भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौतला उमेदवारी दिल्यानंतर राज्यातील एकमेकांशी भांडणारे काँग्रेस नेते एकत्र आले आहेत. इतकेच नव्हे तर, हिमाचल प्रदेशमधील दोन मोठ्या ‘राजघराण्यां’चीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मंडीच्या विद्यमान खासदार आणि काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा सिंह यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले होते. राज्यातील वातावरण काँग्रेसला अनुकूल नाही, मंडीतील कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसला जिंकून आणण्याचा आत्मविश्वास नाही, असे सिंह म्हणाल्या होत्या. पण, मंडीमध्ये कंगनाची उमेदवारी जाहीर होताच प्रतिभा सिंह यांचा सूर बदलला असून हायकमांडने सांगितले तर आपण मंडीतून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याविरोधात प्रतिभा सिंह व त्यांचा मुलगा विक्रमादित्य सिंह यांनी आघाडी उघडली होती. हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. पण, सुक्खूंना मुख्यमंत्री केल्यानंतर दिवंगत वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह व मुलगा विक्रमादित्य यांनी पक्षांतर्गत वर्चस्वाची लढाई सुरू केली होती. या संघर्षामध्ये अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. प्रतिभा सिंह यांच्या गटातील सहा आमदारांनी सिंघवी विरोधात मतदान केले होते. या सर्व अपात्र आमदारांना पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा पक्षांतर्गत टोकाला गेलेला वाद कंगनाच्या उमेदवारीमुळे अचानक मिटला असून प्रतिभा सिंह यांनी मुख्यमंत्री सुक्खूंच्या निवासस्थानी जाऊन होळी साजरी केली. काँग्रेसच्या घरच्या भांडणामध्ये बाहेरच्या तिसऱ्याने हस्तक्षेप केल्यामुळे काँग्रेसचे घरचे सदस्य कंगना विरोधात एकत्र आले आहेत. विक्रमादित्य यांनीही कंगनावर ‘बाहेरचा उमेदवार’ असल्याचा शिक्का मारला आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेशमधील चार जागांवरील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मंडीमधून पुन्हा एकदा प्रतिभा सिंह यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

हिमाचल प्रदेशमध्ये पारंपरिक दोन राजपूत ‘राजघराण्यां’चे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे वीरभद्र सिंह व भाजपचे प्रेमकुमार धुमळ. दोघेही मुख्यमंत्री झाले होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोत व भाजपच्या वसुंधरा राजे यांना दर पाच वर्षांनी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत असे. राजस्थानमध्ये जशी राजकीय परिस्थिती बदलली तशी हिमाचल प्रदेशमध्येही बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंडीमधून कंगना राणौत हिला उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांच्या ‘राजघराण्यां’ची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. कंगना राणौतही राजपूत असल्याने दोन्ही राजपूत ‘राजघराण्यां’ना नव्या राजपूत उमेदवाराने आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमळ यांचे पुत्र अनुराग ठाकूर केंद्रीय मंत्री असून त्यांना चौथ्यांदा हमीरपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आता त्यांच्यावर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचीही जबाबदारी दिलेली असून पक्षाला दगाफटका झाला तर त्याचे खापर अनुराग ठाकूर यांच्यावर फोडले जाईल. २०२२ मध्ये हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत धुमळ गटाने भाजपला अपेक्षित सहकार्य केले नसल्याचे बोलले गेले होते. काँग्रेसमध्ये वीरभद्र सिंह घराण्याप्रमाणे भाजपमध्ये प्रेमकुमार धुमळ घराणेही पक्षांतर्गत वर्चस्वासाठी संघर्ष करत आहे. अनुराग ठाकूर केंद्रात सक्रिय असले तरी त्यांना हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होण्याची मनीषा असल्याचे सांगितले जाते. पण, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने कंगना राणौत यांच्या रुपात नवा स्पर्धक निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंगनाला पक्षांतर्गत छुप्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. शिवाय, दोन ‘राजघराण्यां’विरोधातील संघर्षालाही तोंड द्यावे लागेल अशीही चर्चा होत आहे.