नाशिक – कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलेल्या पार्टीच्या चित्रफिती शिवसेना शिंदे गटाने उघड केल्यानंतर या पार्टीची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे नागपूर अधिवेशनात जाहीर करण्यात आले. त्यामुळे सुधाकर बडगुजर हे नाव सर्वांच्या तोंडी आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कधीकाळी महापालिकेत ठेकेदार म्हणून वावरणारे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवास विलक्षण राहिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महानगरपालिकेत अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी मिळाली आहे. आक्रमकता शिवसेनेची ओळख असली तरी बडगुजरांची भिस्त आर्थिक बळावरील राजकारणावर राहिली आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आमदार बलात्काराच्या आरोपात दोषी; जाणून घ्या रामदुलार यांचा सरपंच ते आमदारकीचा प्रवास!

साधारणत: दोन दशकांपूर्वी नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यावेळी शिवसेनेचे तत्कालीन महापौर दशरथ पाटील यांच्याशी बडगुजर यांनी जवळीक साधली. या काळात बडगुजर यांनी महापालिकेतील ठेकेदारीत चांगलाच जम बसवला. तत्कालीन महापौरांच्या नावाने पतसंस्था सुरू करून निष्ठा जपण्याची धडपड केली. परंतु, पुढील काळात तत्कालीन महापौर पाटील आणि बडगुजर यांच्यात बिनसले. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर दशरथ पाटील हे शिवसेनेपासून दूर झाले. तोवर बडगुजर यांनी महापालिकेचा कारभार अतिशय जवळून समजून घेतला होता. त्या बळावर २००७ मध्ये सिडकोतून ते पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर शिवसेनेत प्रवेश केला. व्यवस्थापन कौशल्याच्या बळावर पक्षातील अनेकांना बाजूला सारत त्यांनी उत्कर्ष साधल्याचे दिसून येते. शिवसेनेचे उमेदवार म्हणून नंतरही ते महापालिकेत सातत्याने निवडून आले. सभागृह नेता, विरोधी पक्षनेता अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बडगुजर हे नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार होते. भाजपच्या सीमा हिरे यांच्याकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. तीन वर्षांपूर्वी पक्षाने बडगुजर यांची नाशिक महानगरप्रमुखपदी नियुक्ती केली. तेव्हापासून ते या पदावर कार्यरत आहेत.

खासदार राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून बडगुजर गणले जातात. शिवसेना दुभंगल्यानंतर स्थानिक पातळीवरील अनेक प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात सहभागी होण्यामागे बडगुजर यांची कार्यपद्धती कारणीभूत ठरल्याचा आक्षेप घेतला जातो. बडगुजर यांच्या ठेकेदार कंपनीची महापालिकेने एकदा चौकशीही केली होती. या कंपनीतून आपण राजीनामा दिल्याचे दावे त्यांच्याकडून झाले आहेत. उंटवाडी रस्त्यावरील उड्डाणपूल किंवा महापालिकेतील अशा अनेक प्रकल्पांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे त्यांचा संबंध जोडला गेला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राऊत आणि बडगुजर यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले होते.

हेही वाचा – सिंहस्थ कुंभमेळा नियोजनात भाजपचाच प्रभाव, शिंदे गटाचे पालकमंत्री दुय्यमस्थानी

महापालिकेतील एका निवडणुकीत नगरसेवक पळवापळवीवरून बडगुजर यांना विरोधी गटाकडून मारहाणही झाली होती. भाजपच्या महिला मेळाव्यात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता. त्या प्रकरणात त्यांनाही अटक झाली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी अरेरावी केल्याप्रकरणी बडगुजरांना न्यायालयाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली होती. येत्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून बडगुजर यांनी तयारी सुरू केली असतानाच आता एसआयटी चौकशीचे शुक्लकाष्ट त्यांच्यामागे लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is sudhakar badgujar print politics news ssb