कमळ चिन्हाशिवाय महायुतीमध्ये ‘ शिट्टी ’ नावाचे एक चिन्ह वाढेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या उमेदवाराचा प्रचार करतील असे वर्षभरापूर्वी कोणी म्हणाले असते तर ?… समाजमाध्यमी हलकल्लोळ झाला असता. पण ताकदवान भाजपच्या नेत्यांनी परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आणि ‘कमळा’ च्या शेजारी ‘शिट्टी’चे चिन्ह असणाऱ्या फलकांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.

‘काँग्रेस’ ची मानसिकता रझाकारी असल्याचा आरोप करत त्यांनी मराठवाड्याचा श्वास कोंडण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप केला. ते पाच वर्षांपूर्वी नांदेड येथील सभेत महायुतीमधील तेव्हाच्या घटक पक्षाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना मतदान करा असे आवाहन नरेंद्र मोदी करत होते, ते या वेळी त्याच बंडू जाधव नावाच्या उमेदवारास पराभूत करा आणि महादेव जानकर यांना निवडून द्या, असे आवाहन करण्यासाठी सभा घेत होते. पाच वर्षांत राजकीय पट पूर्णत: बदलला आहे. ‘ मोदी’, मोदी’ असा जयघोष पाच वर्षांपूर्वी होता आणि आजही सभेत तो जयघोष कायम आहे.
२०१४ मध्ये मोदी जॅकेटची फॅशन आली होती. जो तो ‘जॅकेट’ घालून मिरवायचा. आता ‘जॅकेट’ तसं फार महत्त्वाचं नाही राहिले. २०१९ मध्ये नांदेडच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा उल्लेख ‘डिलर’ म्हणून केला होता. ते अशोकराव चव्हाण आता भाजपच्या सर्वोच्च नेत्यांसमवेत बसलेले नांदेडकरांनी शनिवारी अनुभवले. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून भाषण करणारे फडणवीस आता उपमुख्यमंत्रीपदी आले होते. तेव्हाचा ‘डिलर’ आता ‘लिडर’ बनला होता.

हेही वाचा – तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?

खरे तर २०१९ मध्ये ज्या चिखलीकरांना ‘लिडर’ बनावायचे होते पण ते पुन्हा एकदा अशोकराव चव्हाणांच्या मदतीने नांदेड लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत. ‘शहिदो’ का अपमान अशा शब्दात ज्या ‘आदर्श’ सोसायटीचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये केला होता. त्याचा २०२४ मध्ये उल्लेखही नव्हता. आता महाराष्ट्राच्या विकासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासमवेत आता ‘अशोक चव्हाण’ही आले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. केवळ अशोक चव्हाण नाही तर शंकरराव चव्हाण यांची ‘पुट्टपूर्ती’मध्ये झालेली भेट व त्यांची प्रेमळपणाची वागणूक याचा दाखलाही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

पाच वर्षांतील राजकीय पटामध्ये झालेले बदल मोठे विलक्षण असले तरी ‘काँग्रेस’ विरोधाची प्रचारधार आता प्रादेशिक प्रश्नांपर्यंत सरकल्याचे चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभांमधून दिसून येते. पंतप्रधान म्हणाले, ‘काँग्रेस ही अशी आधारवेल आहे जिला न स्वत:ची जमीन आहे ना पाळेमुळे. ज्याला आधार देईल, त्यालाच ती वेल शुष्क करते. महाराष्ट्रात सत्तेत असताना काँग्रेस आणि नकली शिवसेनेने मराठवाड्यातून निजामाचे राज्य गेले आहे, हे जाणवूच दिले नाही. मराठवाड्याचा विकास होऊ न देणाऱ्या रझाकारी मानसिकतेला आपण थारा देणार काय, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. नांदेडच्या सभेत दुष्काळ आणि पाण्याचे संकट एकाच दिवसात निर्माण झालेले नाही. या विभागाचा श्वास कोंडून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. पण एनडीए सरकार मराठवाड्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस ही भ्रष्टाचाराचा वारसा असणारा पक्ष आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. जम्मू काश्मीरमधील कायद्यातील तरतुदी बदलण्यास काँग्रेस इच्छुक असल्याची टीका त्यांनी केली होती. राष्ट्रीय मुद्द्यांवर भाषण या वेळी प्रादेशिकतेला जोडून घेणारे होते.

काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षातील लोक एका ‘टायटानिक’ जहाजात बसलेले आहेत, जे घाबरले आहेत ते मैदान सोडून पळत असल्याची टीका केली होती. तेव्हा राजीव सातव, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे निवडणुकीच्या रिंगणातून कसे बाहेर पडले आहेत, हेही त्यांनी सांगितले होते. पाच वर्षांपूर्वी उल्लेख केलेल्या तीन नेत्यांपैकी राजीव सातव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रफुल्ल पटेल भाजपचे आता सहकारी आहेत. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत शरद पवार भाजप विरोधात मात्र मैदानात आहेत, असे चित्र सध्या दिसून येत आहे.

हेही वाचा – गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप

पाच वर्षांपूवी नांदेडच्या सभेत काँग्रेसच्या जाहिरनाम्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘धकोसलापत्र’ या शब्दात हिणवले होते. या वेळी वायनाडमधून ‘शहजादे’ धोक्यात असल्याचे सांगत ते आता सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असल्याची माहिती मतदारांना दिली. काँग्रेस विरोधाचा राष्ट्रीय सूर आता प्रादेशिक प्रश्नापर्यंत सरकला आहे. नव्या मांडणीमध्ये ‘मोदी’चा जयघोष सुरू आहे. गळ्यात घालण्यासाठी भाजपचे पट्टे किंवा दस्त्या आता कमी पडू लागल्या आहेत, असे अशोक चव्हाण सांगत आहेत. ‘मोदी’ ‘मोदी’चा नारा सभास्थळी कायम आहे. राजकीय पटमांडणीत भाजपमध्ये काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांची संख्या अधिक दिसू लागली आहे.