Loksabha Election Baramulla पीपल्स कॉन्फरन्सचे (पीसी) अध्यक्ष सज्जाद लोन आगामी लोकसभा निवडणुकीत बारामुल्ला मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सोमवारी सज्जाद यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. यावेळी पीसीचे सरचिटणीस इम्रान अन्सारी म्हणाले, “बारामुल्ला जागेसाठी आमच्या पक्षाचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांच्या उमेदवारीला पक्षाने समर्थन दिले आहे.” सज्जाद लोन यांची लोकसभा निवडणुकीत उतरण्याची ही दुसरी वेळ आहे. २००९ मध्ये त्यांनी उत्तर काश्मीरमधून निवडणूक लढवली होती. परंतु, नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) च्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. बारामुल्ला ही जागा आतापर्यंत एनसी किंवा काँग्रेसनेच जिंकली आहे.

जम्मू-काश्मीरमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणारा पहिला पक्ष

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या जागेवरून पीसीचे उमेदवार राजा अजाज अली यांचा एनसीच्या मोहम्मद अकबर लोन यांच्याकडून तब्बल ३० हजार मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात मध्य काश्मीरमधील बडगाम ते उत्तरेकडील गुलमर्ग, लोलाब, उरी या भागांचा समावेश आहे. बारामुल्ला मतदारसंघात सुमारे ११ लाख मतदार आहेत. पीसीने सांगितले की, ते काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर आणि अनंतनाग या मतदारसंघाचा निर्णय योग्य वेळी घेतील. परंतु, जम्मूमधील एकही जागा लढवणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. अन्सारी म्हणाले की, पक्षाच्या नेत्यांशी झालेल्या चर्चेच्या आधारावर पीसीने इतर लोकसभा जागा आणि जम्मू – काश्मीरमधील विरोधकांना पराभूत कसे करायचे, याची रणनीती तयार केली आहे.

“बारामुल्ला जागेसाठी पक्ष तयार आहे. जी जागा आम्ही स्वबळावर जिंकू शकू, त्या जागेवर आम्ही निवडणूक लढवू. आम्ही जम्मू प्रदेशातून निवडणूक लढवणार नाही आणि मतविभागणीद्वारे एकही मत वाया जाऊ देणार नाह”, असे अन्सारी म्हणाले. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणारा पीपल्स कॉन्फरन्स (पीसी) हा जम्मू-काश्मीरमधील पहिला पक्ष ठरला आहे. केंद्रशासित प्रदेशातील इंडिया आघाडीतील तीन प्रमुख पक्ष – नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) , पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि काँग्रेस यांच्यात अद्यापही जागावाटपाचा निर्णय झालेला नाही.

वडिलांच्या हत्येनंतर पीपल्स कॉन्फरन्सचे सूत्र हाती

५७ वर्षीय सज्जाद यांचे वडील अब्दुल गनी लोन यांची अतिरेक्यांनी हत्या केली. वडिलांच्या हत्येनंतर २००४ मध्ये त्यांनी पीपल्स कॉन्फरन्सचे सूत्र हाती घेतले. त्यांनी २०१४ ची जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक हंदवाडा येथून लढवली आणि जिंकली. मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीडीपी-भाजपा सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. जून २०१८ मध्ये भाजपाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर मेहबुबा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर सज्जाद यांनी भाजपाच्या पाठिंब्याने पुढील सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्य विधानसभा बरखास्त केली.

हेही वाचा : उत्तर प्रदेश विजयासाठी सपाने कसली कंबर; गोंडातील बेनी प्रसाद वर्मांच्या नातीला दिली उमेदवारी

सज्जाद २०२० मध्ये एनसी आणि पीडीपीसह काश्मीरच्या मुख्य पक्षांनी स्थापन केलेल्या पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन (पीएजीडी) चादेखील एक भाग होते. ऑगस्ट २०१९ मध्ये केंद्रातील भाजपा सरकारने विशेष राज्याचा दर्जा काढून घेत, संविधानातील कलम ३७० आणि कलम ३५अ रद्दबातल केले होते. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळावा अशी या गटाची मागणी होती. सज्जाद यांनी २०२१ मध्ये पीएजीडीमधून माघार घेतली.