उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : श्रेयवादाच्या लढाईत मुख्य मंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुरघोडीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. पण नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, यासाठी काही काळ शांत राहण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते व मंत्र्यांना दिल्या आहेत. महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ असल्याने त्यागही करण्याचे आवाहन फडणवीस यांनी पक्षातील नेत्यांची समजूत घालण्यासाठीच केले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

शिंदे यांच्यामुळे भाजप राज्यात सत्तेत आल्याने व शिवसेनेशी जुनी युती असल्याने त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपने काही प्रमाणात स्वीकारले. मात्र गेली २५-३० वर्षे राजकारणात ज्यांच्याशी संघर्ष केला व निवडणुका लढविल्या, त्या अजित पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना बरोबर घेणे, भाजपचे वरिष्ठ नेते व स्थानिक पदाधिकाऱ्यांना पटलेले नाही. पवार नाराज झाल्याने त्यांना पुणे, कोल्हापूरसह हवी असलेली पालकमंत्रीपदे भाजप पक्षश्रेष्ठींनी दिली असून महामंडळ वाटपातही शिंदे-पवार गटांना झुकते माप दिले जाणार आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नाराज आहेत. मात्र ते पक्षातील जुने ज्येष्ठ नेते असल्याने शांत आहेत.

हेही वाचा >>> भाजपच्‍या कुरघोडीमुळे आमदार बच्‍चू कडू अस्‍वस्‍थ!

पवार यांचा अर्थ खात्याच्या माध्यमातून निधीवाटप व अन्य बाबींमध्ये होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत भाजप ने त्यांच्या असलेल्या अनेक तक्रारी फडणवीस यांना गेल्या काही महिन्यांपासून दूर कराव्या लागत आहेत. त्यादृष्टीनेच महत्वाच्या फाईल्सही त्यांच्या संमतीखेरीज मुख्यमंत्र्यांकडे पाठवायच्या नाहीत, असे आदेश काढण्यात आले होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या सांस्कृतिक खात्यावर मुख्य मंत्री शिंदे यांच्याकडून कुरघोडी होत असल्याने तेही नाराज व अस्वस्थ असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची संकल्पना व मेहनत असताना जनतेमध्ये श्रेय मात्र शिंदे यांना मिळत आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कार समारंभाचे आयोजक सांस्कृतिक खाते होते. पण अनेक बाबींमध्ये शिंदे यांच्या कार्यालयाकडून हस्तक्षेप झाला.

हेही वाचा >>> अजित पवारांची बारामतीमध्ये कसोटी

‘जय जय महाराष्ट्र माझा,’ या गीताला राज्यगीताचा दर्जा देणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षानिमित्ताने रायगड व अन्यत्र झालेले कार्यक्रम, मंत्रालयात शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी दररोज ध्वनियंत्रणेमार्फत दिली जाणारी माहिती, अशा विविध संकल्पना व कार्यक्रमांमध्ये शिंदे यांना अधिक श्रेय मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे व भवानी तलवार ब्रिटनमधील वस्तुसंग्रहालयाकडून आणण्यासाठी गेले काही दिवस मुनगंटीवार प्रयत्नशील आहेत. मात्र वाघनखे आणण्याच्या करारासाठी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शिंदे हे दृकश्राव्य यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले. त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही तेथे पाठविले. या समारंभाच्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात मुनगंटीवार यांचा उल्लेख ओझरता होता व शिंदे यांनाच प्रसिद्धी मिळाली.

हेही वाचा >>> रायगडमध्ये तटकरे की शिंदे गट बाजी मारणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांनंतर किंवा महत्वाच्या बैठकांनंतर मुख्यमंत्री प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतात. पण अनेकदा शिंदे-फडणवीस किंवा भाजप-शिंदे गटातील नेत्यांमध्ये या बैठकांविषयी माध्यमांना माहिती देण्यासाठी चढाओढ असल्याचे चित्र दिसते. पवार यांनी मुख्य मंत्र्यांची वॉररुम असताना काही प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी आपली स्वतंत्र वॉररुम सुरू केली. पुण्यात चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना परस्पर स्थानिक अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या होत्या. कार्तिकी एकादशीला पंढरपूरला फडणवीस जाणार की पवार, की दोघेही ? हा प्रश्न कसा सोडवायचा, यावर चर्चा सुरू आहे. याबाबत आता विठ्ठलाला किंवा अमित शहांना कौल लावावा लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिंदे-पवार गटांच्या कुरघोडीने भाजप नेत्यांमधील अस्वस्थता व नाराजी वाढत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trouble in bjp leaders with eknath shinde ajit pawar role print politics news ysh
Show comments