आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे अलीकडेच ब्रिटनमध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी यूकेमधील लेबर पार्टीच्या खासदार प्रीत कौर गिल यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्या भेटीचे फोटोही गिल यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र, या भेटीवरून राघव चढ्ढा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या भेटीवरून भाजपानेही चड्ढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करीत ‘हे कसले सरकार,’ असा प्रश्न आम आदमी पक्षाला विचारला आहे.

लेबर पार्टीच्या खासदार प्रीत कौर गिल या खलिस्तानसमर्थक मानल्या जातात. २०१७ मध्ये त्या पहिल्यांदा खासदार झाल्या. महत्त्वाचे म्हणजे त्या युनायटेड किंग्डममधील पहिल्या शीख खासदार आहेत. तसेच त्या यूकेमध्ये आरोग्य खात्याच्या शॅडो मंत्रीदेखील आहेत. खलिस्तानसमर्थक मानल्या जाणाऱ्या प्रीत कौर गिल यांच्यावर भारत सरकारने अनेकदा टीकाही केली आहे.

हेही वाचा – Loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आव्हान देणार्‍या सोनल पटेल कोण आहेत?

५१ वर्षीय गिल या ब्रिटनमधील शिखांसाठी असलेल्या सर्वपक्षीय संसदीय गटाच्या (APPG) अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी महिन्यात ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये बोलताना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. भारताशी संबंधित काही एजंट ब्रिटनमधील शीख नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच काही शीख नागरिक तर भारतीय एजंटांच्या हिट लिस्टवर होते, असा आरोपही त्यांनी केला होता. ब्रिटनमधील शीख नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने कोणती पावले उचलली, असा प्रश्नही त्यांनी सुरक्षामंत्री टॉम तुगेंधत यांना विचारला होता.

दरम्यान, या भेटीवरून भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. “हे कसले सरकार आहे? राज्याचा (पंजाब) एक खासदार भारतविरोधी बोलणाऱ्या आणि दहशतवादाला समर्थन देणाऱ्यांबरोबर फोटो काढण्यासाठी उभा आहे”, असे ते म्हणाले. भाजपाच्या टीकेवर आम आदमी पक्षाने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण आहेत प्रीत कौर गिल?

प्रीत कौर गिल यांचा जन्म १९७२ मध्ये बर्मिंगहॅममधील एजबॅस्टनमध्ये झाला. त्यांचे वडील बसचालक; तर आई शिवणकाम करीत होत्या. गिल यांचे वडील दलवीर सिंग हे १९६२ मध्ये भारतातील जालंधरमधून ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समध्ये स्थलांतरीत झाले. १९८४ ते २००४ दरम्यान ते ब्रिटनमधील पहिल्या गुरुद्वाराचे अध्यक्षही होते.

गिल यांनी बॉर्नविले कॉलेजमधून मानसशास्त्र आणि समाजशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेल्या. तिथे त्यांनी समाजशास्त्र या विषयातून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या काही दिवस भारतातही राहिल्या. येथे त्यांनी दिल्लीतील गरीब मुलांसाठी काम केले. त्यानंतर काही काळ त्यांनी इस्रायलमधील किबुत्झमध्येही व्यतीत केला.

गिल यांनी ब्रिटनमध्ये आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात बरेच काम केले आहे. गिल यांनी २०१७ मध्ये तेथे पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर ब्रिटिश नागरिक जगतार सिंग जोहल ऊर्फ जग्गी जोहल याच्या सुटकेची मागणी केली. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा भारतीय अधिकाऱ्यांचा राग ओढावून घेतला. जगतार सिंग जोहल याला भारत सरकारने अनधिकृतपणे अटक केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा – दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

जगतार सिंग जोहलला २०१७ मध्ये पंजाब दौऱ्यावर असताना अटक करण्यात आली होती. पंजाबमधील टार्गेट किलिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद आहे. गिल यांनी २०१७ नंतर अनेकदा जगतार सिंग जोहल याच्या सुटकेची मागणी केली आहे.

दरम्यान, गिल या आजही त्यांच्या जालंधर येथील कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. २०१७ मध्ये यूकेमध्ये पहिल्यांदा खासदार झाल्यानंतर जालंधरमधील त्यांच्या गावी मोठी मिरवणूकही काढण्यात आली होती. गिल यांनी अनेकदा पंजाबमधील ड्रग्जच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. तसेच त्यांनी २०२१ मध्ये कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिला होता.