गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीसोबत राहिलेले लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आता आघाडीला सोडचिठ्ठी देत भाजपशी घरोबा केल्याची माहिती बाहेर आली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टाळून त्यांनी परस्पर भाजपशी संधान साधले आहे!
राज्यातील राजकीय पेचप्रसंगाची सांगता बुधवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर झाली. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी ठाकरे यांनी राजीनामा देत, नव्या सरकारचा मार्ग खुला करण्यापूर्वीच भाजपचे राज्यभरातील आमदार मुंबईत पोहोचले होते. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये करण्यात आली तेथे भाजपेतर आमदारांमध्ये शिंदे हेही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२०१९ च्या निवडणुकीत लोहा मतदारसंघात शेकापतर्फे निवडून आलेले शिंदे हे या पक्षाचे विधानसभेतील एकमेव आमदार आहेत. पक्षातर्फे निवडून आल्यावर प्रारंभी त्यांनी भाजपचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले होते. नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आघाडीमध्ये प्रवेश केला.

शिंदे आणि खासदार चिखलीकर यांचे जवळचे नातेसंबंध आहेत; पण गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे संबंध बिघडल्याची चर्चा आहे, त्याची जाहीर वाच्यताही झाली. खासदार चिखलीकर हे जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व करत असताना त्यांना टाळून शिंदे यांनी पुन्हा राजकीय निष्ठा बदलत आता भाजपशी सलगी केली आहे. त्यांच्या या राजकीय कोलांटउडीवर खासदार चिखलीकर यांनी कोणतेही भाष्य अद्याप केलेले नाही.
राजकीय घडामोडींमध्ये भाजपचे जिल्ह्यातील डॉ. तुषार राठोड, भीमराव केराम व राजेश पवार हे तीन विधानसभा सदस्य तसेच विधान परिषदेचे सदस्य, फडणवीस समर्थक राम पाटील रातोळीकर हे चारही आमदार मुंबईमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर बुधवारी रात्री झालेल्या जल्लोषामध्ये आमदार राठोड व पवार दिसत होते. खासदार चिखलीकरही मुंबईमध्ये आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नांदेड जिल्ह्याला स्थान मिळणार का, याकडे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक आमदाराच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.

भाजपने मुंबईत आलेल्या आपल्या सर्व आमदारांना बुधवारी दुपारनंतर कुलाबा भागातील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये थांबविले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री पदत्यागाची घोषणा करताच विधानसभेतील संख्याबळाची परीक्षा टळल्याचे स्पष्ट होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलमधील सर्व आमदारांना खोल्या सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे या आमदारांची तारांबळ उडाली, असेही सूत्रांनी सांगितले.

Aam Aadmi Party Lok Sabha Elections 2024 candidates
भाजपाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे चार उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सोमनाथ भारती?
Eknath shinde, kolhapur, hatkanangale lok sabha constituency
मुख्यमंत्री शिंदे पुन्हा कोल्हापुरात, हातकणंगले मतदारसंघासाठी लक्ष घातले
Jharkhand mp geeta kora
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का; झारखंडमधील एकमेव खासदार गीता कोरा यांचा भाजपात प्रवेश, कारण काय?
Shahaji Bapu Patil
आगामी निवडणुकीत मी किमान ४० हजार मतांनी निवडून येईल – आमदार शहाजी बापू पाटील