सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नसताना पुण्याच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ठिणगी पडली आहे. ही ठिणगी टाकण्याचे काम गेल्या महिनाभरापासून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे करत आले आहेत. पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी’चा दावा करून काँग्रेसला खिजवायचे. त्यानंतर पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी पेटून उठायचे आणि या जागेवर आमचाच हक्क असल्याचा ठाम निर्धार करायचा, हा ‘राजकीय खेळ’ पवार खेळत आहेत. अर्थात यामागे आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीची पुण्यात चर्चा घडवून आणण्याचा डाव असून, त्यामध्ये काँग्रेस वेळोवेळी फसत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

आतापर्यंतच्या पुणे लोकसभेच्या निवडणुकांपैकी १९९९ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची समोरासमोर लढली होती. त्यानंतर २००४ पासून ही जागा काँग्रेस लढत आली आहे. २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसकडून माजी खासदार सुरेश कलमाडी हे निवडून आले होते. मात्र, २०१४ पासून काँग्रेसचा या मतदार संघात पराभव होत आला आहे. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचे मताधिक्य हे घटत चालल्याची स्थिती आहे. सध्या स्थानिक पातळीवर काँग्रेस कमकूवत झाली आहे. माजी आमदार रमेश बागवे यांना शहराध्यक्ष पदावरून काढून माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांच्याकडे प्रभारी शहराध्यक्ष पद देण्यात आले आहे. तेव्हापासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. शहर काँग्रेसला कलमाडी यांच्यानंतर एकमुखी नेतृत्त्व राहिलेले नाही. काँग्रेसच्या या स्थितीचा फायदा घेत विरोधी पक्षनेते अजित पवार हे लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसला डिवचण्याचे काम गेल्या महिनाभरापासून करत आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात ताकद असल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे, निवडून येणऱ्यालाच उमेदवारी मिळावी. अशी वक्तव्ये पुण्यात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा प्रसार माध्यमांशी बोलताना पवार करत आहेत. त्यांनी असे वक्तव्य केले की, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पुण्याच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचा ठाम निर्धार करायचा…हा खेळ महिनाभरापासून सुरू आहे. पवार यांच्या वक्तव्याची प्रदेश पातळीवरही दखल घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत मुंबईत या जागेवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या जागेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पटोले यांनी घेतली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची चर्चा शहरभर घडवायची, हा पवार यांचा यामागील सुप्त राजकीय डाव आहे आणि त्यात काँग्रेस फसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण?

पुण्यात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे नाव चर्चेत असले, तरी त्यांचे कार्यक्षेत्र हे हडपसर विधानसभा मतदार संघात आहे. हा परिसर पुणे लोकसभा मतदार संघात नसून शिरूर लोकसभा मतदार संघात आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे ४२ नगरसेवक असले, तरी पुणे लोकसभा मतदार संघामध्ये त्यापैकी अवघे १३ नगरसेवक आहेत. त्यापैकी एकही उमेदवारीसाठी सक्षम नाही. पुण्यात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे एकच आमदार आहेत. या उलट काँग्रेसचे दहा नगरसेवक हे पुणे लोकसभा मतदार संघातील आहे. तसेच कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये आत्मविश्वास आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांना लोकसभा निवडणुकीचा यापूर्वीचा अनुभव आहे. काँग्रेसकडे ही जमेची बाजू असली, तरी पवार हे कमकूवत झालेल्या काँग्रेसला डिवचण्याची संधी सोडत नसल्याचे दिसून येत आहे.

मावळमध्ये ‘पुत्रप्रेम’

मावळ लोकसभा मतदार संघात मागील निवडणुकीत पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला होता. ते शल्य बोचत असल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत मावळमधून मुलाला निवडून आणण्याचा निर्धार पवार केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मावळमधील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेना शिंदे गटात गेले असल्याने ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांशी जवळीक साधण्यात येत आहे. सध्या भाजपमध्ये असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही माजी नगरसेवक हे पवार यांच्या संपर्कात आहेत. पिंपरी-चिंचवडबरोबर कोकणातील संपर्कही वाढविण्यास सुरुवात झाली आहे.

पार्थ पवार यांच्याशिवाय मावळमधून माजी मंत्री अदिती तटकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे. या मतदार संघातील कर्जत उरण, पनवेल या विधानसभा मतदार संघांत खासदार सुनील तटकरे यांची ताकद आहे. त्यामुळे पार्थ पवार हे उमेदवार नसतील, तर अदिती तटकरे यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीकडून विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. खासदार बारणे यांची चिंचवड विधानसभा संघांमध्ये ताकद आहे. उर्वरित ठिकाणी त्यांना भाजपवर अवलंबून रहावे लागणार आहे. पार्थ यांना निवडून आण्यासाठी ही संधी असल्याने त्यादृष्टीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune lok sabha by election ajit pawar ncp dispute in congress pune print politics news ysh
First published on: 05-06-2023 at 10:54 IST