शिर्डी : साईबाबा देवस्थानमुळे प्रसिद्ध आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांच्या पराभवामुळे चर्चेत आलेला शिर्डी (राखीव) लोकसभा मतदारसंघ. त्याही पूर्वी तो दिग्गज नेते बाळासाहेब विखे यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. गेल्या दोन-तीन निवडणुकांचे चित्र जर पाहिले तर इच्छुक उमेदवारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात मारलेल्या उड्यांनी हा मतदारसंघ नजरेत भरतो. आताही इच्छुकांची नावे पाहिली तर तेच एक वैशिष्ट्ये लक्षात येते. परंतू कोणत्याही पक्षांचे कोणतेही उमेदवार असले तरी लढत अप्रत्यक्षपणे रंगते ती राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन परंपरागत विरोधक असलेल्या दिग्गज नेत्यांमध्येच. उमेदवारी ठरवतानाही त्यांच्या भूमिका या महत्वाच्या ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात ते शिवसेनेचे (शिंदे गट) सदाशिव लोखंडे. शिवसेनेने हा मतदारसंघ गेली सलग तीनवेळा जिंकल्याने महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला आहे. दुसरीकडे कागदपत्रावरील संख्याबळाच्या आधारे मतदारसंघात काँग्रेस प्रबळ दिसते, त्यामुळे जिल्ह्यातील किमान एक जागा तरी काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न होताना शिर्डीच्या जागेसाठी आग्रह धरला जात आहे. शिवसेनेतील फुटीपूर्वी भाजपने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, विमानतळाचे सक्षमीकरण, निळवंडे धरण यामार्गे बांधणी सुरु केली होती. खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भाजपच्या प्रयत्नांवर पाणी पडले.

हेही वाचा : नितीश कुमार, तेजस्वी यादव काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होणार, ‘सर्व काही आलबेल’चा संदेश देण्याचा प्रयत्न!

पूर्वीचा हा कोपरगाव मतदारसंघ. काँग्रेसचा बालेकिल्ला. बाळासाहेब विखे यांनी आठवेळा विजय मिळवला. त्यातील एकदा शिवसेनेचे उमेदवार म्हणूनही आहे. मतदारसंघ तसा तब्बल ११ सहकारी साखर कारखानदारांच्या साम्राज्यांनी व्यापलेला. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात लक्ष न घालणारा उमेदवार त्यांना हवा असतो. अशा उमेदवाराला साखरसम्राट अनुकूलता दाखवतात. सन २००८ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिर्डी नावाने अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी २००९ मध्ये या मतदारसंघातून निवडणूक लढविली. निवडणूक ‘ॲट्रॉसिटी’च्या मुद्द्यावर निवडणूक फिरली आणि आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला.

रामदास आठवले अद्यापि शिर्डीच्या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी वेळोवेळी तशी इच्छाही प्रकट केली आहे. महायुतीच्या मेळाव्यात आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांनी तशी मागणीही केली आहे. आठवले गटाची अधिवेशनेही सातत्याने शिर्डीतच होतात. तर दुसरीकडे ठाकरे गटाशी युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याही नावाची चर्चा शिर्डीसाठी अचानकपणे सुरू झाली आहे. तसे घडल्यास हा मतदारसंघ आणखी चर्चेत येईल.

हेही वाचा : काँग्रेसचे दोन नेते कोण, ज्यांनी अयोध्येतील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला लावली हजेरी!

रामदास आठवले यांचा शिवसेनेच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला. तेच वाकचौरे त्यानंतर काँग्रेस, अपक्ष, भाजप असा प्रवास करत, लोखंडे शिंदे गटाकडे गेल्याने, उमेदवारीसाठी पुन्हा ठाकरे गटात आले. त्यांनी शिवसेना सोडली तेंव्हा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला होता. तत्पूर्वी नाशिकचे आमदार बबनराव घोलप यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला होता. शिर्डीचे संपर्कप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. आपल्याला हवे तसे ठाकरे गटाचे पदाधिकारी त्यांनी बदलून घेतले. परंतु उमेदवारीसाठी वाकचौरे यांना झुकते माप मिळाल्याने नाराज घोलप यांनी उपनेते पदाचाच राजीनामाच दिला. पुन्हा पदाधिकारी बदलले गेले. त्यातून ठाकरे गटात विस्कळीतपणा निर्माण झाला. दुसरे इच्छुक माजी आमदार भाऊसाहेब कांबळे काँग्रेसमधून आलेले आहेत.

