पश्चिम बंगालमध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरत आहे. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजपा हे प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. एकीकडे ममता बॅनर्जी यांनी ३० हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे; तर दुसरीकडे भाजपाने ३५ हून अधिक जागा जिंकण्याचा दावा केला आहे. दोन्ही पक्षांत दावे-प्रतिदावे सुरू असताना ममता बॅनर्जी यांच्या एका वक्तव्याने पश्चिम बंगालमधील साधू-संत आक्रमक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमवारी (२० मे) मुर्शिदाबादमधील भारत सेवाश्रम संघाच्या बेलडंगा शाखेचे सचिव कार्तिक महाराज यांनी मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवून, त्यांच्या संघटनेबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली. कार्तिक महाराज यांना प्रदीप्तानंद महाराज म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्याविरोधात एका प्रचारसभेत ममता बॅनर्जींनी वादग्रस्त वक्तव्य केले होते; ज्यानंतर महाराज आणि त्यांचे अनुयायी आक्रमक झाले. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बॅनर्जी यांच्यावर टीका केली आणि म्हटले की, त्या या संघटनांना धमकी देत आहेत. भारत सेवाश्रम संघ काय आहे? आणि कार्तिक महाराज चर्चेत का आहेत? नेमके प्रकरण काय? याबद्दल जाणून घेऊ या.

हेही वाचा : भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?

नेमके प्रकरण काय?

शनिवारी धार्मिक नेते श्री रामकृष्ण यांच्या पत्नी शारदा देवी यांचे जन्मस्थान असलेल्या हुगळीच्या जयरामबाटी शहरात एका सभेला संबोधित करताना बॅनर्जी यांनी आरोप केला की, भारत सेवाश्रम संघ आणि रामकृष्ण मिशनचे काही सदस्य भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

“बरहामपूरमध्ये एक महाराज आहेत. मी त्यांच्याबद्दल खूप दिवसांपासून ऐकत आहे. कार्तिक महाराज म्हणतात की, ते मतदान केंद्रावर कोणत्याही टीएमसी एजंटला परवानगी देणार नाहीत. मी त्यांना संत मानत नाही. कारण- ते राजकारणात गुंतले आहेत आणि देशाचे नुकसान करीत आहेत. मी भारत सेवाश्रम संघाचा खूप आदर करायचे. माझ्या सन्माननीय संस्थांच्या यादीत बर्‍याच काळापासून या संघाचाही समावेश आहे,” असे मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांच्या विधानानंतर एका दिवसाने पंतप्रधानांनी पुरुलियातील प्रचारसभेत प्रतिक्रिया दिली. “यावेळी त्यांनी (टीएमसी) सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. इस्कॉन, रामकृष्ण मिशन व भारत सेवाश्रम संघ या संस्था त्यांच्या सेवा व नैतिकतेसाठी देशात आणि जगभरात ओळखल्या जातात. पण, आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांची नावे घेऊन मंचावरून त्यांना खुलेआम धमकावत आहेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले, “अशा धार्मिक संघटनांचा आदर न करणाऱ्या सरकारला तुमच्या मतांनी मोठा धडा शिकवला पाहिजे; जेणेकरून भविष्यात अशा संघटनांचा अपमान करण्याची त्यांची हिंमत होणार नाही.”

सोमवारी बॅनर्जी यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, मी कोणत्याही संस्थेच्या विरोधात बोललेले नाही. “मी फक्त काही व्यक्तींबद्दल बोलले. अशीच एक व्यक्ती आहे कार्तिक महाराज. मी त्यांच्यावर बोलले. कारण- मला माहिती मिळाली की, ते तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक प्रतिनिधींना बूथवर येण्याची परवानगी देत ​​नाहीत. ते भाजपाच्या वतीने धर्माच्या नावाखाली काम करतात. त्यांना राजकीय कार्यात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु, अशा परिस्थितीत त्यांनी भाजपाचा आश्रय घेण्याऐवजी कमळाचे चिन्ह सार्वजनिकपणे स्वीकारले पाहिजे,” असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भारत सेवाश्रम संघ

संस्थेचे मूळ आचार्य श्रीमत् स्वामी प्रणवानंद जी महाराज यांच्याकडे आहे. ते पूर्वी बंगालच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होते. संस्थेअंतर्गत पहिला आश्रम १९७१ मध्ये बाजीतपूर येथे स्थापन करण्यात आला; जो आता बांगलादेशात आहे. संस्थेच्या स्थापनेनंतर लगेचच या संस्थेने दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतकार्य केले असल्याचे सांगितले जाते. हळूहळू या आश्रमाचा विस्तार संपूर्ण राज्यात झाला. सध्या या आश्रमामार्फत देशभरातील शाळा आणि रुग्णालये, तसेच केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार व गया यांसारख्या प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्रांमध्ये अतिथिगृहे आणि वसतिगृहे चालवली जातात. आश्रमाच्या वेबसाइटनुसार, “भारत सेवाश्रम संघ वंचितांचे जीवन सुधारण्यासाठी कायम वचनबद्ध असलेली एक परोपकारी आणि सेवाभावी संस्था आहे.”

कोण आहेत कार्तिक महाराज?

कार्तिक महाराज किशोरवयातच संघात सामील झाले होते आणि २० व्या वर्षी अधिकृतपणे संघटनेचे नेते म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर त्यांना मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा शहरात पाठविण्यात आले आणि तेथे आश्रम बांधण्याची जबाबदारी देण्यात आली. आश्रमाचा विकास करण्याबरोबरच, कार्तिक महाराजांना शहरात शाळा आणि रुग्णालये बांधण्याचे श्रेय दिले जाते. मुर्शिदाबादमध्ये मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. कार्तिक महाराजांचा दावा आहे की, ते कोणत्याही राजकीय कार्यात सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस पाठविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कार्तिक महाराज म्हणाले की, टीएमसी आणि भाजपाने त्यांना मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ केले होते; परंतु त्यांनी ते तिकीट नाकारले.

हेही वाचा : पेपरफुटी आणि बेरोजगारीमुळे भाजपाला निवडणुकीत फटका बसेल? विद्यार्थ्यांच्या भावना काय?

कार्तिक यांच्या वकिलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ”त्यांनी स्वतःला मानवी सेवेसाठी वाहून घेतले आहे. हिंदू अध्यात्माच्या प्राचीन शैलीचा पूर्ण सन्मान राखून, ते सध्याच्या हिंदू समाजाला एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना आपल्या मातृभूमीबद्दल नितांत प्रेम आहे. त्यांना मानवतेबद्दल सहानुभूती असून, ते सामाजिक सुधारणांमध्ये गुंतलेले आहेत.” कार्तिक महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पश्चिम बंगालमधील साधू-संत आणि त्यांचे अनुयायी रस्त्यावर उतरण्याची आणि ममता बॅनर्जी यांना तीव्र विरोध करण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sevashram sangh kartik maharaj on mamata banerjee rac