही येथील निकालाचे भवितव्य ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे लोकसभा मतदार संघामध्ये शिंदेच्या सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे हे दोन माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच निवडणुक होत आहे आणि त्यातही दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यामुळे येथे शिंदेची सेना विरुद्ध उद्धवची सेना असा सामना रंगला आहे. शिवसेना एकसंघ असताना गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत खासदार राजन विचारे हे चार लाख १० हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. इतके मोठे मताधिक्य हे केवळ त्यावेळच्या अखंड शिवसेनेचे अथवा राजन विचारे यांचे नव्हते असे तेव्हाही बोलले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा मोठा फायदा दोन्ही निवडणुकीत राजन विचारे यांना मिळाला होता. नवी मुंबई आणि मीरा-भाईदर ही दोन शहरे तशी बहुभाषिक आहे. ठाण्याचा तोंडवळाही गेल्या काही वर्षात बदलला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहीलेले राजन विचारे यांच्यासाठी ही निवडणुक सोपी निश्चितच नाही. मोठया संख्येने असलेला भाजपनिष्ठ मतदार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा, निवडणुक व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली ताकदीची रसद यापुढे विचारे आपण ‘निष्ठावान’ असल्याचा प्रचार आक्रमकपणे करताना दिसतात. भाजपला हा मतदारसंघ सुटला नसल्याने या पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहेच. वरिष्ठांनी कान टोचल्यामुळे भाजपचे नेते नरेश म्हस्के यांच्यासाठी कामाला लागले असले तरी कार्यकर्ते अजूनही अनेक ठिकाणी खट्टू दिसतात. जुन्या जाणत्या संघ विचारधारेशी ज‌वळीक असणाऱ्यांशी विचारे यांचा अजूनही संपर्क आहे. त्यामुळे ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांनी संघाला एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यामुळे येथील जुना परंपरागत मतदार नेमकी कोणती भूमीका घेतो याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : “पूर्वी भाजपाला RSS ची गरज लागत होती, आता…”, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा स्वयंपूर्ण आहे!”

नवी मुंबई, मिरा भाईदर कुणासाठी पोषक ?

या मतदार संघासाठी भाजप आग्रही होते. परंतु महायुतीच्या जागा वाटपात ही जागा आपल्याच ताब्यात ठेवण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. आधीच येथील उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झा.ला. त्यात भाजपला जागा मिळाली नसल्याने नाराज झालेले नाईक कुटूंबिय, त्यांचे समर्थक आणि भाजपचे पदाधिकारी यांची समजूत काढण्याचे काम नरेश म्हस्के यांना आठवडाभर करावे लागले. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिलीच निवडणुक होत असल्यामुळे हा मतदार संघ जिंकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. नवी मुंबईत गेल्या निवडणुकीत राजन विचारे यांना ८२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मिरा-भाईदरमध्येही ६५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य विचारे यांना मिळाले होते. हे दोन्ही भाग भाजपसाठी पोषक राहीले आहेत. नाराजी नाट्यानंतरही या दोन शहरांमध्ये मोदीनामामुळे मोठे मताधिक्य मिळेल अशी शिंदेसेनेला आशा आहे. उद्धव यांच्यासोबत निष्ठावान राहील्यामुळे मतदारसंघात विचारे यांच्याविषयी सहानभूती असली तरी मोदी प्रभाव, मुख्यमंत्र्यांची ताकद आणि मोठया निवडणुक व्यवस्थापनापुढे त्यांचा किती टिकाव लागतो हे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : अतिशयोक्ती करणाऱ्या पंतप्रधानाकडे सांगण्याजोगे आहेच काय?-खरगे

मताधिक्य कुणाला मिळणार

गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार राजन विचारे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत राजन विचारे यांना चार लाख १० हजार ५३० इतके मताधिक्य मिळाले होते. त्यापैकी मिरा-भाईंदरमधून ६९ हजार २६८, ओवळा-माजिवडामधून ९२ हजार ७१८, कोपरी-पाचपखाडीतून ८१ हजार ३४९, ठाणे शहरामधून ८३ हजार १०८, ऐरोलीमधून ४४ हजार ३६३, बेलापूरमधून ३९ हजार ७२४ इतके मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती. आता शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. या दोन्ही गटाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे हे मताधिक्य कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review of thane uddhav thackeray and eknath shinde print politics news css
First published on: 18-05-2024 at 15:21 IST