सदाशिव लोखंडे तसे नशीबवान खासदार. जनसंपर्क, काम नसले तरी नशीबाने त्यांना चांगली साथ दिली. कितीही अडचण झाली तरी नेत्यांशी जुळवून घेण्यात तरबेज. तेही भाजप, मनसे, पुन्हा भाजप असा प्रवास करत शिवसेनेत दाखल झाले. बबनराव घोलपांची कायदेशीर अडचण निर्माण झाल्याने, युतीच्या काळात शिर्डीतून शिवसेनेची त्यांनी ऐनवेळी उमेदवारी मिळवली आणि विजयी झाले. स्वतःचे कार्यकर्ते नाहीत, यंत्रणा नाही, तरीही कोणत्याही साखर कारखानदारांची अडचण होणार नाही अशा पद्धतीने काम करत त्यांनी मागील दोन्ही वेळेस जुळवून घेतले. मतदारसंघात तसे शिंदे गटाचे अस्तित्व फारसे नाही.

भाजपचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघे दिग्गज नेते याच मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रातील. दोघांच्या मान्यतेविना उमेदवार ठरणे आणि तो निवडूण येणेही अशक्य. यंदा भाजपने अधिकृतपणे ती जबाबदारी विखेंवर टाकली आहे तर काँग्रेसने अप्रत्यक्षपणे थोरात यांच्यावर. नगर जिल्ह्यातील दोनपैकी किमान एकतरी जागा काँग्रेसने लढवावी असा सूर पक्षात आळवला जात आहे. नगरच्या जागेवर ‘मविआ’मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा सांगितला आहे. त्यामुळे काँग्रेसने शिर्डीच्या जागेची मागणी केली आहे. परंतु पक्षाकडे सक्षम उमेदवार नाही. त्यातूनच श्रीरामपुरचे आमदार लहू कानडे यांचे नाव पुढे आणले जात आहे. अन्यथा हेमंत ओगले, उत्कर्षा रूपवते, राजेंद्र वाघमारे आशा नावांची यादी पक्षाकडे पाठवली गेली आहेत. बाळासाहेब थोरात या जागेसाठी किती आग्रही राहतात, यावर काँग्रेसची भूमिका अवलंबून राहील.

हेही वाचा : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून राज्यभर सर्वेक्षण; १ लाख २५ हजार कर्मचारी करणार सर्वेक्षण

समृद्धी महामार्ग, वंदे भारत रेल्वे, विमानतळ सक्षमीकरण, निळवंडे धरण आदीच्या माध्यमातून भाजपने शिर्डी या राखीव मतदारसंघाची बांधणी सुरु केली होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेला (शिंदे गट) द्यावा लागतो आहे. ‘मविआ’मध्ये मतदारसंघ कोणाकडे, ठाकरे गट की काँग्रेस? याची रस्सीखेच सुरू आहे. दोन्हीकडे सक्षम उमेदवारीचा शोध घेतला जात आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आमदारः

अकोले-डॉ. किरण लहामटे (राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट), संगमनेर- बाळासाहेब थोरात (काँग्रेस), कोपरगाव-आशुतोष काळे (राष्ट्रवादी, अजितदादा गट), शिर्डी- राधाकृष्ण विखे (भाजप), श्रीरामपुर-लहू कानडे (काँग्रेस), नेवासा-शंकरराव गडाख (अपक्ष, ठाकरे गट).

सन २०१९ च्या निवडणुकीतील मते:

सदाशिव लोखंडे-( शिवसेना) : ४८६८२०
भाऊसाहेब कांबळे- (काँग्रेस) ३६६६२५
भाऊसाहेब वाकचौरे- (अपक्ष) ३५५२६

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha constituency review shirdi importance of radhakrishna vikhe patil and balasaheb thorat print politics news css
First published on: 23-01-2024 at 10:37 IST