अलिबाग- रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार सुनील तटकरे निवडणूक लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केल्यावर रायगड जिल्ह्यातील भाजपमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. भाजप नेत्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड लोकसभा मतदारसंघातून यंदा भाजपला उमेदवारी मिळावी यासाठी जिल्हा कार्यकारिणी आग्रही होती. पक्षाने कोकण संघटक म्हणून कार्यरत असणाऱ्या मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे तशी जाहीर मागणी केली होती. रायगड लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही तशी मागणी करण्यात आली होती. रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर वाईट घडेल असा सुचक इशारा आमदार रविंद्र पाटील यांनी दिला होता. सुनील तटकरे उमेदवार नकोच यासाठी भाजपची जिल्हा कार्यकारीणी आग्रही होती. त्यामुळे सहजासहजी रायगडची जागा भाजप राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार नाही अशी चर्चा होती.

हेही वाचा – भाजपने उमेदवारी नाकारताच माजी मंत्र्याच्या कन्येचा थयथयाट

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या रायगड दौऱ्यात तसे स्पष्ट संकेत दिले होते. जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देशही दिले होते. यानंतर भाजपने विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी करून बुथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले होते. जिल्ह्यात पाच वर्षांत बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. पाच वर्षांपूर्वीची राजकीय परिस्थिती आणि आजची राजकीय परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. मागील वेळची राजकीय समिकरणे आता राहिलेली नाहीत त्यामुळे निवडणुकीत भाजपचाच उमेदवार असावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी पक्षनिरीक्षक यांच्यासमोर बोलून दाखवला होता. पक्षश्रेष्ठी यावर सकारात्मक विचार करतील, अशी आशा जिल्हा कार्यकारिणीला होती. मात्र ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा खासदार त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार असे सुत्रच जागावाटपासाठी लावले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आणि अजित पवार यांनी सुनील तटकरे हेच रायगडमधून महायुतीचे उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भाजपच्या गोटात निराशेचे वातावरण आहे.

जोवर आमच्या पक्षाकडून याबाबत अधिकृत माहिती येत नाही, तोवर प्रतिक्रिया देणे उचीत ठरणार नाही. – धैर्यशील पाटील, जिल्हाध्यक्ष भाजपा दक्षिण रायगड

हेही वाचा – ५४ वर्षांनंतर कॉंग्रेसकडून चंद्रपूरमध्ये महिला उमेदवार

भाजपला हा मतदारसंघ हवा होता. शेवटपर्यंत टोकाचा आग्रह धरला होता. बुथ लेव्हलपर्यंत आम्ही तयारी केली होती. त्यामुळे धैर्यशील पाटील यांच्या सारखा धडाडीचा नेता उमेदवार म्हणून आम्हाला हवा होता. पक्षाने व्यापक हीत लक्षात घेऊन जागावाटपाबाबत जर हा निर्णय घेतला असेल तर तो नाकारण्याचे कारण नाही. – सतिश धारप, जिल्हा संघटक, भाजपा.

हेही वाचा – परभणीत महायुतीचे धक्कातंत्र

नव्या दमाचा, स्वच्छ प्रतिमेचा आणि आमच्या पक्षाच्या चिन्हावरील उमेदवार मिळावा अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. तशी मागणी आम्ही केली होती. – वैकुंठ पाटील, भाजप नेते पेण

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raigad lok sabha sunil tatkare candidacy in raigad disappointment in bjp print politics news ssb
First published on: 26-03-2024 at 17:57 IST