२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचाही समावेश होणार आहे. ओमप्रकाश राजभर आणि दारा सिंह चौहान यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.

मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळू शकते?

सूत्रांच्या हवाल्याने, यावेळी मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार होणार असल्याचे वृत्त आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (SBSP) अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी राजधानी लखनऊबाहेरचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ओमप्रकाश राजभर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे. याबरोबरच दारा सिंह चौहान यांनाही मंत्री केले जाऊ शकते. एनडीएचा नवा मित्र राष्ट्रीय लोक दल (RLD) देखील मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ शकतो. आरएलडीच्या एका चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. याशिवाय भाजपाकडून एक ते दोन चेहऱ्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.

हेही वाचाः संदेशखाली प्रकरणामुळे तृणमूलची चांगलीच अडचण, वाचा नेमकं कारण काय?

राजभर मंत्रिमंडळात येण्यास इच्छुक

ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपी जुलै २०२३ मध्येच एनडीएमध्ये सामील झाला होता. तेव्हापासून योगी मंत्रिमंडळात ओमप्रकाश राजभर यांचा समावेश केला जाईल, अशी सतत अटकळ बांधली जात होती. मात्र आजपर्यंत तसे झालेले नाही. ओमप्रकाश राजभर यांनी अनेक वेळा मंत्रिमंडळात येण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. मात्र, आता योगी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यात ओमप्रकाश राजभर यांना स्थान मिळू शकते, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने आहे.

हेही वाचा:Loksabha Election: भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच होणार जाहीर; बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याची तयारी

आरएलडीलाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार

जयंत चौधरी यांचा आरएलडीही नुकताच एनडीएमध्ये सामील झाला आहे. आता पक्षाकडून कोणत्याही चेहऱ्याचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. जयंत चौधरी यांचे आजोबा चौधरी चरणसिंह यांना केंद्र सरकारने भारतरत्न प्रदान केला होता. त्यानंतर जयंत चौधरी यांनी एनडीएमध्ये जाण्याची घोषणा केली होती. जाट समाजातील मोठा वर्ग जयंती चौधरी यांच्या पक्षाचा समर्थक आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या येण्याने पश्चिम उत्तर प्रदेशात एनडीए मजबूत होणार आङे.