मुंबई: हैद्राबाद येथे एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या विरोधात रणशिंग फुंकणाऱ्या भाजपच्या नवनीत राणा आक्रमक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा सदस्या व प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गद्दारीवरून जिव्हारी लागणारी टीका केली. शिवसेनेच्या सुषमा अंधारे विरोधकांचा यथेच्छ समाचार घेतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व प्रणिती शिंदे, शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे व ज्योती वाघमारे या महिला नेत्यांनी प्रचाराची धुरा प्रभावीपणे सांभाळली आहे. भाजपच्या अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये ओवेसी यांना आव्हान दिले. त्यामुळे सध्या १५ मिनिटे विरुद्ध १५ सेकंद असा हा वाद रंगला आहे. चार दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे खासदार चिरंजीवांना डिवचले. त्यामुळे शिंदे गट चांगलाच संतप्त झाला होता. सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघातील मतदान झाले असल्याने त्या इतर टप्यातील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. त्यांनी अहमदनगरचे उमेदवार नीलेश लंके यांना दम देणाऱ्या अजित पवार यांना इशारा दिला आहे. भाजपच्या बीड येथील उमेदवार पंकजा मुंडे यांची भाषणे गाजली. पण बीडमध्ये लढत असल्याने मुंडे या मतदारसंघातच अडकून पडल्या. सोलापूरच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील प्रचारादरम्यान मोदी सरकारला जाब विचारला. भाजप संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा देत असल्याचा प्रचार त्यांनी ठणकावून केला आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या स्टार प्रचारक यशोमती ठाकूर यांच्यावर काही मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या सभांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. विरोधी नेत्यांची टर उडविण्याच्या त्यांच्या ग्रामीण बाज असलेल्या भाषणांना चांगलाच प्रतिसाद मिळतो. अंधारे यांना प्रचारासाठी ठाकरे गटाच्या उमेदवारांकडून अधिक पसंती दिली जाते. भाजपच्या वतीने चित्रा वाघ या ठिकठिकाणी दौरे करीत आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण तर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपापल्या पक्षांची बाजू लावून धरली होती. विद्या चव्हाण यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. चाकणकर या अजित पवार गटाचा किल्ला लढवित आहेत. मतदान यंत्राची पूजा केल्याप्रकरणी त्या अडचणीत आल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदे गटाच्या वतीने ठिकठिकाणी प्रचारात सहभाग घेतला. शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही पक्षाच्या उमेदावरांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या.

हेही वाचा – ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

शिवसेना शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे व ज्योती वाघमारे या पक्षाची बाजू मांडण्याची कामगिरी करतात. विशेषत: ठाकरे गटावर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. एकूणच राज्यात महिला नेत्यांची प्रचारात आक्रमक भूमिका राहिली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women leaders of all parties are aggressive in campaigning in maharashtra print politics news ssb